Home > News > टोकरे कोळी समाजाला एसटी चे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण

टोकरे कोळी समाजाला एसटी चे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण

टोकरे कोळी समाजाला एसटी चे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण
X

धुळे जिल्ह्यातील कोळी जमात बांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे, प्रलंबित जातपडताळणी प्रमाणपत्र तत्काळ मिळावे या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार झलकारीबाई कोळी स्त्रीशक्ती सामाजिक संस्थेच्या गीतांजली कोळी यांनी केला आहे. मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून त्या धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर उपोषणास बसल्या आहेत.

धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ८० लाख असलेल्या महाराष्ट्र आदिवासी अनुसूचित जमाती अनुक्रमांक २८, २९, ३० वर असलेल्या आदिवासी कोळी ढोर, टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी यांच्यावर गेल्या ४० वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध व समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आपण २६ जानेवारी २०२४ पासून धुळ्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. माझ्या गोरगरीब आदिवासी कोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार गीतांजली कोळी यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, २०११ च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्यातील ६० हजार (आत्ताची एक लाख) लोकसंख्या असलेले आदिवासी कोळी जमात बांधवांना १९५० पूर्वीच्या कोळी नोंदीवर मुलांच्या एलसीवर लिहिलेल्या पोटजात ढोर, टोकरे, मल्हार, महादेव कोळीचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे, धुळे प्रांताधिकारी व जातपडताळणी अधिकारी यांच्याकडे गेल्या एक-दोन वर्षांपासून प्रलंबित एसटीचे प्रमाणपत्र तत्काळ आदिवासी कोळी जमात बांधवांना देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

आज गीतांजली कोळी यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे, मात्र जिल्हा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी त्यांच्या उपोषणा ठिकाणी आला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही व माझे उपोषण सोडणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन त्यांच्या मागण्या मान्य करते की त्यांचा उपोषण सोडण्यासाठी काय तोडगा काढत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 2 Feb 2024 9:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top