Latest News
Home > News > महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोजताई पाटील यांची निवड

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोजताई पाटील यांची निवड

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोजताई पाटील यांची निवड
X

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदासाठी सरोजताई पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारी समिती, सल्लागार समिती, सर्व राज्य विभागांचे सदस्य या सर्वांच्या झालेल्या ऑनलाईन राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये एकमताने सरोजताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. या नावास महाराष्ट्र अंनिसच्या विश्वस्त मंडळानेही मान्यता दिली आहे. सरोजताईंनी देखील ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.

सत्यशोधक चळवळीचा विचार मानणार्‍या कुटुंबात सरोजताईंचा जन्म झाला. सत्यशोधक परंपरेतील विवेकवादी विचार उचलून धरणारे एन. डी. पाटील त्यांना पति म्हणून लाभले. सरोजताई स्वतःदेखील विवेकवादी विचार- वर्तन मानणार्‍या आणि तसेच तत्वनिष्ठ जीवन जगलेल्या व्यक्ती आहेत. त्यांची कार्यक्षमता, परखडपणा, चळवळीच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची वृत्ती हे सर्व कार्यकर्त्यांसाठी आश्वासक आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत त्या संघटनेच्या स्थापनेपासून कृतिशीलपणे जोडलेल्या आहेत. समितीची संपूर्ण विचारधारा, कार्यपद्धती त्यांना अवगत आहे. आयुष्यभर त्यांनी ती कृतिशीलपणे जोपासलेली आहे.

अंनिस संघटनेतील कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सर्व कार्यकर्त्यांना सरोज पाटील माईंचा एन. डी.पाटील सरांएव्हढाच भक्कम आधार वाटत आलेला आहे. संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी त्यांचे अतिशय घट्ट असे वैचारिक नाते आहे.

सरोजताई पाटील यांनी बी ए.बी.एड केल्यानंतरची दहा वर्षे शिक्षक आणि 25 वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले. पटसंख्या व गुणवत्ता अशा सर्व आघाड्यांवर मागे पडलेल्या, वंचित वर्गातील मुलांच्या शाळा गजबजलेल्या व गुणवत्तापूर्ण करण्याचे त्यांनी या शाळेपासून सुरू केलेले काम आजही अखंडपणे चालू आहे. मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांच्या शाळेचा निकाल 10 टक्के लागत असे, सरोजताईंनी तो 97 टक्क्यांवर नेला. मुलांचा कल ध्यानात घेऊन त्यांना रोजगाराभिमुख करणारे प्रशिक्षण सुरू केले. आजूबाजूच्या समाजातील प्रतिष्ठित लोकांना शाळेशी जोडून घेतले व त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी 250 मुलामुलींना दत्तक पालक योजनेचा लाभ दिला. मुलांना अभ्यासासाठी जागा नाही ही अडचण दूर करण्यासाठी रात्र अभ्यासिका सुरू केली. या शाळेतील त्यांचे दोन विद्यार्थी आमदार तर दहा विद्यार्थी नगरसेवक झाले आहेत. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने व मुंबई महापालिकेने महापौर पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. परिसरात झाडे लावणे, जोपासणे यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. या कामासाठी त्यांच्या शाळेला सलग सात वर्षे राज्यपालांच्या हस्ते देण्यात येणाऱ्या वृक्ष सन्मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. निवृत्तीनंतर सरोजताईंनी त्यांचे गाव ढवळी येथील शाळेकडे लक्ष दिले. आज 1000 लोकसंख्येच्या गावातील या शाळेत आजूबाजूच्या 12 गावातून मुले येतात. इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या त्या सचिव आहेत. NAAC ची अ श्रेणी प्राप्त असलेले हे महाविद्यालय, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र देखील चालवते.

सरोजताई रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ सदस्य आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील कठीण परिस्थितीत धडपडणार्‍या 10 शाळांवर त्यांनी सध्या लक्ष केंद्रीत केलेले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढील वाटचालीसाठी सरोजमाईंचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

Updated : 26 Jan 2022 5:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top