"आशुडा, इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस” मयुरी देशमुखची पोस्ट
X
अभिनेता आशुतोष भाकरे याच्या अकाली निधनानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री मयुरी देशमुख पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. आशुतोषच्या जन्मदिनी (11 ऑगस्ट) केकचा फोटो शेअर करत मयुरीने भावनांना वाट मोकळी करुन दिली.
काय म्हणाली मयुरी?
“आशुडा, तुझ्या वाढदिवशी सर्वोत्तम केक तयार करता यावा, केवळ यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात 30 केक तयार केले. त्या सर्व 30 केक्सची पहिली चव तू चाखली होतीस, पण हा… 30 वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का? आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस.
आम्हाला माहित आहे की, तू उचललेले पाऊल भ्याडपणातून नाही, तर असहाय्यतेमुळेच होते, जे नैराश्यासोबत झालेल्या तुझ्या दीर्घकालीन संघर्षातून आले. पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आलो होतो. आपण किती चांगलं काम करत होतो. थोडं आणखी परिश्रम घ्यायची गरज होती. दररोज, प्रत्येक सेकंदाला, थोडासा जास्तीचा संयम, थोडेसे अधिक धैर्य आणि एक दीर्घ, निरोगी, आनंदी आयुष्य वाट पाहत होतं तुझी. आपली. मला अर्ध्या वाटेत सोडल्याबद्दल मी तुझ्यावर चिडावं की जितका वेळ माझ्यासोबत होतास याबद्दल कृतज्ञ असावं? पण त्याने काय फरक पडतो?
तुझ्या आत्म्याचा शांततेने प्रवास व्हावा आणि देवदूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत आहोत. देवदूतांचे ऐक. आता नेहमीसारखा हट्टीपणा करु नकोस.
मी, अभी, मम्मी, पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू आमच्यासोबत असताना आम्ही ते पुरेसे व्यक्त केले असावे, अशी आशा आहे. इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, मीदेखील तेच करेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझीच, #बायकोतुझीनवसाची
https://www.instagram.com/p/CDwNHRmgcJo/