Home > News > धक्कादायक : डॉक्टरच्या बोलण्यात येऊन जोडप्याने स्वतःच्याच बाळाला १ लाखात विकले...

धक्कादायक : डॉक्टरच्या बोलण्यात येऊन जोडप्याने स्वतःच्याच बाळाला १ लाखात विकले...

धक्कादायक : डॉक्टरच्या बोलण्यात येऊन जोडप्याने स्वतःच्याच बाळाला १ लाखात विकले...
X

एक लाख रुपयांमध्ये पाच दिवसाच्या बाळाची विक्री केल्याचा भयंकर प्रकार डोंबिवलीसारख्या सांस्कृतीक शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी डॉक्टरसह आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात जिल्हा महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने डॉक्टरांच्या आश्रमावर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी डॉ. केतन सोनी यांच्या आश्रमातून तब्बल 71 मुलांची सुटका करण्यात आली आहे.

बेकायदेशीरपणे या लहान मुलांना आश्रमात ठेवल्यामुळे डॉक्टर विरोधात कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात रामनगर आणि बाजारपेठ पोलिस तपास करत आहेत. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांसोबत डॉक्टर नेमकं काय करायचा याचाच तपास आता पोलिस करणार आहेत.

या सर्व मुलांची व्यवस्था भिवंडी आणि उल्हासनगरमधील बालसुधारगृहांमध्ये करण्यात आली आहे. आरोपी डॉक्टर सोनीच्या आश्रमात या मुलांच्या खाण्या-पिण्याची आबाळ होत होती तसेच प्रकृतीकडेही दुर्लक्ष केले जात होते. अनेकांच्या अंगावर व्यवस्थित कपडे देखील नव्हते. या मुलांची कोणतीही कागदोपत्री नोंद सापडलेली नाही. त्यामुळे या मुलांच्या आई-वडीलांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. या मुलांमध्ये विविध वयोगटातील मुलांचा समावेश आहे. तो खालील प्रमाणे :

12 ते 16 वर्ष वयोगटातील – 24 मुलं-मुली

1 ते 14 वर्ष वयोगटातील – 14 मुली

2 ते 10 वर्ष वयोगटातील – 33 मुलं-मुली

प्रकरण असं आलं उघडकीस?

डॉक्टर केतन सोनीने डोंबिवलीत राहणाऱ्या एका जोडप्याला त्यांचे नुकतेच जन्मलेले बाळ विकण्यास प्रवृत्त केले. बाळाच्या बदल्यात त्यांना 1 लाख रुपये देण्याची ऑफर दिली. दाम्पत्य गरीब असल्याने ते त्यांचं मूल काही गरजू जोडप्यांना विकू शकतात, जे बाळाची चांगली काळजी घेतील त्याचं संगोपन करतील, असे डॉक्टरने सुचवले होते. या जोडप्याने सुरुवातीला डॉक्टरच्या बोलण्यात येऊन ही ऑफर स्वीकारली होती. 10 नोव्हेंबर ला या महिलेने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर, ते जोडपं डॉक्टरांना भेटलं आणि त्यांच्या मुलाच्या मोबदल्यात 1 लाख रुपयांचा सौदा पक्का केला. या जोडप्याने डोंबिवलीतील फडके मंदिराजवळ 15 नोव्हेंबर ला बाळ डॉक्टर सोनीकडे सुपूर्द केले आणि पैसे घेतले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितली.

काही दिवसांनी या जोडप्याने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करत माघार घेतली आणि डॉक्टरांना आपलं मूल परत करण्यास सांगितलं. मात्र डॉक्टरांच्या नकारानंतर या जोडप्याने ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधला आणि त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने राम नगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळाला त्याच्या आई वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केले.

Updated : 27 Nov 2021 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top