Home > News > वादळांशी झुंजते डाव नवा मांडते...

वादळांशी झुंजते डाव नवा मांडते...

पदरात तीन महिन्याचे बाळ असतानाच पतीचीही आयुष्यातून साथ सुटून जाते. यातून सावरणे कठीणच. मात्र वर्षा डगमगल्या नाहीत. दु:ख बाजूला करीत बाळाच्या भवितव्याकडे पाहत पुन्हा शेतीचा मार्ग धरला. जाणून घेऊया त्यांचा हा विलक्षण प्रेरणादायी प्रवास...

वादळांशी झुंजते डाव नवा मांडते...
X

पतीच्या पश्‍चात वर्षा आज शेतीचा डोलारा सांभाळीत आहेत. एकेकाळी तोडणीस आलेल्या द्राक्षबागेपासून त्यांची लढाई सुरु झाली होती. ही आठवण त्यांना आजही अस्वस्थ करते. इयत्ता 9वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर वयाच्या 17व्या वर्षी साकोरे येथील सुरेश बोरस्ते यांच्याशी वर्षा यांचा विवाह झाला. त्यावेळीही त्या शेतीत सक्रिय होत्या. भावी आयुष्याची स्वप्न पाहत असताना लग्नानंतर 4 वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. या बाळाचा जन्म दोघांनाही खूप आनंद देणारा होता. मात्र हा आनंद फारकाळ टिकला नाही. बाळ अवघे 3 महिन्याचे असतानाच पती सुरेश बोरस्ते यांचे अपघाती निधन झाले. त्या पूर्णपणे कोसळून गेल्या. काही दिवसांतच आपल्या बाळाचा विचार करून पुन्हा उभं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या घटनेनंतर काही वर्षे त्या एकत्रित कुटुंबात राहत होत्या. पुढे 2003 मध्ये कुटुंबाची विभागणी झाली. यात मुलगा आणि सासूबाई यांच्यासोबत त्या विभक्त झाल्या. त्यावेळी त्यांच्या वाट्याला 10 एकर शेती आली. या 10 एकरात द्राक्षबाग होती. ती अतिशय जुनी झालेली असल्यामुळे त्यात पहिल्या वर्षी फारसे उत्पन्न आले नाही. त्यामुळे दुसऱ्याच वर्षी त्यांनी नवीन द्राक्षबाग लावण्याचा निर्णय घेतला. नवीन द्राक्षबाग लावण्यासाठी अनेक अडचणी होत्या ज्यामध्ये मजूर तसेच बागेची औषधे पावडर, डिझेल यासाठी वाहतुकीचे साधन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भांडवल नव्हते. यासाठी सर्वप्रथम सोसायटीतून आणि इतर ठिकाणहून कर्ज घेतले तसेच मजुरांसाठी भावाकडून मदत घेतली. जुनी द्राक्षबाग टप्प्याटप्प्याने तोडून थॉमसन व्हरायटीची नवी द्राक्ष त्यांनी लावली. यामधून स्थिर उत्पन्न मिळू लागले. पुढे या शेतीतून आलेल्या उत्पन्नातून शेतावर एक कायमस्वरूपी मजूर आणि वाहतुकीसाठी एक मोटारसायकल खरेदी केली. हे सर्व करत असताना मुलाच्या शिक्षणाची आबाळ होणार नाही याकडेही त्यांचे लक्ष होते.

एके दिवशी द्राक्षबागेचे काही सल्लागार आले असता वर्षा यांनी एक्सपोर्टसाठी नाव नोंदणी करायचे असल्याचे त्यांना सांगितले. पण त्या एकट्याने निर्यातक्षम द्राक्षबाग व्यवस्थापन करु शकणार नाही असे त्या व्यक्तींनी सांगितले. यावर वर्षा यांनी समोरील व्यक्तींना तुम्ही नोंदणी करा आणि निर्यात यशस्वी नाही झाली तर पूर्ण शुल्क मी भरणार असे सांगितले. वर्षा यांची द्राक्षशेतीची ही जिद्द आणि आत्मविश्‍वास पाहता त्यांनी नोंदणी केली. त्या सल्लागारांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी शेतीत स्वतःला पूर्ण झोकून देत मेहनत घेतली आणि द्राक्ष निर्यात करून दाखवली. मात्र आयुष्यातील चढउतार कमी झाले नाहीत. 2014 मध्ये त्यांचा एकमेव आधार असलेल्या सासूबाईंना कर्करोगाचे निदान झाले. पुढच्या 4 महिन्यांतच त्यांचे निधन झाले. या काळात मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी होता. सर्व जबाबदारी वर्षा यांच्यावर आलेली होती. पूर्वी आलेल्या अनुभवांमुळे त्यांच्यात परिस्थितीशी लढण्याचे बळ हे आले होते. सुरुवातीला एक चुक झाली. एका वर्षी द्राक्षबागेच्या एका औषधाची मात्रा गरजेपेक्षा जास्त दिली गेली आणि 3 एकर द्राक्षबागेचे पूर्ण नुकसान झाले. हा अनुभव खूप शिकवणारा ठरला. या अशा घटनांकडे त्या एक अनुभव म्हणून पाहू लागल्या आणि त्यात सुधारणा करत गेल्या. पुढे जसजसे शेतीचे उत्पन्न वाढत गेले तसे पत्र्याचे जुने घर बदलून एक बांगला बांधला. शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केला. पिकामध्ये अत्याधुनिक सिंचन यंत्रणा स्थापित केली. मुलगा प्रीतम याने कृषी क्षेत्रातील पदवी घेतली. यथावकाश त्याचे लग्नही झाले. आज तो आणि पत्नीसह शेतीला हातभार लावत आहे. जे बाळ 3 महिन्याचे असताना आपल्या पतीचे निधन झाले. त्या बाळाचे संगोपन करून त्याला मोठे करुन त्यांनी एकप्रकारे पतीला श्रध्दांजलीच वाहीली आहे. आपल्या शेतीचा विकास झाला तर कुटुंबाचाही विकास होईल या भावनेने आपल्या मुलाप्रमाणे शेतीचेही त्याच मायेने संगोपन त्या आजवर करीत आल्या आहेत.

Updated : 29 Sep 2022 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top