साहित्य संमेलनात 'पदराचा वारा'
साहित्याच्या महानायकाचा हा वैचारिक 'पानिपत' नाही का?
X
मराठी साहित्याचा कुंभमेळा, जिथे शब्दांची पूजा होते आणि विचारांचे सोने लुटले जाते, त्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात' साक्षात संमेलनाध्यक्षांच्या तोंडी 'गौतमी पाटील' यांचे नाव यावे, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते? साताऱ्याच्या ९९ व्या साहित्य संमेलनाचा समारोप करताना ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी जो 'गौतमी संदर्भ' दिला, त्याने साहित्याच्या दर्जात भर पडली की साहित्याचा दर्जा 'पदराच्या वाऱ्या'सारखा उडाला, हा प्रश्न आता विचारायलाच हवा. साहित्याच्या पवित्र व्यासपीठावरून समाजाला दिशा मिळणे अपेक्षित असते, पण इथे तर दिशाभूल करणारी विधानेच जास्त गाजत आहेत.
विश्वास पाटील यांनी भाषणात एक अजब तर्क मांडला. ते म्हणाले, "इंग्रजी माध्यमाच्या मुलांना काव्यप्रतिभा समजत नाही, पण गौतमी पाटीलच्या पदराचा वारा मात्र कळतो." साहेब, हा तर्क म्हणजे निव्वळ वैचारिक दिवाळखोरी आहे. मराठी भाषेची ओढ सांगायला आपल्याकडे काय तुकोबांचे अभंग, कुसुमाग्रजांच्या कविता किंवा पु.ल. देशपांडेंचे विनोद संपले होते का? की आजचा साहित्यिक इतका हतबल झाला आहे की त्याला तरुणांची टाळी मिळवण्यासाठी 'शब्दां'पेक्षा 'पदराचा वारा' जास्त प्रभावी वाटू लागला आहे? ज्या व्यासपीठावर ज्ञानेश्वरांच्या 'पसायदाना'वर चिंतन व्हायला हवे होते, तिथे 'व्हायरल' नृत्यांगनेचे उदाहरण देणे हे साहित्याच्या परंपरेला साजेसे नाही.
आज परिस्थिती अशी झाली आहे की, राजकारण असो वा समाजकारण, जोपर्यंत गौतमी पाटील यांचा संदर्भ येत नाही, तोपर्यंत लोकांचे पान हलत नाही. पण हीच 'व्हायरल' लागण आता साहित्याच्या सर्वोच्च पीठालाही झाली आहे, हे पाहून अस्वस्थ वाटतं. साहित्य संमेलनाने अभिरुची संपन्न करायची असते, की समाजात जे उथळ चालले आहे त्याचेच समर्थन करायचे असते? विश्वास पाटील यांनी 'पानिपत' आणि 'झाडाझडती' सारख्या महान कादंबऱ्यांतून महाराष्ट्राचा अभिमान जागवला, पण त्यांच्या या एका विधानाने साहित्याच्या वर्तमानाची मात्र पूर्ण 'झाडाझडती' झाली आहे.
गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनाचे स्वरूप बदलत चालले आहे. तिथे साहित्यापेक्षा वादांची आणि 'मसालेदार' विधानांची चर्चा जास्त होते. संमेलनाध्यक्षांना जर मराठी भाषेची चिंता होती, तर त्यांनी मराठी शाळांची दुरवस्था, वाचन संस्कृतीचा ऱ्हास आणि मराठीला 'ज्ञानभाषा' करण्यातील अडचणींवर ठोस भाष्य करायला हवे होते. पण त्यांनी काय केले? तर इंग्रजी शाळेतील मुलांना 'गौतमी' कळते, हे सांगून एका उथळ संस्कृतीलाच प्रतिष्ठा मिळवून दिली. जणू काही त्यांना हेच सांगायचे होते की, "तुम्हाला कविता समजत नसेल तर चालेल, पण डान्स कळतोय ना, म्हणजे मराठी जिवंत आहे!"
आजचा तरुण वाचनापासून दूर जात असताना त्याला पुन्हा साहित्याकडे वळवण्यासाठी संमेलनाध्यक्षांकडून एका दीपस्तंभासारख्या मार्गदर्शनाची अपेक्षा होती. पण साताऱ्याच्या मंचावरून जो संदेश गेला, तो अत्यंत चुकीचा आहे. जर आपण उथळ लोकप्रियतेच्या मागे धावणाऱ्या गोष्टींना साहित्याच्या मंचावर स्थान दिले, तर उद्याचा वाचक साहित्याला गांभीर्याने घेणार नाही. साहित्याने समाजाला आरसा दाखवायचा असतो, पण तो आरसा इतका धुसर नसावा की त्यात फक्त 'पदराचा वारा' दिसावा.
साहित्याचे काम हे समाजाची अभिरुची घडवणे असते. जेव्हा आपण अशा व्यासपीठावरून लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण साहित्याची पायमल्ली करत असतो. विश्वास पाटील यांच्या शब्दांना वजन आहे, त्यांच्या लेखणीला धार आहे. मग त्यांनी आपल्या भाषणात महान साहित्याचा संदर्भ देऊन तरुणांना प्रेरणा का दिली नाही? गौतमी पाटील हे मनोरंजनाचे माध्यम असू शकतात, पण त्या साहित्याच्या समृद्धीचे परिमाण मुळीच असू शकत नाहीत.
साहित्य संमेलन हे शब्दांचे लेणे आहे, त्याला 'व्हायरल संस्कृती'चे स्वरूप देऊ नका. मराठी भाषेला वाचवण्यासाठी 'गौतमी'च्या ग्लॅमरची नाही, तर साहित्यातील 'गांभीर्याची' आणि 'संस्कारांची' गरज आहे. संमेलनाध्यक्षांनी समाजाचा आरसा होण्यापेक्षा प्रकाशाचा स्त्रोत बनायला हवे. आगामी काळात तरी साहित्याच्या व्यासपीठावर अशा उथळ चर्चेला फाटा देऊन खऱ्या अर्थाने मराठी भाषेच्या उत्कर्षावर मंथन व्हावे. साहेब, साहित्याला दिशा द्या, त्याला अशा उथळ चर्चेत वाऱ्यावर सोडू नका! अन्यथा, साहित्य संमेलनात साहित्यापेक्षा 'सेलिब्रिटी'च जास्त दिसू लागतील.






