भाजपचे माजी मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत भाजपच्याच एका अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आला होता. bjp.org या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर भाजपच्या खासदारांचे फोटो आणि त्याखाली त्यांची नावे देण्यात आली आहेत. पण खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत त्यांच्या नावाच्या खाली एक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आला होता.
ही गोष्ट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निदर्शनास येताच, यांनी ट्विट करून याचा निषेध केला. त्याच बरोबर एका महिलेबाबत अशा पद्धतीने आक्षेपार्ह शब्द लिहणं योग्य नसल्याचे म्हणत भाजपाने यामागे कोण आहे हे शोधून कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्राचा सायबर क्राईम विभाग याचा शोध घेऊन कारवाई करेल, असा इशाराही दिला. यानंतर काही वेळाने भाजपची ती वेबसाईट अपडेट करण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्या नावापुढील तो आक्षेपार्ह शब्द काढण्यात आला आहे.
यानंतर रक्षा खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रीया देताना 'राज्याचे गृहमंत्री यांनी ही बाब निदर्शनास आणली हे चांगलं केलं, पण त्यांनी ही गोष्ट सोशल मिडियावर शेअर करायला नको होती. राज्यातील लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी हे सोशल मिडियावर प्रसिद्ध करणं चुकीचं होतं. त्याच बरोबर ही गोष्ट इतकी मोठी करण्यासारखी नाहीये. ती गोष्ट आता घडून गेलीये आणि या संदर्भात चौकशीचे आदेश भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. तसंच अनिल देशमुख यांनी देखील या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या एसपींसोबतही माझं बोलणं झालं आहे. नक्कीच ते योग्य मार्गाने चौकशी करतील आणि दौषींवर कारवाई करतील.' असं म्हणाल्या.
भाजपमधून नाराज होऊन एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. पण रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून त्या भाजपमध्येच आहेत. अशा पद्धतीने भाजपच्या एका महिला खासदाराबद्दल त्याच पक्षाच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह शब्द येण्यामागे कोण आहे? याचा शोध घेऊन पक्ष त्यावर कारवाई करेल का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.