Home > रिपोर्ट > बदाम सात!

बदाम सात!

बदाम सात!
X

'काय हलकल्लोळ माजवलाय? घर आहे की मासळीबाजार?' आजोबा, त्यांच्या नेहमीच्या शैलीत भर रंगात आलेला कार्यक्रम उधळून झोपायला गेले. दणक्यात सुरू असलेला डीजे लाईट गेल्यामुळे गपगार व्हावा, तशी घरात निरव शांतता पसरली. शुभम च्या मुंजीसाठी मुक्कामी आलेले वीस-तीस नातेवाईक दाटीवाटीने बसूनही जागरणाचा आनंद घेत होते, पण आजोबांनी मिठाचा खडा टाकला.

मात्र गप बसतील ते नातेवाईक कुठले. शेवटी सगळे एका रक्ताचे. किडे करण्याची खुमखुमीही प्रत्येकात. आजोबांचा मानही राखायचा, जागरणाचा आनंदही लुटायचा, शांत राहून धमाल मस्तीही करायची, म्हणजे नेमकं काय करता येईल, अशा विचारात मंडळी शक्कल लढवू लागली. हिरमुसलेली आजी जपाची माळ घेत सोफ्यावरून उठत बेडरूमच्या दिशेने जाऊ लागली, पण रेवा वहिनीने आजीला थांबवलं. आजीला मुळीच झोप आली नव्हती आणि सभात्याग करायचीदेखील तिची इच्छा नव्हती, हे पाहून वहिनीने आजीला पुन्हा सोफ्यावर बसवलं.

कच्चा लिंबू पार्टी त्याच गर्दीत आपापल्या आईच्या मांडीची उशी करून झोपी गेली होती. त्यामुळे त्यांची लुडबुड होण्याची शक्यता नव्हती. 'दमशेराज खेळूया का?' तन्वीने दबेल आवाजात सगळ्यांकडे बघत विचारले. पाच-दहा चित्रपट ओळखून झाले, पण खेळात रंग भरत नव्हता आणि त्यात रस नसलेली मंडळी हळू हळू मागे पुढे झोक जात डोलू लागली होती. एव्हाना खोलीतून आजोबांच्या घोरण्याचे आरोह-अवरोह सुरू झाले होते. पार्टी ऑन ठेवण्यासाठी संजू मामाने सर्वांसाठी जायफळयुक्त कॉफी करायची तयारी दाखवली. कोण कोण घेणार, विचारताच झोपाळलले हातही वर झाले. आजीनेही चार पेरांना अंगठा टेकवून 'दे घोटभर' म्हणत सहमती दर्शवली.

बाहेरच्या रातकिड्यांपेक्षा घरात जमलेल्या मंडळींची किरकिर जास्त. काहीच सुचेना म्हणून काखा वर करत दादाने 'चला यार, कॉफी पिऊन झोपूया, उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे', असं म्हणत नकारघंटा सुरू केली. तेवढ्यात कॉफीशी तादात्म्य पावलेल्या जायफळाच्या सुगंधाने किमया केली आणि दादाचा मूड आणि नूर पालटला. 'चला पत्ते खेळूया. चांगले दोन कॅट आणतो. असं स्वतःचं ठरवून तो कपाटातून कॅट घेऊन हजरही झाला. पत्ते खेळायच्या तयारीने मंडळीही सावरून बसली. डोक्याखालच्या उशा, लोड मांडीवर आले. पाच-दहा वेळा पत्ते पिसून झाल्यावर मिहीरने दादाच्या डोक्यात टपली मारली. 'नुसते पीसतोय काय, वाट आता, सगळे थांबलेत!'....'अरे पण काय खेळायचं ते आधी ठरवा', असं म्हणत दादाने पुन्हा एकदा दोन्ही कॅटची सरमिसळ केली.

'चॅलेंज'....'झब्बू'....'ब्रिज'...'मुंगूस'....'नॉट ऍट होम'....'जोड पत्ता'... 'पोकर'...'रमी...'

