Home > News > तंत्रज्ञानाच्या यूगात मातीतले खेळ का महत्वाचे? सुनेत्रा पवार यांचं डोळ्यात अंजन घालणारं भाषण

तंत्रज्ञानाच्या यूगात मातीतले खेळ का महत्वाचे? सुनेत्रा पवार यांचं डोळ्यात अंजन घालणारं भाषण

आपण हल्ली आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या जंजाळात असे अडकलो आहोत की स्वतःसोबत पर्यावरणाला देखील वेळ द्यायला विसरलो आहोत. त्यामुळेच आपली पुढची पिढी देखील मातीतले खेळ सोडून मोबाईल आणि स्मार्टफोनमध्ये गुंतलेली आहे. त्यामुळे मातीशी तुटलेली नाळ जोडण्यासाठी बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने मातीतल्या खेळांच्या जत्रेचं आयोजन केलं जातं. ही जत्रा Environmental Forum Of India दरवर्षी आयोजित करते. याच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारं भाषण केलं. असं काय म्हणाल्या सुनेत्रा ताई जाणून घेण्यासाठी वाचा हे भाषण....

तंत्रज्ञानाच्या यूगात मातीतले खेळ का महत्वाचे?  सुनेत्रा पवार यांचं डोळ्यात अंजन घालणारं भाषण
X

मातीचं वेड नाही असा माणूस जगात नाही. ही केवळ माती नाही, हिला आपण भूमाता म्हणतो. आई चा दर्जा देतो. हिच्या कुशीत शेतकरी खेळतो, धान्य पिकवतो. कामगार दिवसरात्र राबतो. पण हळूहळू या मातीची उब सोडून अनेकजण नको त्या व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. तुमच्या आमच्या घरी अशी व्यसनी लोकं तुम्हाला दिसतील. खास करून लहान मुले ही व्यसनाच्या आहारी गेली आहेत. डिजीटल क्रांती आणि ऑनलाइन स्कूल मुळे मोबाइल वापराचं प्रमाण वाढलंय, आणि घरोघरी अशी व्यसनी मुलांची फौज तयार झाली. लहान मुलं काय मोठी लोकं ही मोबाइल वरच्या चॅटींगमध्ये बिझी झालेली दिसतात. यामुळे शहरी कुपोषण, बौद्धीक विकासावर परिणाम, जाडेपणा, मानसिक आरोग्यावर परिणाम असे अनेक साइड इफेक्ट पाहायला मिळतात. यावर उपाय म्हणून आपण सुरू केलेल्या मातीतल्या खेळांच्या जत्रेची गरज आता सगळ्यांना कळायला लागलीय. लहानमोठ्या सगळ्यांनी या मातीत खेळलं पाहिजे, जरा धावलं पाहिजे.. शर्यतींमध्ये पळलं पाहिजे, पोत्यातल्या उड्या मारल्या पाहिजेत.. हे खेळ तुम्हाला निरोगी बनवतील. फार काही बोलत नाही, तुम्ही खेळून दमला असाल, जे स्पर्धक स्पर्धा जिंकले त्यांचे अभिनंदन, पण जे जिंकू शकले नाहीत, त्यांनी प्रॅक्टीस सुरू ठेवा. फक्त मी पुन्हा येईन म्हणून स्पर्धा जिंकता येत नाही, त्यासाठी विविध डावपेचांसहित सातत्य ही लागतं. खिलाडूवृत्ती लागते. ही खिलाडूवृत्ती अंगी बाणवूया. जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळूया

कोविडमुळे दोन वर्षाचा मोठा ब्रेक घेतल्यानंतर आज आपण ब्रेक के बाद, पण नव्या जोशाने परत आलो आहोत. हे परत येण्याचं भाग्य खूप कमी जणांना लाभतं, आपण भाग्यवान आहोत. कोविड सारख्या आपत्तीतून आपण वाचलो आणि एक नवीन जीवन अनुभवत आहोत. कोविडमध्ये आपण आपल्या अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून प्रार्थना करूया आणि या पुढच्या काळात या पृथ्वीला जगण्यासाठी अधिक चांगलं करण्याचा संकल्प करूया.

एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाचा वर्धापनदिन साजरा करताना माझ्या मनात नेहमीच संमिश्र भावना असतात. खरं तर आपण या पृथ्वीवर आलो याचं देणं आपण इथंच चुकवलं पाहिजे. वृक्षवल्ली आम्ही सोयरी म्हणणाऱ्या परंपरेतली आपण लोकं, तरीही ये जगातील सर्व पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी आपण सदैव पुढारलेलो राहिलोयत. पृथ्वीवरल्या इतर कुण्याही प्राण्याने पर्यावरणाचा ऱ्हास केला नाही, मात्र माणसाने तो केला. आज आपण त्याचे दुष्परिणाम भोगत आहोत. एकट्या कोविडने जगभरात ६३ लाख लोकांचा जीव घेतला. त्यातले अनेक जण सहव्याधींनी ग्रस्त होते. या सहव्याधी हे आपल्या बदललेल्या सवयी, जीवनमान यांची परतफेड आहे. निरोगी राहणं ही मुष्कील झालंय इतकं आपण या पर्यावरणाची हानी केलीय. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून जगभरातील विविध आकडेवारी मी चाळत होते, काही रिपोर्ट वाचले. जगातील प्रत्येक सहावा मृत्यू हा प्रदूषणामुळे होतोय. जवळपास ७४ टक्के मृत्यू हे वायूप्रदूषणामुळे होतायत, म्हणजे उद्या जर आपण केवळ वायूप्रदूषणानेच मरणार आहोत तर ही आत्महत्याच मानायला पाहिजे, कारण यासाठी आपणच जबाबदार आहोत. भारतात ही दर लाख मृत्यूंमागे जवळपास १७० मृत्यू प्रदूषणामुळे होतात. जल-वायू-भूमी सगळंच प्रदूषित आहे. आणि आता आपण मंगळावर वस्तीच्या शक्यता शोधायला लागलोय. सध्या पृथ्वीवर जर जगण्यासारखी परिस्थिती राहिली नाही तर मंगळावर जाता येईल यासाठी धनाढ्य लोकं बुकींग करायला लागलीयत. पृथ्वीसारख्या सुंदर जगाची वाट लावून आता आपण इतर ग्रह शोधायला लागलोयत. ही भूक नाही ही हाव आहे. आपण सगळ्या पर्यावरणाला ओरबाडून केवळ आपलंच नाही तर येणाऱ्या पिढ्यांचं जीवन ही संकटात टाकलं आहे. आपल्या सर्वांना भ्रूणहत्येचं पाप लागल्याशिवाय राहणार नाही. माझं बोलणं जरा कटू वाटेल पण डोळे उघडण्याची वेळी ही निघून गेलीय.

कधी कधी वाटते सगळीकडे निराशेचं वातावरण आहे, अशा परिस्थितीत आपण एकटे काय करणार. या पृथ्वीवर जवळपास ७ अब्ज लोकं राहतात. त्यात आपला जीव तो केवढा. पण आपण सर्वांनी इकडे तिकडे बागडणाऱ्या खारूताई पाहिल्या असतील. या खारू ताई मला लढण्याचा संदेश देतात. असं म्हणतात की रामसेतू बांधण्यासाठी खारू ताई ही आपला हातभार लावत होती. तिचा जीव छोटा पण मोठ्या कामात झोकून देण्याची वृत्ती तिच्या कडे होती. ही वृत्ती मी खारू ताई कडून घेतलीय. एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया चा जीव छोटा आहे, पण प्रभाव मोठा आहे.

पृथ्वीवरून मधमाशी नाहीशी झाली तर मानवजातीचा नाश होईल अशी एक थिअरी आहे. मधमाशी ही संपूर्ण जीवनचक्रातील महत्वाचा घटक आहे. मध्यंतरी सोलापूर मधल्या एका शेतकऱ्याची कहाणी प्रसिदध झाली होती. त्याच्या शेतात डाळींब लागवड केली होती पण फळ धरेना. शेवटी कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली तेव्हा लक्षात आलं की शेतात काही ठिकाणी मधमाशा मरून पडल्या होत्या. मधमाशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्याने फवारणी केली.. बाबा आता मधमाशाच मारल्या तर परागकण काय हाताने उचलून नेणार आहे काय? निसर्गाचं हे चक्र खूप महत्वाचं आहे. ते उलटं फिरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. एक एक बॅक्टेरीया ही महत्वाचा आहे.

त्यामुळे आपण या निसर्गाचं महत्व जाणून घेऊन काम केलं पाहिजे. अनेक लोकं या क्षेत्रात काम करताना दिसतायत. अशा काही लोकांचं उतराई होण्यासाठी, त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी ही आज आपण इथे एकत्र आलो आहोत. आज ज्यांचा गौरव करण्यात येणार आहे त्यांची माहिती आपल्या सर्वांनाच आहे. त्यांच्या कार्याची माहिती संक्षिप्त स्वरूपात आपल्याला लक्षात यावं म्हणून ध्वनीचित्रफित ही तयार करण्यात आली आहे. आपण सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम करूया.

शेवटी जाता जाता मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, फोरमच्या कामाची व्याप्ती वाढवण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. अनेकांना फोरमच्या कामाशी स्वतःला जोडून घ्यायचंय. अशा उत्साही नवीन कार्यकर्त्यांसाठी ही फोरम खुलं करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष फिल्‍डवर काम करू इच्छिणाऱ्या तरूण-तरूणींशी मी प्रत्यक्ष बोलून फोरमच्या कामासाठी निवडणार आहे. आपलं काम अधिक व्यापक होण्यासाठी यामुळे मदत होईल.

बाकी आज आपण सर्वच जण मातीतल्या खेळांची जत्रा अनुभवून आला आहात. अशाच स्वरूपाच्या जत्रा देशभर व्हायला पाहिजेत यासाठी काम केले पाहिजे. आपण करत असलेल्या कामांचा व्यापक प्रसार ही झाला पाहिजे यासाठी काम करण्याची गरज आहे.

कोविडनंतर कामाला सुरूवात करताना आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करूया.पुन्हा एकदा सगळ्यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

Updated : 10 Jun 2022 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top