Home > News > कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी सरकारसोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे: यशोमती ठाकूर

कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी सरकारसोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे: यशोमती ठाकूर

कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी सरकारसोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे: यशोमती ठाकूर
X

मुंबई: कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन हाती घेत आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला व बालविकास विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई तसेच इंडियन सायकियाट्रिक सोसायटी या संस्थांसोबत दोन सामंजस्य करार करण्यात आले.

कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पालकत्त्वाच्या नात्याने राज्य शासन समर्थपणे बजावत आहे. या बालकांना शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षणाच्या आदी सुविधा उपलब्ध करुन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. अशातच या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच मानसिक पुनर्वसनासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत ही बाब प्रशंसनीय आहे, असं ठाकूर म्हणल्यात.

राज्यात आतापर्यंत दोन्ही पालक गमावलेली 400 हून अधिक आणि एक पालक गमावलेल्या तेरा हजाराहून अधिक बालकांची माहिती शासनाला मिळाली आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती जमा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे. त्यानुसार माहिती प्राप्त झालेल्या बालकांच्या खात्यावर राज्य शासनामार्फत 5 लाख रुपये मुदत ठेव स्वरुपात ठेवणार आहे.

ही रक्कम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार असून मुलाचे वय 18 वर्षे झाल्यानंतर व्याजासह त्याला देण्यात येईल. तोपर्यंत दैनंदिन खर्चाच्या अनुषंगाने बालसंगोपन योजनेचा लाभ या बालकांना देण्यात येईल. तसेच या बालकांची मालमत्ता तसेच इतर कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारीदेखील टास्क फोर्सच्या माध्यमातून पार पाडली जाईल,असं मंत्री ठाकूर म्हणल्यात.

ॲड. ठाकूर यांनी पुढे सांगितले, राज्य शासन या बालकांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. तथापि, स्वयंसेवी संस्थांनीही या कामात पुढाकार घेतल्यास बालकांचे पुनर्वसन गतीने होऊ शकेल. त्यादृष्टीने प्रोजेक्ट मुंबई या एनजीओने दोन पालक गमावलेल्या बालकांचे शैक्षणिक शुल्क भरण्याची जबाबदारी स्वीकारुन पुढाकार घेतल्याबद्दल मंत्री ॲड. ठाकूर यांनी संस्थेचे कौतुक केले. तसेच बालकांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन सेवा आदींसाठी पुढाकारासाठी इंडियन सायकियाट्रिक सोसायटीबद्दलही गौरवोद्गार काढले.

Updated : 29 Jun 2021 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top