Home > Max Woman Blog > तुला नवरा आहे,मला नवरा आहे,लगाओ ठप्पा,चलो बी हॅप्पी!

तुला नवरा आहे,मला नवरा आहे,लगाओ ठप्पा,चलो बी हॅप्पी!

तुला नवरा आहे,मला नवरा आहे,लगाओ ठप्पा,चलो बी हॅप्पी!
X

हळदीकुंकू समारंभ सुरू आहेत जिकडे तिकडे...

रंगीबिरंगी साड्या ,गळाभर दागिने,कुंकू आणि हळदीने माखलेली कपाळ ,गुलाल भरलेले भांग,गप्पाटप्पा,हास्याचे फवारे,किलबिलाट सुरू आहे चोहीकडे...

छान वाटतं,

स्त्रियांच्या चेहऱ्यावरचं हसू त्यांचा आनंद या जगातील सर्वात सुंदर, सर्वात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं.

पण हे समारंभ नवरा असणे आणि तो असणे म्हणजेच महद् भाग्य या बिंदूभोवती फिरतात जे स्त्रीजातीच्या आत्मसन्मानासाठी फारसं काही भूषणावह नाही असं वाटतं.

स्त्री ही कमकुवत, परावलंबी,आणि पर्यायाने दुय्यम असेच हे समारंभ दाखवून देतात असे वाटते.

नवऱ्यावर प्रेम असणे,नवऱ्याच्या दीर्घायुष्याची मनोकामना असणे या गोष्टींशी या समारंभाची सांगड घातल्याने आपल्या नवऱ्यावर आपले प्रेम आहेच,हे दाखवण्याची चढाओढच वाटतात हे समारंभ मला.

अश्या समारंभांमध्ये गेल्यावर असं वाटतं जणू,

की तुला नवरा आहे ,मला नवरा आहे,लावा कपाळावर ठप्पा त्याबद्दल आणि व्हा आनंदी...

या निमित्ताने तरी स्त्रिया एकत्र येतात ,गप्पाटप्पा मारतात हा कॉमन युक्तिवाद...

मग पुरुष ज्या निमित्ताने एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण करतात,ती निमित्ते स्त्रियांना का लागू नाहीत?

आणि हा युक्तिवाद फारसा पटत नाही,कारण कितीही म्हंटलं तरी बऱ्याच ठिकाणी विधवा,परित्यक्ता, प्रौढ अविवाहित,वंध्यत्व असलेल्या स्त्रियांना अश्या समारंभांमध्ये बोलावलं जात नाही ,किंवा बोलावलं तरी एक अवघडलेपणाची,किंवा उपकाराची भावना असते.

एखादीला पटत नसेल आणि तिने हळदीकुंकू मध्ये भाग नाही घेतला तर तिच्या नवऱ्यावरील,कुटुंबावरील प्रेमावर प्रश्नचिन्हही उभे केले जाऊ शकते.

नवरा कसाही,अगदी कसाही असला तरी कौटुंबिक सौख्य हे स्त्रियांसाठी अत्युच्च महत्वाचे असते त्यामुळे त्या हळदीकुंकू,कुटुंबासाठी उपासतापास करतात.

पुरुष मात्र बायका कशा कटकटी आणि वटवट करणाऱ्या असतात,त्या कशा बिचाऱ्या नवऱ्याला exploit करतात. याबद्दलचे विनोद व्हाट्सअप फेसबुकवर सातत्याने शेअर करून मनोरंजन करून घेताना दिसतात.

स्त्रिया करतात हो असे विनोद कधी?

काश...

असाही एखादा समारंभ असता ज्यात विवाहित पुरुष ,नटून थटून ,मला बायको आहे,तुला बायको आहे,लावा ठप्पा आणि व्हा आनंदी! असे म्हणताना दिसतील...

-साधना पवार

Updated : 29 Oct 2020 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top