यशोमती ठाकूर यांनी स्वीकारला मंत्रीपदाचा पदभार
X
महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (०९ जानेवारी) मंत्रालयात येऊन आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी वडील स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांना वंदन करत कामाला सुरूवात केली.
राज्यातील प्रत्येक महिलेला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवणं हेच आपलं ध्येय असल्याचं यशोमती ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केलं. या पदग्रहण सोहळ्याला महिला व बालवविकास मंत्रालयातील सचिव इंदिरा मालू आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
महिला आणि बालविकास खात्याची जबाबदारी मोठी आहे. राज्यातील महिला आणि मुलं अशी मिळून सुमारे ७० टक्के लोकसंख्या या खात्याशी संबंधित आहे. या सर्वांसाठी काम करणं हे आव्हात्मक असलं तरी सर्वांच्या सहकार्याने हे आव्हान पेलणार असल्याचं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
राज्यातील महिला स्वतःच्या पायावर कशाप्रकारे उभ्या रहातील, बचत गट आणखी कसे सक्षम होतील, यासाठी पुढील काळात विशेष आराखडा तयार करण्यात येणार आहे. महिला आयोगाकडे प्रलंबित असलेल्या केसेस लवकरात लवकर सुटण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक विभागात महिला आयोगाचे केंद्र उभारण्याचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासोबत अनाथ मुलं, बाल कामगार, बालगृहांसाठी नव्या योजना आणण्याचा विचार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात औक्षण करत यशोमती ताईंचं स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी कक्षाबाहेर रांगोळी काढण्यात आली होती. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात लोकांची मोठी गर्दी झाली. ज्येष्ठ पत्रकार, आजी-माजी सनदी अधिकारी, पदाधिकारी यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांचं अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.