पोटगी थकवली म्हणून कोर्टाचा आपल्याच कर्मचाऱ्याला दणका!
X
पीडित पत्नी आणि मुलाची थकीत पोटगीची रक्कम वसुलीसाठी १ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या पगारातून वजा करण्याचे आदेश सोलापूर सत्र न्यायालयाने दिला आहे. न्यायमुर्ती व्ही. बी. चव्हाण यांनी हा निर्णय दिला.
सोलापूर न्यायालयातील कनिष्ठ लिपिक कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा विवाह १५ वर्षांपूर्वी पीडित महिलेसोबत झाला होता. लग्नानंतर सात वर्षांनी त्याने पत्नी आणि मुलास सांभाळण्यास नकार दिला. यामुळे पीडितेने घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदाअन्वये न्यायालयात दाद मागितली होती. दरम्यान, न्यायाधीश व्ही. बी. चव्हाण कोर्टाने पत्नीला दरमहा पाच हजार रुपये आणि मुलास दोन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये अंतरिम पोटगीचा आदेश पतीस दिलेला होता. तरीही या पतीने पोटगीची रक्कम दोन वर्षे थकीत ठेवली. यामुळे एकूण थकीत पोटगी रक्कम १ लाख ९६ हजार रुपये पतीकडून येणे बाकी होती. न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या पगारातून दरमहा सात हजार रुपये कपात करून ती रक्कम पत्नीच्या बँक खात्याला ऑनलाईन ट्रान्सफर करण्याचा आदेश अधीक्षक यांना दिला आहे. पीडित पत्नी आणि मुलातर्फे अॅड. श्रीनीवास कटकुर, अॅड. किरण कटकुर, आणि अॅड. आनंद सागर यांनी काम पाहिले.