#FarmersProstests : दिल्लीच्या संघर्षात महाराष्ट्राच्या माऊलीचा मृत्यू…
X
गेल्या ६४ दिवसांपासून दिल्लीत मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा जनआक्रोश लोटला आहे. या आंदोलनात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षात शेतकरी आणि मोदी सरकार मध्ये कृषी कायदा रद्द केला जावा याबद्दल अनेक चर्चेच्या फैरी झाल्या. पण त्या साऱ्याच निष्फळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांना राग आनावर झाला आणि देशाच्या प्रजास्ताक दिनीच २६ जानेवारीला दिल्लीच्या अनेक भागात हिंसाटार उसळला, या हिंसाचारानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झालं आहे. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटलेले असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू झाला आहे.
शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबरी गावातील स्थानिक रहिवाशी सिताबाई तडवी (वय ५६) यांचा २७ तारखेला मृत्यू झाला आहे. १६ जानेवारीपासून दिल्लीतील शहाजापूर सीमेवरील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. १६ जानेवारीपासून त्या दिल्लीतच होत्या, दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर काल २७ जानेवारीला त्या दिल्लीहून घरी नंदूरबारला परतत असताना, जयपूर स्थानकात त्यांची प्रकृती बिघडली आणि कडाक्याच्या थंडीमुळं त्यांचा मृत्यू झाला.
सिताबाई तडवी यांनी यापूर्वीही विविध आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. लोक संघर्ष मोर्चाच्या त्या सहकारी होत्या तसंच, शेतकऱ्यांच्या हक्कासांठी त्यांनी अनेक मोर्च्यात भागही घेतला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. लोकसंघर्ष मोर्चाचं उलगुलांन आंदोलन, आदिवासींच्या न्यायहक्कासाठी संघर्ष, अशा अनेक मोर्चात त्या नेहमी पुढे होत्या.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दिला होता. तसंच, २२ डिसेंबरला अंबानीविरोधात निघालेल्या मोर्च्यातही त्या सहभागी होत्या.