Home > News > मुलगी ३ वर्षाची झाली,पण नवरा पाकिस्तानी कैदेत ,जगू कसं ?

मुलगी ३ वर्षाची झाली,पण नवरा पाकिस्तानी कैदेत ,जगू कसं ?

मुलगी ३ वर्षाची झाली,पण नवरा पाकिस्तानी कैदेत ,जगू कसं ?
X



मी गरोदर असताना मासेमारीसाठी गेलेल्या माझ्या पतीला पाकिस्तानच्या सैन्याने अटक केली. मला मुलगी होऊन तीन वर्षे झाली तरी अजूनही ते परतले नाहीत. पाकिस्तानात अडकलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पहा रवींद्र साळवे यांच्या या ग्राऊंड रिपोर्टमध्ये….

गुजरात राज्यातील ओखा येथील मत्स्यगंधा व अन्य एक मच्छीमार बोट २३ सप्टेंबर 2022 रोजी आपल्या बंदरातून मासेमारी साठी नेहमी प्रमाणे समुद्रात गेल्या होत्या. या दोन्ही बोटी मत्स्यसाठ्यांचा शोध घेत असताना समुद्रात प्रवाहात सोडलेली जाळी आपल्या बोटीत घेत असताना अचानक पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या स्पीड बोटींनी भारतीय मच्छीमार बोटींना घेराव घातला आणि त्या दोन्ही बोटीसह १६ खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी 3महिन्यांपूर्वी ताब्यात घेतले आहे .यातील सात खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत .डहाणूतील अस्वाली गावातील सहा तर सोगवे येथील एका खलाशाला पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतल आहे

रोजगारासाठी ओखा येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या या कामगारांना समुद्रातूनच पाकिस्तानच्या मेरिटाईम विभागाने ताब्यात घेतलं . त्यामुळे या खलशांची कुटुंब सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहेत . कुटुंबातील कमावता कर्ता पुरुषच पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याने ही कुटुंब सध्या मरणयातना सोसत आहेत . कुटुंबाची घडी चालवणारा कुटुंबप्रमुख गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने कुटूंबियांची अक्षरशा वाताहात झाली असून घर खर्च आणि मुलांचा खर्च करायचा कसा ?असा गंभीर प्रश्न या महिलांसमोर उभा राहिलाय .

नवश्या भीमरा , विजय नागवंशी , सरीत उंबरसाडा , जयराम साळकर , कृष्णा बुजड , विनोद कोल , उधऱ्या पाडवी अशी या सात खलाशींची नावं असून हे ओखा बंदरातील एका मासेमारी बोटीवर रोजगारासाठी गेले होते . पालघर मधील डहाणू , तलासरी , विक्रमगड या दुर्गम भागातील शेकडो कामगार स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने गुजरात कडे धाव घेतात . यातील अनेक कामगार हे आजही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत . इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे बांधून आदिवासी बांधव अक्षरशः जीवाची बाजी लावून अनेक कुटुंब प्रमुख मासेमारीसाठी बोटींवर खलाशी म्हणून जातात .

या खलासांमध्ये कृष्णा भुजड चा समावेश असून त्याचं कुटुंब मोठ्या अडचणीत सापडल आहे . कृष्णा भुजळ हा या घरातील एकमेव करता पुरुष . आजी अपंग तर आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते . कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कृष्णा गुजरात मधील ओखा बंदरातील एका मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामाला गेला . मात्र सध्या कृष्णा पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याने कृष्णाचा कुटुंब ही मरण यातना सोसतंय . कृष्णाला मिळणाऱ्या पगारातूनच कृष्णाचा कुटुंब चालत होता मात्र आता हे कुटुंब चालवायचं कसं असा गंभीर प्रश्न या दोघींसमोर उभा राहिलाय . त्यामुळे सरकारने पाठपुरावा करून त्यांची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी कृष्णाचे कुटुंबीय करत आहेत .

तसेच तीन वर्षांपूर्वी डहाणूतील जितेश रघु दिवा हे मच्छिमारी करताना पकडले गेल्याने पाकिस्तान अटक आहेत इकडे पत्नी गरोदर असताना त्याला झालेली अटक हि त्यांच्या कुटूंबियांना वेदना देणारी होती त्याची पत्नी नीलम बोलताना सांगते मी इथे तिथे मिळेल ते काम करून माझ्या मुलीला सांभाळत आहे माझी मुलगी प्रणाली तीन वर्षाची झाली आहे तिने तिच्या वडिलांना पाहिलेलं नाही हि भावना प्रचंड दुःख व्यक्त करणारी असून पाकिस्तनाच्या तुरंगात असलेले जितेश यांनी आपल्या कुटूंबियांना जेलमधून पाठवलेले पत्र कुणीही वाचल्यास डोळ्यात अश्रू आल्या शिवाय रहाणार नाहीत

गेल्या काही वर्षांत देशातील मच्छिमारांच्या १,३००हून अधिक मासेमारी बोटी पाकिस्तानच्या सैन्याने आपल्या हद्दीत शिरल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत किती भारतीय मच्छिमार पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहेत, याची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाही.

