Home > News > रमजान महिन्यातील इफ्तार पार्ट्या आणि मुस्लीम महिलांचा सहभाग

रमजान महिन्यातील इफ्तार पार्ट्या आणि मुस्लीम महिलांचा सहभाग

रमजान महिना, इफ्तार पार्ट्या आणि मुस्लीम महिलांचा सहभाग याविषयावरील पैगंबर शेख यांचे परखड मत

रमजान महिन्यातील इफ्तार पार्ट्या आणि मुस्लीम महिलांचा सहभाग
X

कालच एका महोदयांचा सोलापूर हुन फोन आला. ते संभाजी ब्रिगेडचे होते. म्हणाले, आम्ही इथे इफ्तार पार्टीचे आयोजन करतोय. तर त्यात बोलू काय ? हा प्रश्न पडला आहे. मी म्हणालो, काय बोलू म्हणजे नक्की काय ? म्हणाले, हे आपण करतोय कशासाठी नक्की ? काहीजण यावर टिका करत असतात. मुस्लिम धार्जिणे आहेत असे म्हणतात. म्हणून आधी माहिती घ्यावी आणि मग बोलावे म्हणालो.

मी त्यांना म्हणालो, आपण हे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी करत आहोत. आपण विविध धर्मीय एकसोबत नांदणाऱ्या देशात राहतो. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या परंपरांचा आदर करतो. हे कृतीतून दाखवण्यासाठी आपण या गोष्टी करतो. याच गोष्टी मुस्लिमांकडून देखील होत असतात. पंढरीच्या वारीत खूप सारे मुस्लिम खाण्या पिण्याच्या वस्तूंचे वाटप करत असतात. आमच्या तिथे वारजे मध्ये मुस्लिम समाज आषाढी एकादशीला खिचडी वाटप करतो. या गोष्टी अगदी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात केल्या गेल्या आहेत. ईदच्या दिवशी मशिदी बाहेर लोकप्रतिनिधी गुलाब, नमाजी टोपी घेऊन मुस्लिमांना शुभेच्छा देण्यासाठी उभे असतात. काहीजण मुस्लिमांच्या घरोघरी जाऊन खजूर वाटप करतात. तर काहीजण जानमाज (ज्याच्यावर नमाज पठण केली जाते) तेही घरोघरी जाऊन देतात. या सर्व गोष्टी समाजात घडतात ही चांगली गोष्ट आहे. त्या सर्व गोष्टी करत रहाव्यात आणि पुढच्या पिढीला पण हे संस्कार देत रहावे. हे भारतीय संस्कार आहेत. त्यांना मी सांगितलेल्या गोष्टी पटल्या. मग जय जिजाऊ बोलून आम्ही फोन ठेऊन दिला..

रमजान महिन्यात देशभर अशा लाखो इफ्तार पार्ट्यांचे आयोजन होते. ज्यातून प्रेम, एकोपा आणि जिंव्हाळ्याचा संदेश दिला जातो. या पार्ट्या काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून, सामाजिक संघटनांकडून, तर राजकीय नेत्यांकडून देखील आयोजित केल्या जातात. पण या इफ्तार पार्टि मध्ये महिला असतात का ? तर बहुतांश ठिकाणी नसतातच. नसतात तर का नसतात ? आणि प्रमाण अगदी नगण्य असते तर का असते ? हा प्रश्न मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी स्वतःला विचारायला हवा. मुस्लिम महिलांचे सामाजिक भान कधी जागे होणार ? त्यांना या गोष्टीची गरज नाही असे तुमचे तुम्हीच का ठरवता ?

मागील वर्षी या विषयावर कमी ओळींमध्ये विचार मांडले होते. ती लिहिलेली पोष्ट देखील इथे देत आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी इफ्तार पार्टी होत आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातील, सामाजिक संघटनेच्या महिला नेतृत्व देखील येत आहेत. पण या इफ्तार पार्टी मध्ये मुस्लिम महिला कुठेही दिसत नाहीत. माझ्याही हे आज सकाळी लक्षात आले आणि त्यानंतर मी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली.

मित्रहो, इफ्तार पार्टी फक्त पुरुषांसाठी नाहीये. स्त्रियांनाही यात समाविष्ट करून घ्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या महिलांनी ज्या इफ्तार पार्टीत जातात त्यांनी ज्या त्या ठिकाणी यावर बोलायला हवे. इंशा अल्लाह इफ्तार पार्टीचा ट्रेंड बदलणार आहे..

या पोष्ट नंतर काहिठिकाणी यात बदल घडला. जळगावच्या एका ताईंनी खास महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो आणि मागील वर्षी मी पाहिलेले अनुभव तुमच्या समोर ठेवतो. हे अनुभव कोणाचा द्वेष करण्यासाठी, कोणावर हसण्यासाठी तुम्हा सर्वांसमोर मांडत नाही. तर तुम्ही आत्मपरीक्षण करून या परिस्थितीत बदल घडवाल या अपेक्षेने हे अनुभव मांडत आहे.

मागील वर्षी एका मशिदीत एका महिला लोक प्रतिनिधीने इफ्तार पार्टीचा कार्यक्रम ठेवला. लोकप्रतिनिधी हिंदू धर्मीय महिला. अतिशय नावाजलेले नाव ज्यांना घरातूनच राजकीय वारसा आहेत अशा. त्यांनी मशिदीत इफ्तार कार्यक्रम ठेवला. मशिदीत सगळे पुरुष आणि त्या एकट्याच महिला. अगदी त्या मुस्लिम बांधवांसोबत त्यांच्यात सामील होऊन बसल्या देखील. ज्याचे फोटो माझ्याकडे अजूनही उपलब्ध आहेत. सांगायचा मुद्दा हा की मशिदीच्या ट्रष्टींना आपल्या घरातील महिला त्या लोकप्रतिनिधीच्या सोबत बसवाव्यात असे का बरे सुचले नसेल ? एकालाही ? तिथे साधारण २०० लोक असतील त्यात एकही महिला नसावी ? हे स्त्री पुरुष असमानतेचे लक्षण नाही का ? निश्चितच यावर विचार केला गेला पाहिजे.

