सध्या माध्यमांत कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे नेहमीच चर्चेला येणाऱ्या व्यक्तींमधे कंगना राणावत आणि अमृता फडणवीस यांचं नाव घेतलं जातं. या दोघींनीही सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली तर त्याची लगेच चर्चा होते. विशेष म्हणजे यांच्या पोस्टना सकारात्मक प्रतिक्रीया देणाऱ्यांपेक्षा त्यांना ट्रोल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
असो... आता दोघींची काही ट्वीट बघू
1) राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद...
वास्तविक या 'लेटरवॉर'वर राजकीय प्रतिक्रिया उमटणे हे स्वाभावीकच होते मात्र या वादातही कंगनाने आपला सहभाग नोंदवला.
'महाराष्ट्रातील गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडायला परवानगी दिली मात्र अगदी सुनियोजितपणे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. सोनिया सेना सध्या बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहे', असं ट्वीट कंगनाने केलं आहे.
तर अमृता फडणवीस यांनी ""वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!" असं ट्विट केलं आहे.
2) मुंबई पोलीसांवरली टीका
अमृता फडणवीस आणि कंगना या दोघींनीही मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिंन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर अनेकांनी त्यांना केलेल्या वक्तव्याची जाणीव करुन दिली होती. लोकांनी अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या गुन्ह्यांची अमृता फडणवीस यांना आठवण करुन दिली.
'मला मुव्ही माफिया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय,' असं ट्विट कंगनाने केलं. कंगनाच्या या ट्वीटनंतर तीच्यावर खुप टीका झाली.
अगदी असंच काहीसं ट्वीट त्यावेळी अमृता फडणवीस यांनीही केलं होतं. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी ""ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही." असं म्हटलं होतं.
3) JCB की खुदाई
'मेरे पास ना घर न द्वार,फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार' ? अस म्हणत अमृता फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
या सारखेपणामुळं अनघा आचार्य या ट्वीटर वापरकर्त्या महिलेने "कंगना आणि अमृता यांच्या Tweets च्या दर्जात झळकणारी बुद्धी व वृत्तीत कमालीचे साधर्म्य आढळते...!" अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.
या ट्वीट मुळे आम्ही खरचं अमृता फडणवीस महाराष्ट्राच्या कंगना राणावत बनतायत का? असा प्रश्न काही राज्यातील काही महिला नेत्यांना विचारला.
या बाबत बोलताना मनसे नेत्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, "महिलांचा राजकारणासाठी वापर हा खुप आधीपासून होत आहे. कंगना एक नटी आहे. पण अमृता फडणवीस यांनी असं वागणं अपेक्षीत नाही. कितीही झालं तरी त्या एका माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत याचं भान त्यांनी राखायला हवं" असं म्हटलं आहे.
"जो लोग ये गव्हरमेंट गिरानेकी कोशीश में है वही लोग अमृता जी और कंगना का PR हॅंडल कर रहे है" अशी प्रतिक्रीया आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रती शर्मा मेनन यांनी दिली आहे.
या विषया संदर्भात आम्ही शिवसेना आमदार मनिषा कायंदे व कॉंग्रेस नेत्या प्रिया दत्त यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या की, "महिला कोणतीही असो ती जर परखडपणे आपली भुमीका मांडत असेल तर आपण त्यांना ट्रोल न करता सभ्य भाषेत प्रश्न विचारावेत. पुरावे मागावेत किंवा स्पष्टीकरण मागावे. त्यांना ट्रोल करणे हा त्यावरचा उपाय नाही. त्या जे काही बोलत आहेत ते त्यांचं वैयक्तीत मतही असू शकतं." असं देसाई यांनी म्हटलं आहे.
कितीही झालं तरी कंगना ही एक अभिनेत्री आहे. तिचं बोलण लोकं एक कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात पण अमृता फडणवीस या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत. त्यांना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्या जे काही बोलतील ते सारासार विचारुन ट्वीट करण अपेक्षीत आहे.
कारण, या राज्यात अभिनेत्यांची मंदिरं बांधली जात नसली तर चांगलं काम करणाऱ्या नेत्याला देव्हाऱ्यात नक्कीच स्थान दिलं जातं.