Home > News > धक्कादायक! गुप्तधनासाठी पोटच्या पोरीचा नरबळी देण्याचा प्रयत्न

धक्कादायक! गुप्तधनासाठी पोटच्या पोरीचा नरबळी देण्याचा प्रयत्न

धक्कादायक! गुप्तधनासाठी पोटच्या पोरीचा नरबळी देण्याचा प्रयत्न
X

लालसा अनेकदा माणसाकडून काय करून घेईल, त्याला गुन्हा करण्यासाठी कोणत्या पातळीवर जाईल याचा काही भरवसा नाही. यवतमाळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळमध्ये एका नराधम बापाने गुप्त धनासाठी स्वतःच्याच पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्क्दायक प्रकार उघडकीस आला आहे.

गुप्तधनाच्या लालसेपोटी एका नराधम वडीलाने पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीच्या सतर्कतेमुळे पोलिस वेळेवर पोहोचल्याने होणारा अनर्थ टळला. ही घटना बाभुळगाव तालुक्यातील मादणी येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी त्या मुलीच्या वडीलासह आठ जणांना ताब्यात घेतले असून यात दोन महिलांचा समावेश आहे.


पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, गेल्या अनेक दिवसापासून मुलीचा वडील हा गुप्तधनाच्या मागे लागला होता. घरी गुप्तधन असल्याचे सांगुन बाहेरगावची मंडळी बोलावुन पुजापाठ करण्याचा डाव त्याने आखला. त्यासाठी त्याने विजय बावणे, रमेश गुडेकार यांच्यासह राळेगाव येथील वाल्मिक वानखेडे, विनोद चुणारकर, दिपक श्रीरामे, आकाश धनकसार, माधुरी ठाकूर, माया संगमनेरकर यांना मादणी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास बोलावुन घेतले. घरातील पत्नी व दोन मुलींना एका खोलीत बंद करून दुसऱ्या खोलीत पुजापाठ करण्यास सुरूवात केली. पुजापाठ दरम्यान मुलीचा वडील हा सतत वाल्मिक नावाच्या मांत्रिकाशी बोलत होता. त्यावेळी त्याला गुप्तधनासाठी नरबळी द्यावा लागेल असे सांगण्यात आले. तेव्हा तो मोठ्या मुलीचा नरबळी देण्यासाठी तयार झाला.

हा सर्व प्रकार मोठी मुलगी लपुन पाहत होती. तिला संशय आल्याने तीने आपल्या मोबाईलमध्ये गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्डयाचा फोटो काढून आपल्या यवतमाळ येथील मित्राला पाठविला. सोबत 'माझा गुप्तधनासाठी बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव असा संदेश पाठविला.' त्या मित्राने यवतमाळ येथील आपल्या पोलिस मित्राला माहिती दिली. त्यावरून ताबडतोब हालचाली करून बाभुळगाव पोलिस व यवतमाळ पोलिसांनी संयुक्त रित्या मादणी येथे घटनास्थळी धाड टाकली. यातील सर्व नऊ जणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. मुलीने दिलेल्या तक्रारीववरून पोलिसांनी वडीलासह आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पोलिसांनी मादणी येथे गुप्तधनासाठी सुरू असलेला प्रकार उधळुन लावला. यावेळी खड्डा खोदण्याचे साहित्य जसे कुदळ, फावडे, टिकास, टोपले, पूजेचे साहित्य, चाकू, सुरी आदी पोलिसांनी जप्त केले.


या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र जेधे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी, सागर बेलसरे, आषिश अवजाडे करीत आहे. मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, तिचा वडील तिच्यावर अल्पवयीन असतानापासून शारिरीक संबंध करायचा. ती बाहेरगावी शिकत असल्याने सुटीमध्ये घरी आल्यानंतर तिच्यावर अत्याचार करीत होता. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. आई सतत आजारी असल्याने त्याचा फायदा वडील उचलत होता. यातुन घरात नेहमी वादविवाद व्हायचे. त्यामुळेच वडीलाने मुलीचा नरबळी देण्याचा निर्णय घेतला. मात्र नियतीपुढे त्याचे काहीच चालले नाही. मुलीच्या सतर्कतेमुळे हा घाणेरडा प्रकार उजेडात आला.

Updated : 27 April 2022 10:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top