Home > News > ६ व्या महिला साहित्य संम्मेलन यंदा पालघरमध्ये, खा. सुप्रिया सुळे देखील राहणार उपस्थित

६ व्या महिला साहित्य संम्मेलन यंदा पालघरमध्ये, खा. सुप्रिया सुळे देखील राहणार उपस्थित

६ व्या महिला साहित्य संम्मेलन यंदा पालघरमध्ये, खा. सुप्रिया सुळे देखील राहणार उपस्थित
X

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहाव्या महिला संमेलनाच्या यजमानपदाचा मान पालघर जिल्ह्याला मिळाला आहे. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून हे संमेलन ११ व १२ जून रोजी पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या दोन दिवसीय संमेलना मध्ये जिल्हावासीयांना भरगच्च कार्यक्रमाचा आस्वाद लुटता येणार आहे त्यामध्ये चर्चासत्र कवयित्री कट्टा, स्थानिक लेखकांचे पुस्तक प्रकाशन परिसंवाद व इतर अनेक कार्यक्रमा बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुद्धा असणार आहे. एकंदरच पालघर जिल्ह्यातील साहित्य रसिकांना दोन दिवस मनमुराद आनंद लुटता येणार आहे

ज्येष्ठ साहित्यिक मोनिका गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संम्मेलन संपन्न होणार आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री मधुरा वेलणकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रिय अध्यक्षा नमिता कीर सहभागी होणार असून या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे भूषविणार आहेत.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११ जून रोजी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली "आजची आत्मनिर्भर स्त्री" या चर्चासत्राचे आयोजन केले जाणार असून त्यानंतर "स्त्री साहित्याच्या बदलता दिशा, बदलते भान" हा परिसंवाद प्रा. मीना गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याच दिवशी कोमसाप मधील कवयित्रींसाठी आयोजित करण्यात आलेल्या कवयित्री कट्ट्याचे उद्घाटन आमदार मनीषा चौधरी यांच्या हस्ते होणार असून यावेळी ज्येष्ठ कवयित्री हेमांगी नेरकर या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. निमंत्रित कवयित्रींचे "उमलते शब्द" हे काव्यसंमेल डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आले आहे. याखेरीज पालघर जिल्ह्यातील स्थानिक लेखिकांचे पुस्तक प्रकाशन व मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी संमेलन समारोप शुभारंभ महिला बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकुर यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी ज्येष्ठ सुसंवादक मंगला खाडिलकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर "कवितेची लय... कवितेचा ताल" या महिलांनी लिहिलेल्या प्रसिद्ध कवितांवर आधारित पदन्यास सादर केला जाणार आहे.

या साहित्य संमेलनाचे आकर्षण असणाऱ्या "महिलांचे राजकीय आरक्षण कथा व व्यथा" हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून या परिसंवादाचे अध्यक्षस्थान मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर भूषविणार आहेत. या परिसंवादात आमदार प्रणिती शिंदे, नामदार अदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, वसई-विरार महानगरपालिकेच्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर व पालघरच्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले सहभागी होणार आहेत.

या संमेलनात विस्मृतीत जाणाऱ्या लोककलांना उजाळा देणारा "लोकरंग" कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री, लेखिका डॉ. निशिगंधा वाड तसेच ज्येष्ठ लेखिका, कवयित्री नीरजा सहभागी होणार आहेत.

महिला मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी रात्री पालघर जिल्ह्यातील महिलांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. साहित्य संमेलनात कला दालन, ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले जाणार असून या प्रसंगी स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे.

Updated : 10 Jun 2022 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top