Home > News > आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी पुत्राची ग्रामहित कंपनी फोर्ब्सच्या यादीत

आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी पुत्राची ग्रामहित कंपनी फोर्ब्सच्या यादीत

आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी पुत्राची ग्रामहित कंपनी फोर्ब्सच्या यादीत
X

यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्या ग्रस्त म्हणून ओळखला जातो. मात्र, याच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील 'ग्रामहित' ही शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे. पंकज महल्ले,श्वेता ठाकरे ( महल्ले) या दाम्पत्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणे ही अतिशय अवघड प्रक्रिया असते. फोर्ब्स अशा कंपन्यांची कामगिरी या निवडीच्या निमित्ताने जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देते.यंदा या निवड प्रक्रियेत ६५० कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. पंकज महल्ले,श्वेता ठाकरे ( महल्ले) हे उच्च शिक्षित शेतकरी जोडपे ' ग्रामहित ' चे संस्थापक संचालक असून कंपनी शेतकऱ्यांना शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देत आहे. शेतमाल विक्री सगळीकडेच एका अनिष्ट चक्रव्यूहात अडकलेली आहे. पिक काढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात.स्वाभाविकच व्यापारी वर्ग दर पाडतो. देनेकऱ्यांच्या दबावामुळे व्यवहार मोकळे करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळा होतो.असे होऊ नये यासाठी २ गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. माल साठवणुकीची उत्तम,शास्त्रीय व्यवस्था, साठवून ठेवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमीत कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धता. हे वैशिष्ट्य आहे.पुढेही शेतकऱ्याला माल विकायचा असल्यास घरूनच मोबाईलचे क्लिक वर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते.वारंवार बाजार पेठेत जाण्याची शेतकऱ्याला गरज पडत नाही. ग्रामहित नेमकी हीच व्यवस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. आजवर यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे ३००० शेतकरी कुटुंबानी' ग्रामहित ' चे सहकार्याने या पद्धतीचा लाभ घेतला आहे.

पंकज यांनी स्थानिक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातून आपले पदवी पातळीवरील ( BSW) शिक्षण पूर्ण केल्या नंतर शेतीचे क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेऊन मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई मधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.काही वर्ष टाटाचेच सीएसआर प्रकल्पात मोठ्या पगारावर काम केले.श्वेताने अभियांत्रिकी पदवी नंतर आयआयटी हैद्राबाद येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली.मात्र शेती नि शेतकऱ्यांची ओढ दोघांनाही गावाकडे घेऊन आली.त्यातूनच' ग्रामहित ' चा शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला. शेतकरी आत्महत्या कमी करायच्या असतील तर त्यांच्या हातात पैसा खेळता रहावा, यासाठी शेतकरी पुत्र असलेले दाम्पत्य झटत आहे.

वडील शेतकरी असल्याने नेहमी त्यांचे कष्ट बघून मोठे झाले. आपल्या शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा असे नेहमी वाटायचे. दोघेही नोकरी सोडून गावाकडे आलो. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावतायावे यासाठी ग्रामहित ही गावाच्या विकासासाठी कंपनी स्थापन केली. शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढत आहे. शेतकऱ्यांना शेतीत भविष्य दिसल्यास शेतकरी आत्महत्या होणार नाहीत.

मागील तीन दशकात उत्पादकता वाढली. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. म्हणून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत असल्याने वेदना होत होत्या. शेतकऱ्यांसाठी भरीव काम करण्यासाठी नोकरी सोडून ग्रामहित कंपनी स्थापन केली. गाव तेथे गोदाम असल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. शिवाय भाव वाढ होईल त्यावेळी आपला माल विक्री करता येईल.

पूर्वी30 किलोमीटर अंतरावर जाऊन शेतमाल विक्री करावा लागत होता. त्यात येण्या जाण्याचा खर्च आणि माल नेला त्याच दिवशी विक्री होत नव्हता. त्यासाठी दोन तीन दिवस थांबावे लागत होते. त्यातही मालाला जो भाव मिळेल त्यावर समाधान मानावे लागत होते. ग्रामहित कंपनी स्थापन करण्यात आल्याने फायदा झाला आहे. मोबाईल वर दररोज भाव समजतात. आपल्या मर्जीने विक्री करता येते.

Updated : 4 Sep 2022 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top