'अरे जरा हळू हळू... आजोबा बाहेर आले तर आपला पत्ता कट होईल आणि काय एक एक नावं घेताय, सगळ्यांना सगळे गेम येतातेत का ते बघा... काय गं मेघु तुला ब्रिज येतो का? नाही ना.... हे असं आहे. जाऊदे भिकार सावकार खेळू.' दादाच्या बोलण्यावर सगळ्यांनी त्यालाच पिसून काढायचा बाकी ठेवला होता. शेवटी आजीने फतवा काढला, बदाम सात खेळा आणि मलाही पानं द्या, मी सोफ्यावर बसून डाव खेळते.'

बदाम सात वर शिक्कामोर्तब झालं आणि प्रत्येकासमोर पानं आणि लगोलग कॉफीचे कप आले. हातात आलेली पानं बघून कोणी खुश तर कोणी धुसफुसू लागले. दादाची चिटिंगची सवय पाहता आई त्याच्यावर करडी नजर ठेवून होती, तर बाकीचे हातात पानांचा पिसारा फुलवून खेळायला सज्ज झाले. एकाच वेळी दोन बदाम सत्या गोलाकार रिंगणात आल्या. पहिले तीन राउंड पटापट पानं सत्तीच्या मागे पुढे लागत होती. मात्र चौथ्या राउंडनंतर पास-पासचा नारा सुरू झाला. प्रत्येक जण एक दुसऱ्याची अडवणूक करत होता. सत्ती बाहेर येईपर्यंत बाकीची पानं हातात खोळंबली होती. नजर चुकवून जो तो एकमेकांच्या पत्त्यांमध्ये डोकावू लागला. कॉफीनेही तळ गाठला.

ज्यांच्याकडे सत्ती होती ती मंडळी गालातल्या गालात हसत होती. सोफ्यावर बसलेल्या आजीचा कॅमेरा ड्रोनसारखा सगळ्यांच्या पत्त्यांवर फिरत होता. 'मिहीर किलवरची सत्ती टाक' आजीने आवाज वाढवताच किलवर पाठोपाठ इस्पिकची सत्तीपण बाहेर आली. सर्वांच्या हातात आता एक दोनच पानं शिल्लक होती, पण कोणीही 'वन पेज शुअर', 'टू पेज शुअर' ची हाळी देत नव्हता. कारण, दोन चौकटच्या सत्या अजून बाहेर आल्या नव्हत्या, त्यामुळे सगळ्यांचीच पानं अडली होती.

आजीचा ड्रोनपण काम करेनासा झाला. गेम पुढे हलेना. प्रत्येकाला सुटायची घाई होती. ज्यांच्या हाती चौकटची राणी, राजा आणि गुलाम होता ती मंडळी तर घायकुतीला आली होती. मात्र कोणीच सत्ती लावत नाही पाहून सरिता काकूने पत्ते जमिनीवर टाकले. तिचं पाहून काकानेही अंमलबजावणी केली. एक एक करत सगळ्यांची पानं धारातीर्थी पडली, पण त्या पानांत चौकट सत्तीच नव्हती. सर्वांनी आपली बैठक मोडून सत्तीचा शोध घेतला. तेवढ्यात शुभमने कूस बदलली आणि त्याच्या पाठीखाली दोन सत्या सापडल्या. मगाशी पानं वाटत असताना नेमक्या दोन सत्या शुभमला शरण गेल्या. तो उत्सवमूर्ती असल्याचे त्यांनाही कळले असावे. झोपलेल्या शुभमच्या मागे पहुडलेल्या दोन सत्यांसह दादाने सगळ्यांचा एक मस्त सेल्फी काढला आणि पहाटे तीनच्या सुमारास फेसबुकवर अपलोडसुद्धा केला.हॅशटॅग टाकला, जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा!

- भैरवी.

Updated : 15 May 2019 11:09 AM GMT
Next Story
Share it
Top