Home > News > अपक्ष व शिंदे गटात नाराजी?

अपक्ष व शिंदे गटात नाराजी?

अपक्ष व शिंदे गटात नाराजी?
X

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नव्हता. मात्र आता अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात नेमकं कुणाला स्थान असणार याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. त्यापार्श्वभुमीवर मॅक्स महाराष्ट्रच्या हाती महत्वपुर्ण माहिती आली आहे.

राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार त्यांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश दिले होते. तर दुसरीकडे सर्वच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून मुंबईत बोलवल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांची बैठक सुरू झाली आहे.

मंत्रीमंडळात स्थान कुणाला?

जळगाव जिल्ह्यातून शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांचे मंत्रीमंडळात स्थान निश्चित आहे. तर त्यासंदर्भात त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. तसेच नांदेड जिल्ह्यातील एकाही आमदाराला मुख्यमंत्र्यांचा फोन गेला नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातून संदीपान भुमरे आणि संजय शिरसाठ यांचे मंत्रीमंडळात स्थान निश्चित मानले जात आहे. मात्र अब्दुल सत्तार यांच्या मुलाचे नाव टीईटी घोटाळ्यात आल्याने त्यांना डावलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हे सगळं होत असताना अपक्ष आणि पाठींबा दिलेले जे मित्रपक्ष आहेत त्यातील कोणालाही या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळेल नाही. त्यामुळे अपक्ष व शिंदे गटातील काही आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे.

सांगली जिल्ह्यातून भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचे मंत्रीमंडळातील स्थान निश्चित मानले जात आहे. मात्र शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन गेला नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच विधानपरिषद आमदार गोपिचंद पडळकर यांना कार्यक्रमाला बोलवण्यात आले आहे. मात्र त्यांचे नाव मंत्रीमंडळाच्या यादीत नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी प्रतोद पदी नियुक्त केलेले भरत गोगावले यांना मंत्रीमंडळात निश्चित स्थान दिले जाणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. तसेच भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, असंही सूत्रांनी सांगितले आहे. तर महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी भरत गोगावले यांच्या नावाला संमती दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय असलेल्या राम शिंदे यांना मंत्रीमंडळात स्थान नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांचे मंत्रीमंडळातील स्थान निश्चित मानले जात आहे. त्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातून मोनिका राजळे यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड हे शिंदे गटाचे आमदार आहेत. मात्र या दोघांनाही मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र भाजपकडून संजय कुटे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Updated : 9 Aug 2022 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top