Home > News > महापालिका लागल्या निवडणुकीच्या तयारीला, क.डो.म.पा. मंगळवारी काढणार महिलांसाठी आरक्षण सोडत

महापालिका लागल्या निवडणुकीच्या तयारीला, क.डो.म.पा. मंगळवारी काढणार महिलांसाठी आरक्षण सोडत

महापालिका लागल्या निवडणुकीच्या तयारीला, क.डो.म.पा. मंगळवारी काढणार महिलांसाठी आरक्षण सोडत
X

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणुक आयोगाने आता निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश १३ महानगर पालिकांना दिले होते. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगर पालिका आता महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढणार आहे, तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

महिन्याभरापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २३ मे ला राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील १३ महानगर पालिकांना आरक्षणाच्या सोडती काढण्याचे आदेश दिले होते. या पत्रकामध्ये नवी मुंबई, ठाणे, कोल्हापुर, कल्याण- डोंबिवली, पुणे, पिंपरी – चिंचवड, नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, उल्हासनगर, वसई-विरार या महापालिकांचा समावेश आहे.

त्यापैकी कल्याण डोंबिवली महापालिका ३१ मे ला महिलांसाठीच्या आरक्षणाच्या सोडती काढणार असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. "कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी, महिलांकरिता उद्या, मंगळवारी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण (पश्चिम) येथे सदर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

तसेच बुधवार दिनांक 1 जून 2022 रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार असून आरक्षणाबाबत हरकती व सूचना (महापालिका आयुक्त यांच्या नावाने) बुधवार दिनांक 1 जून 2022 ते सोमवार दिनांक 6 जून 2022 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, महापालिका भवन, तळमजला, शंकरराव चौक, (कल्याण पश्चिम) अथवा संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे."

Updated : 30 May 2022 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top