Home > News > कचरा वेचणारी मुलं बनवतायत इकोफ्रेंडली पिशव्या

कचरा वेचणारी मुलं बनवतायत इकोफ्रेंडली पिशव्या

कचरा वेचणारी मुलं बनवतायत इकोफ्रेंडली पिशव्या
X

कल्याण : डम्पिंगवर कचरा वेचून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावणाऱ्या मुलांचे हात आता सृजनशील निर्मितीमध्ये गुंतल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. अनुबंध संस्थेच्या माध्यमातून या वंचित मुलांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक अशा देखण्या कापडी आणि कागदी पिशव्या बाजारात विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे या पिशव्या विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून इतर मुलांचे शिक्षण आणि रोजगारनिर्मिती केली जाणार आहे.

अनुबंध संस्थेतर्फे वंचित समूहातील मुलांना शैक्षणिक प्रगती, व्यक्तीमत्व विकास, मूलाधार जीवनशैलीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे 'उद्योजकता विकास कार्यक्रम' राबवला जात असून त्याअंतर्गत डम्पिंगवरील मुलांना कापडी आणि कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देऊन आता त्यांच्याकडून या पर्यावरण पूरक पिशव्यांची निर्मिती केली जात आहे .या उपक्रमासाठी कल्याणातील समाजसेवी संस्थांसह नागरिकांनी हातभार लावला आहे. त्यातूनच पर्यावरण पूरक पिशव्या बनवण्यासाठी आवश्यक शिलाई मशीन आणि कच्चा माल उपलब्ध झाला आहे.तर वापरात नसलेल्या किंवा जुन्या झाल्याने टाकून देण्यात आलेल्या साड्यांपासून सुंदर अशा रंगीबेरंगी कापडी पिशव्या बनवण्यात आल्या आहेत.

सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या कागदाच्या पिशव्यांप्रमाणेच अगदी हुबेहूब ही मुलं पिशव्या बनवत आहेत. कागद आणि कापडाच्या दररोज साधारणपणे 100 पिशव्या बनवण्याची या मुलांची क्षमता आहे. वंचितांच्या प्रवाहातून आता ही मुलं मुख्य प्रवाहात येण्यासाठी घोडदौड करत असून आपण सर्वांनीही एक समाजघटक म्हणून या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे. ही मुलं बनवत असणाऱ्या पिशव्यांची जास्तीत जास्त खरेदी करून त्यांना पाठबळ देण्याचे आवाहन अनुबंध संस्थेमार्फत केले जात आहे.

Updated : 2 Nov 2020 9:49 AM GMT
Next Story
Share it
Top