Home > News > आर्वी येथे अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी पोलिसांनी कारवाई; प्रकरणाला वेगळे वळण..

आर्वी येथे अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी पोलिसांनी कारवाई; प्रकरणाला वेगळे वळण..

आर्वी येथे अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी पोलिसांनी कारवाई; प्रकरणाला वेगळे वळण..
X

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत महिला डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे. १३ वर्षीय मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी आर्वी पोलिसांनी महिला डॉक्टरसह मुलाच्या आई आणि वडिलांना अटक केली. तसेच अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांचा समावेश आहे.

प्रकरण नेमके काय?

शहरातील एका अल्पवयीन मुलीचे आणि अल्पवयीन मुलाचे एकमेकांवर प्रेम होते. याच प्रेमातून त्या मुलाने मुलीशी लैंगिक संबंध ठेवले. यामुळे त्या १३ वर्षांच्या मुलीला गर्भधारणा झाली. पीडित मुलगी ५ महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पण याबाबतची वाच्यता होऊ नये, यासाठी अल्पवयीन मुलाने पीडितेच्या घरच्यांना रस्त्यात अडवून बदनामी होईल, असे सांगून गर्भपात करण्याचा खर्च करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार, ८० हजार रुपयांत गर्भपात करण्यासाठी डॉ. सविता कदम यांनी तयारी दाखवली. आरोपींनी ३० हजार रुपये गर्भपातीआधी दिले आणि उर्वरित रक्कम नंतर देणार होते. त्यानुसार डॉ. कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात कऱण्यात आला. याबाबत आर्वी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डॉ. रेखा कदम यांना अटक केली.

बेकायदेशीरपणे अनेक गर्भपात केल्याचे उघड

पण या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात तपास करत असताना आणखी धक्कादायक माहिती समोर आली. डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात पुरलेल्या भ्रूण अवशेषासह अकरा कवट्या, रक्ताने माखलेले कपडे, एक गर्भपिशवी पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आणि पालिका पथकाला पाचारण करून डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले. यावेळी जमिनीत पुरलेले भ्रूण अवशेषासह चार ते अकरा कवट्या, रक्ताने माखलेले कपडे, एक गर्भपिशवी आढळून आले. सुमारे तीन ते चार तास खोदकाम सुरू होते. या सर्वांचे पोलिसांनी चित्रिकरण केले आहे.

डॉ. कदम यांच्या रुग्णालयामागील खड्डा बायोगॅस प्रकल्पाचा होता. मात्र, तो वापरात नसल्याने या खड्ड्यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी सापडलेले अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच ते हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे आहेत ते अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान या प्रकरणात डॉ. रेखा कदम यांचे पती डॉ. नीरज कदम यांनाही अटक करण्यात आली आहे, नीरज कदम हे आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होते. कदम यांच्या हॉस्पिटलमधील सरकारी औषधांचा साठादेखील सापडला आहे. तर हे हॉस्पिटल डॉ. नीरज कदम यांच्या आई डॉ. शैलजा कदम यांच्या नावावर आहे. तर डॉ. नीरज कदम यांचे वडील चाईल्ड स्पेशालिस्ट आहे. शहरातील हे जुने हॉस्पिटल असल्याने असे प्रकार गेल्या किती वर्षांपासून सुरू होते, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

दरम्यान पोलिसांना झडती दरम्यान कदम यांच्या घरातून काळविटाचे कातडे देखील सापडले आहे. त्यामुळे कदम कुटुंब हे आणखी कोणत्या प्रकरणात गुंतले होते का याचाही तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. तर काळविटाच्या कातडी प्रकरणी वनविभाग देखील कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

Updated : 17 Jan 2022 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top