दुसरे उदाहरण तर माझ्या सोबतच घडलेले आहे. आमच्या एका जवळच्या बंधूंनी मला फोन करून त्यांच्या येथील इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले. म्हणाले वहिनींना पण निमंत्रण आहे. मी आनंदी झालो. मी १००% येणार असे म्हणालो. मी बायको आणि मुलीला घेऊन या इफ्तार कार्यक्रमात पोहोचलो. पोहोचल्या पोहोचल्या आमचे मित्र बंधू म्हणाले, महिलांसाठी आत मध्ये नियोजन आहे. खरेतर इथेच नियोजन फसलेले होते. पण घरातील सर्व महिला आतमध्ये असल्याने मी माझ्या बायकोला सोबत बसवा असे म्हणणे मूर्खपणाचे राहील म्हणून मी ठीक आहे बोललो. आणि सर्व पुरुषांसोबत इफ्तार ची वेळ होण्याची वाट पाहत बसलो. बहुदा अल्लाहने माझी हाक त्यावेळी ऐकली असावी. माझ्या मनाची घालमेळ त्याला समजली असावी.

आमचे मित्र बंधू सामाजि क्षेत्रात सक्रिय असल्याने सर्वच धर्माचे पुरुष आणि महिला इफ्तार कार्यक्रमात सामील झाले होते. कार्यक्रम खुल्या जागेत होता. थोड्या वेळाने तिथे तीन हिंदू महिला इफ्तार कार्यक्रमात सामील होण्यासाठी आल्या. पुढे जे घडले ते खूपच विनोदी होते. त्या महिलांना आमच्या मित्र बंधूंनी आमच्या बाजूलाच बसवले आणि तिघींना वेगळी मोठी प्लेट दिली. आणि इथे सगळा विषय संपला. मी माझ्या मित्रबंधूंना लगेच म्हणालो, माझ्या बायकोला आतून बोलवा. मित्र बंधूं घरात गेले. आणि परत येऊन मला म्हणाले, त्या सगळ्या आता सोबत बसल्या आहेत. मी लगेच तिथूनच बायकोला फोन लावला आणि बाहेर ये म्हणालो. तुला बाहेर का बोलवत आहे हे नंतर सांगतो असेही बोललो. बायकोने माझे ऐकले आणि ती देखील लगेच बाहेर आली. मी म्हणालो बस यांच्या सोबत. माझी मुलगी आणि बायको त्या तीन महिलांसोबत बसले. थोड्यात वेळात मित्र बंधू घरात गेले आणि त्यांच्या आईंना घेऊन त्या महिला आणि माझ्या बायको बरोबर बसवले. याचे फोटो देखील फेसबुकवर उपलब्ध आहेत. पण ती कुठली इफ्तार पार्टी हे मात्र गुपित ठेवलेले बरे.. नंतर मी त्या मित्र बंधूंना पुढील वेळी कृपा करून असे करू नका ही विनंती देखील केली. बदलाची सुरुवात स्वतः पासून करावी लागेल. ज्यांना पटतंय ते येतील. आणि यात न पटण्या सारखे काहीही नाही. महिलांनाही मोकळे आकाश पाहुद्या.

तिथे साधारण ५० पेक्षा जास्त मुस्लिम होते. काही जणांना घडतंय काय ते समजले न्हवते. आणि काहींना पूर्ण विषय समजला होता. बायकोला मी तिथे त्या महिलांमध्ये बसवण्यात मला एक वेगळा आनंद मिळाला होता. त्या इफ्तार पार्टी नंतर लगेच आम्ही पुढच्या इफ्तार कार्यक्रमासाठी सांगविला गेलो. प्रवासात मी बायकोला घडलेला सगळा प्रकार सांगितला. बायकोला देखील माझ्या कृतीचे कौतुक वाटले. आमची या विषयावर बरीच चर्चा झाली. ती चर्चा परत कधीतरी सर्वांसमोर आणेल. पण त्यातील महत्वाचा विषय हा होता की मुस्लिम महिलांची सामाजिक जाणिव वाढली पाहिजे. तीही सद्सदद्विवेक बुद्धी जागेवर ठेऊन..

आज लेखामध्ये पोष्ट केलेला फोटो. हा गांधी भवन येथे युवक क्रांती दल यांच्याकडून मागील वर्षी आयोजित केलेल्या इफ्तार कार्यक्रमातील आहे. तिथे महिलांना खुले प्रवेश होते. कुठलाही पडदा वगैरे या गोष्टी न्हवत्या. अर्थातच महिलांचे प्रमाण कमी जरी असले तरीही चांगले होते. तिथे हा फोटो मुद्दामच काढला. ज्या ज्या व्यक्तींबाबत या घटना घडल्या ते सर्वजण माझे लेख वाचतात आणि फेसबुकवर माझ्या मित्र यादीत पण आहेत. मी बाकीचे फोटो पण पोष्ट करू शकतो. पण कोणाची बदनामी करणे हा माझा उद्देश अजिबात नाही.

सिर्फ़ हंगामा खड़ा करना मिरा मक़्सद नहीं

मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए


Updated : 20 March 2024 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top