Home > News > Bihar Election Result : ‘ये स्त्री है, ये कुछ भी कर सकती है’

Bihar Election Result : ‘ये स्त्री है, ये कुछ भी कर सकती है’

‘ये स्त्री है, ये कुछ भी कर सकती है’ या वाक्याचा अर्थ आणि बिहार निवडणुकीचा निकाल बघून राजकीय पक्षांनी स्त्रियांची ‘मन की बात’ समजून राजकारण करणं गरजेचं… स्त्री मतदारांकडे दुर्लक्ष करणं कसे भारी पडेल? यासंदर्भात वाचा लेखक वसुंधरा काशीकर यांचा लेख

Bihar Election Result : ‘ये स्त्री है, ये कुछ भी कर सकती है’
X

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हा हॉरर कॉमेडी आठवतोय का? त्यात एक संवाद आहे ‘ये स्त्री है! ये कुछ भी कर सकती है’!

पुरूषांना रात्री ओढून त्यांचे कपडे काढून गायब करणारी स्त्री... अख्ख्या गावातले पुरूष तिला टरकून असतात.

बिहारच्या विधानसभा निवडणूक निकालानं हा डायलॉग सत्य ठरवला आहे...’ये स्त्री है...! ये कुछ भी कर सकती है’...!

महिला हा वर्ग म्हणून संघटीत केल जाऊ शकतो आणि त्या वर्गाचं एकगठ्ठा मतात परिवर्तन केलं जाऊ शकतं हे नीतिश कुमार यांना २००५ सालीच लक्षात आलं होतं. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींना मोफत सायकल वाटप ही योजना त्यांनी जाहीर केली. हसत सायकल चालवत जाणाऱ्या मुलींचं लोभस चित्र २०१० ला नीतिश यांना विजयी करुन गेलं.

महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना ५० टक्के आरक्षण, मोफत राशन, सामाजिक सुरक्षा पेन्शन ४०० रुपयांवरुन ११०० रुपये करणे या योजनांचा आणि घोषणांचा लाभ थेट महिलांना झाला.

जीविका योजनेशी जोडल्या गेलेल्या १.५ कोटी महिलांच्या खात्यात थेट १० हजार जमा करण्यात आले. ‘हर घर में नल, हर घर में जल’ या योजनेमुळे कोटयवधी स्त्रियांचे डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणण्याचे श्रम वाचले.

याशिवाय लालूच्या जंगलराजची खरीखुरी भिती महिलांना होतीच. ती कॅश करण्यातही नीतिश यशस्वी ठरले. ‘घर से उठा ले जावे’…सारख्या गाण्यांमुळे घरातून मुली उचलून नेणे, बलात्कार करणे, अपहरण करण्याच्या आठवणी ठसठशीत झाल्या....

शेवटी स्वातंत्र्य ही माणसाची सर्वात मोठी आणि सुंदर भूक आहे. लालूंच्या जंगलराजमध्ये घरातून बाहेर पडणंही दुरापास्त झालं होतं तिथे हे सर्वच आश्वासक होतं. दीड कोटी महिलांच्या अकाऊंटला १० हजार भरले हे कॅश फॉर वोट आहे अशी टिका विरोधक करताहेत. ती रास्त असेलही. पण ५ रुपये सुद्धा हातात असणं ही जिथे चैन आहे तिथे १० हजारात किती स्वातंत्र्य मिळत असेल.

शिवाय राशन मोफत म्हणजे मुलाबाळांची किमान दोन वेळची जेवणाची सोय झाली. मध्यप्रदेशमध्ये अगदी मुस्लिम स्त्रियांनी सुद्धा भाजपला मतदान केलं ते याच लाडली बहनमुळे. यातून बायकांची इमानदारी तर दिसते. निर्धारानं बायका घरातून बाहेर पडल्या. या वेळेच्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्त्रियांची मतदानाची टक्केवारी आहे ७१.६ टक्के तर पुरूषांची आहे ६२.८ टक्के.

२०२० मध्ये स्त्रियांची मतदानाची टक्केवारी होती ५९.७ टक्के. म्हणजे २०२५ च्या निवडणुकीत स्त्रियांचे मतदान तब्बल ११ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. यातून स्त्रियांना वर्ग म्हणून संघटित करण्यात भाजप-नीतिश यशस्वी ठरले असं म्हणावं लागेल. याचा एक फायदा असा होणार आहे की, यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाला स्त्री मतदारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही आणि स्त्रियांना गृहीत धरूनही चालणार नाही. नोकरी करणारी कमावती बायको असेल तर बेजबाबदार आणि नालायक नवराही तीचं मन थोडं का होईना पैशांसाठी, स्वार्थासाठी सांभाळतो. तसं यापुढे एकगठ्ठा मतांसाठी राजकीय पक्षांना स्त्रीची ‘मन की बात’ समजून घ्यावी लागेल.

मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार निवडणुकींच्या निमित्तानं या अर्ध्या आकाशाचं स्वातंत्र्य आणि ताकद अधोरेखित झाली आहे.

वसुंधरा काशीकर

(लेखक, निवेदक, मुलाखतकार, स्वतंत्र पत्रकार, भाषा सल्लागार )

(साभार -सदर पोस्ट वसुंधरा काशीकर यांच्या फेसबुक भिंतीहून घेतली आहे)

Updated : 18 Nov 2025 3:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top