पाकिस्तान सरकारने पकडलेल्या सुमारे १,३०० बोटींपैकी ५७ बोटी सन २०१५मध्ये सोडून दिल्या. मात्र, त्यानंतर २२ बोटी सोडणार असल्याचे सांगूनही आजपर्यंत पाकिस्तान सरकारने त्या सोडल्या नाहीत. त्यामुळे या बोटी आजही पाकिस्तानच्या ताब्यातच आहेत. पाकिस्तान सरकार त्या बोटी आणि मच्छिमारांना भारताच्या ताब्यात कधी देणार

या विवंचनेत मच्छिमारांची कुटुंबे आहेत.

राज्यातील पालघर या आदिवादीबहुल जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी, पालघर, डहाणू या तालुक्यांत रोजगाराची मोठी संधी निर्माण होत नसल्याने, वर्षानुवर्षे येथील २५ हजारांहून अधिक कुटुंबे रोजगारासाठी गुजरात राज्यातील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करण्यास जात आहेत.

गुजरातमधील ओखा, पोरबंदर, जामनगर हे जिल्हे मासेमारीसाठी प्रसिद्ध असून पापलेट, दाढा, घोळ आदी माशांसाठी हा 'गोल्डन बेल्ट' गणला जातो. त्यामुळे या भागातील बोटींमध्ये, विशेष करून पालघर जिल्ह्यातील मच्छिमार खलाशी रोजगारासाठी येत असतात. या बोटी चुकून पाकिस्तान व भारताच्या समुद्र हद्दीपर्यंत पोहोचल्यास पाकिस्तानी सैन्य मच्छिमारांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करते. त्यानंतर वर्षानुवर्षे ते तुरुंगात खितपत पडलेले असतात.

भारतातून मासेमारीसाठी गेलेल्या १,३००हून अधिक बोटी पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. याबाबत दोन्ही सरकारांनी कोणती भूमिका घेतली नसल्याने त्या बोटींची दुरवस्था झाली आहे. पाकिस्तानकडून पकडल्या जाणाऱ्या बोटींची एकतर वाताहत होते किंवा काही बोटींचा लिलाव करण्याचा निर्णय तिथल्या सरकारने घेतला आहे. मात्र, भारत सरकारने याप्रश्नी पाकिस्तान सरकारसोबत चर्चा करून, तो तातडीने सोडवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कारण मच्छिमारांनी कर्ज काढून घेतलेल्या लाखो रुपयांच्या बोटींची दुरवस्था झाल्याने मच्छिमारांवरील कर्जाचा बोजा मात्र कायम राहतो. त्याची मोठी आर्थिक झळ त्याच्या कुटुंबीयांना बसते.

केंद्र सरकारने पाकिस्तानने पकडलेल्या बोटीच्या बाबत ठोस भूमिका घेऊन तातडीने काही निर्णय घेतल्यास या बोटींपैकी २००हून अधिक बोटी पाकिस्तानमध्ये दुरुस्त करून भारतात परत आणल्या जाऊ शकतात. त्यामुळे मच्छिमारांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करणे आणि कर्जफेड करणेही शक्य होऊ शकेल, अशी मागणी मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. तसेच मच्छीमारी करताना पकडल्या नंतर खलाशांना मालक वाऱ्यावर सोडतात कोणतीही मदत करत नाहीत असे अनेक पीडित कुटूंबियांचे म्हणणे आहे यावर प्रशासनाने अंकुश ठेवणे गरजेचं आहे

मच्छिमारांसाठी WPP एनजीओ काम करते. मच्छिमार सतत आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलंडतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. यावर उपाय करता येईल, कशा मुळे अशा घटना रोखता येईल असा विचार ही संस्था करत होती.

यावेळी एनजीओच्या लक्षात आलं की, हे मच्छिमार कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर करत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या समस्यांना समोरे जावे लागते. एनजीओने कायनेटिक इंडिया कंपनीशी याबद्दल विचारणा केली. त्यावर कंपनीने बोटीवर जीपीएस बसवता येईल का असे सांगितले.

मात्र बोटीवर वेगळे जीपीएस बसविले तर ते मच्छिमार वापरतील का अशी चिंता एनजीओला होती. त्यामुळे संस्थेच्या वतीने मच्छिमारांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हे मच्छिमार बोटीवरून कधीच मुखवटा काढत नाही. त्यामुळे त्यावर काही करता आले तर जमू शकेल असं संस्थेला वाटलं.

