Home > Entertainment > मराठी सिनेसृष्टीच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट 'जयंती' होणार १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित, ट्रेलरला लोकांचा मोठा प्रतीसाद...

मराठी सिनेसृष्टीच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट 'जयंती' होणार १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित, ट्रेलरला लोकांचा मोठा प्रतीसाद...

मराठी सिनेसृष्टीच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट जयंती होणार १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित, ट्रेलरला लोकांचा मोठा प्रतीसाद...
X

देशाच्या विकासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचे हात आहेत, आणि त्यांच्यामुळेच आज भारत देश "सुजलाम सुफलाम" बनला आहे. आपल्याकडे अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात आणि सामाजिक कार्यासोबतच कालांतराने त्याभोवती राजकीय वलय आलेली दिसतात आणि नेमक्या याच विषयावर भेदक प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित "जयंती" हा होय. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

"जयंती" सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता "ऋतुराज वानखेडे" आणि अभिनेत्री "तितिक्षा तावडे" मराठी सिनेसृष्टीत प्रथम पदार्पण करत आहेत. ऋतुराजच्या लूकवरून एकंदरीत त्याच्या पात्राची कल्पना आपल्याला करता येऊ शकते. जयंती साजरी करण्यामागे वेगळे हेतू ठेवणाऱ्या बड्या राजकारण्याच्या खास कार्यकर्त्याची भूमिका तो साकारतो आहे. यानिमित्ताने अभिनेता ऋतुराज वानखेडे सांगतो, "आजपर्यंत मी अनेक नाटकांमध्ये भूमिका पार पाडल्या आहेत पण जयंती हा सिनेमा माझ्यासाठी एक नवे आव्हान देणारा सिनेमा आहे. मोठ्या पडद्यावर येण्याचा हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे मला चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत."

सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री तितिक्षा सांगते, "जयंती या सिनेमात मी समंजस आणि थोरपुरुषांच्या विचारांचे नेमके अनुकरण करणाऱ्या तरुणीची भूमिका साकारत आहे. भविष्यात जर या पात्राचे सामान्य जीवनात थोडेफार जरी अनुकरण झाले तरी माझी ही मेहनत सफल झाली असे मी मानेन."

भारतीय चित्रपटसृष्टीत प्रख्यात असलेले जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांनी सिनेमात एका ध्येयवादी शिक्षकाची भूमिका साकारली आहे. एक चांगला शिक्षक संपूर्ण समाज सुधारू शकतो या वाक्याला पूरक ठरेल अशी मिलिंद शिंदे यांची भूमिका आहे. तसेच हिंदी टेलिव्हिजन जगतात ज्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळाच प्रेक्षकवर्ग तयार करून ठेवला आहे असे अभिनेते अमर उपाध्याय हे पहिल्यांदाच मराठी सिनेमात विशेष भूमिका साकारत आहेत. या सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत. यासोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. बॉलिवूड मध्ये सुपरहिट झालेल्या आर्टिकल १५, मुल्क, थप्पड तसेच सुप्रसिद्ध मराठी चित्रपट नारबाची वाडी, देऊळ सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांना त्याच तोडीचं पार्श्वसंगीत ज्यांनी दिले त्या मंगेश धाकडे यांनी जयंती सिनेमाला संगीत तसेच पार्श्व संगीत दिले असून संगीत दिग्दर्शिका रुही यांनीदेखील सिनेमाच्या गाण्यांना संगीत दिले आहे. भारतीय संगीतक्षेत्रात ज्यांचं नाव मानाने घेतले जाते असे गायक जावेद अली यांनी या चित्रपटातील दोन गीतांना आपला सुमधुर आवाज दिला असून सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटाचे गाणे लिहिले आहे.

सिनेमाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी सध्या लोकांच्या पसंतीचा विषय बनला आहे. या सिनेमाचे प्रमोशनल साँग "लवशीप देशील का" हे गीतकार "गुरु ठाकूर" यांनी लिहिले असून "सुहास सावंत" यांनी गायले आहे. गाण्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय, तसेच संगीतक्षेत्रातले नामांकित गायक "जावेद अली" यांनी गायलेले "तुला काय सांगू कळेना" या रोमँटिक गाण्याने जणू प्रेममय वातावरण निर्माण झाले आहे.

लॉकडाऊनच्या तब्बल १८ महिन्यांच्या कठीण कालावधीनंतर चित्रपटगृहे नव्याने सुरु होत असून मराठी चित्रपटसृष्टीतील "जयंती" हा पहिलाच सिनेमा आहे जो सर्वप्रथम प्रदर्शित होत आहे. शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित "जयंती" हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated : 2 Nov 2021 5:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top