ही आयडिया संस्थेने कायनेटिक कंपनीला सांगितली. बोटीवरील मुखवट्यात जीपीएस बसविण्यात आले. जेव्हा कधी बोट आंतरराष्ट्रीय सागरी सीमे जवळ जाईल सावध करण्यासाठी अलार्म वाजवला जाईल. तसेच मुखवट्याच्या डोळ्यात लाल लाईट बसवण्यात आले होते.

अशा अशा जीपीएस असणारा मुखोटा तयार करण्यात आला. यामुळे अनेक मच्छिमार आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडण्यापासून वाचले. गुजरातच्या किनारपट्टीवरील २ हजार गावातील बोटींवर जीपीएस मुखवटा लावण्यात आले आहेत. यामुळे १५ हजार वेळा हे बोटींवरचे मच्छिमार आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडण्यापासून रोखले गेले. परंतु तरी देखील अश्या घटना घडतायत यावर प्रशासन अधिक उपाययोजना करणे गरजेचं आहे

दिवंगत खासदार चिंतामण वनगा असताना पीडित कुटूंबियांना मिळणारे 3 लाख जातात कुठे : प्रकाश सांबर सामाजिक कार्यकर्ते

डहाणू येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सांबर यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले कि पूर्वी मच्छिमारी करताना पकडल्या गेल्या नंतर त्यांच्या कुटूंबियांना तात्काळ 3लाखाचे अनुदान मिळायचे परंतु आता तसे अनुदान मिळत नाही तसेच मालक देखील वाऱ्यावर सोडतात यामुळे पीडित कुटूंबियांना जगण्यानासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो यामुळे शासनाने याकडे लक्ष घालून अशा पीडित सर्व कुटूंबाना मदत करायला हवी असे त्यांनी बोलताना सांगितले

अभ्यासक जतीन देसाई सांगतात .....

मागील अनेक वर्षापासून पाकिस्तान सरकारने कारवाई करीत पकडलेल्या १२०० बोटी ताब्यात असून आजही सुमारे ६०० मच्छीमार त्याच्या ताब्यात आहेत. यापैकी सुमारे २६८ मच्छीमारांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होऊनही त्यांना पाकिस्तान सरकारने सोडलेले नसल्याचे जतिन देसाई यांनी काही महिन्यांपूर्वी माध्यमांशी बोलताना दिली होती तसेच भारत सरकारने त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नसल्याने आजही निष्पाप खलाशी कामगार कारागृहात खितपत पडले असल्याचेही त्यांनी बोलताना म्हटले होते

गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे(वय 32 वर्ष) या मच्छीमार तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. समुद्रात हद्दीचे कुठलेही मार्किंग केलेले नसताना चुकून मासेमारी करताना भारत-पाकिस्तान हद्द ओलांडल्यावर सरळ गोळीबार करण्याच्या प्रकरणाचा त्यावेळी देखील इंडिया-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी या संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यानी निषेध नोंदवला होता.

पाकिस्तान सरकारने पकडलेल्या जिल्ह्यातील खालशांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न करीत केंद्र सरकारवर दबाव टाकला पाहिजेत अशी मागणी त्या खलाशांचे कुटुंबीय करीत आहेत. दोन्ही देशाने आपापसात समझोता करून एकमेकांच्या हद्दीत आलेल्या मच्छीमार बोटी व त्यातील खलाशांना सक्त सूचना देऊन परत आपल्या भागात जाण्यास भाग पाडले गेले पाहिजे अशी मागणी देखील यावेळी केली जात आहे

केंद्रसरकारच्या आकडेवारीनुसार

मागील ५ वर्षात किती भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या जेल मध्ये आहेत ..?

परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत दिलेल्या माहिती नुसार, ५७७ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या जेल मध्ये आहेत. तर मागच्या ५ वर्षांत ९ भारतीय मच्छिमारांचा पाकिस्तानच्या कस्टडीत मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत आणि पाकिस्तान मध्ये २००८ साली एक द्विपक्षीय करार करण्यात आला. त्यानुसार १ जानेवारी आणि १ जुलै या दिवशी या दोन्ही देशातील सरकार त्यांच्या कारागृहात त्यांच्या देशातील किती कैदी आहेत याची माहिती देत असतात.

तसेच मुरलीधरन यांनी सांगितले की, २०१४ पासून पाकिस्तानच्या जेल मध्ये असणाऱ्या २ हजार १४० मच्छिमारांना परत आणले आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेने सुद्धा २०२१ नंतर २३९ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहेत. त्यातील १५९ जणांना सोडवण्यात यश आले आले.

तर भारतातच्या जेल मध्ये असणाऱ्या ८० मच्छिमारणांपैकी ४४ जणांना सोडवण्यात आले आहे. उर्वरित ३६ जणांना चर्चेनंतर सोडण्यात येईल असेहि त्यांनी यावेळी सांगितले होते.

Updated : 18 Jan 2023 6:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top