महिला बेरोजगार अन् सरकार झालंय जाहीरातबाज
Max Woman | 23 July 2019 6:36 PM IST
X
X
सध्या देशात एकच ओरड सतत ऐकायला, पाहायला मिळतेय... रोजगार गेला... रोजगार गेला...
तरुणाईसह भल्या-भल्या लोकांच्या हातचे रोजगार गेले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणासाठी मोठ- मोठ्या घोषणा देत वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन करतात तर दुसरीकडे अनेक महिला बेरोजगार होताना पाहायला मिळतात. नेमकं काय सत्य आहे... जाहीरातबाज सरकारने खरचं महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिलाय की बेरोजगारीच्या दारात आणून सोडलं पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
मुंबईतील टिळक नगर येथील आम्रपाली गर्ल्स हॉस्टेलमधून अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या १० महिला सफाई कामगारांना एकाच क्षणी नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं त्या महिलांकडून...
मी लक्ष्मी घोरपडे गेल्या २८ वर्षांपासून आम्रपाली हॉस्टेलमध्ये काम करत आहे. अचानक नोकरीवर येऊ नका सांगितलं. इतकी वर्ष मेहनतीने काम करुनही आम्हाला या नवीन लोकांनी कामावरुन काढून टाकलं आहे. माझ्या मुलांचं शिक्षण अजूनही सुरु आहे घरांचं भाडं अशा अनेक गोष्टी समोरं आहेत मात्र हातातला रोजगार गेला नाही. प्रामाणिकपणे काम करुनही आम्हाला कुत्र्यासारखं बाहेर फेकलं आहे.
मी अपर्णा कुडतडकर १८ वर्षापासून हॉस्टेलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं की तुम्ही १ जूनपासून कामावर यायच नाही कारण आम्ही नवीन लोकांना कामावर रुजू केलं आहे. आम्हा १० जणींच्या स्टाफला दूधातून माशी कशी फेकून देतात तसं आम्हाला या लोकांनी केलं आहे. नवीन मॅडमने आम्हाला कामावरुन काढून टाकलं. महिला असून महिलांवर अत्याचार केला आहे. आम्हा न्याय पाहिजे आम्हाला आमची नोकरी हवी आहे.

के सेल्वी..- गेल्या ११ वर्षापासून मी हॉस्टेलमध्ये कार्यरत होती मात्र आता अचानक कामावरुन काढून टाकल्यामुळे मला घराचं भाडं कसं देऊ असा प्रश्न पडला आहे. माझ्या कुटुंबात ४ जण असून मुलं कॉलेजला आहेत तर नवऱ्याच्या कमाईवर आमचं घरही चालत नाही. त्यांना कधी काम मिळतं कधी नाही त्यामुळे घर कसं चालू ही चिंता पडली आहे. आता पावसाळा सुरु झाल्याने कुठे नोकरीही मिळेना झाली.
गीता – मी तीन वर्षापासून आम्रपाली हॉस्टेलमध्ये काम करत होती. मी सुट्टीचा अर्ज देऊन गावी गेली होती मात्र जेव्हा मी आली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझा रोजगार गेल्याचं मला दररोज प्रमाणे कामावर गेल्यावर कळालं. कामावरुन टाकल्यानं माझं घर माझ्या लहान मुलांचं संगोपन शिक्षण कसं होईल. नोकरी गेल्यामुळे माझ्यावर मोठं संकट आलं आहे. आम्हा आमचा रोजगार पुन्हा मिळून द्या.
प्रमिला बोरीछा – ४०० रुपयांपासून मी काम करत आले आहे. गेल्या २७ वर्षापासून मी आम्रपाली गर्ल्स हॉस्टेलमध्ये काम करत आले आहे. मात्र काही शुल्लक कारणास्तव आम्हा १० सफाई कामगारांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. आमचं काय चुकलं असेल तर आम्ही माफी मागतो मात्र आम्हाला आमचा रोजगार द्या. १ जूनला मी कामावर गेली असता मी मस्टरवर सही करून कामाला सुरुवात करणारचं तोवर तेथील स्टाफने मला कामावर येऊ नका असं म्हटलं.

अनघा कुरतडकर, यास्मिन. अनिता कांबळे , कलावती, सुमन या महिलांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.
आम्रपाली गर्ल्स हॉस्टेल 1974 साली स्थापन झालं असून हे हॉस्टेल संस्थेमार्फत सुरु आहे. गेल्या अनेक वर्षापासून या महिला सफाई कामगार अर्धवेळ मॉर्निंग शिफ्ट नुसार काम करत होत्या मात्र नवीन व्यवस्थापनेच्या आदेशावर या महिलांना नोकरीवरुन काढण्यात आलं असं या महिलांनी सांगितलं आहे.
तर आम्ही दुसरीकडे आम्रपाली गर्ल्स हॉस्टेल निर्मला सावंत यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितलं की त्या महिलांना आम्ही नोकरीवरुन काढलं नाही. त्यावेळी आम्ही सांगितलं की त्या महिला मॅक्सवुमनच्या स्टुडिओत आल्या आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की, नवीन व्यवस्थापनेला कंत्राट सुरु करुन फुल टाईम सफाई कामगारांचा स्टाफ हवा होता त्यामुळे त्या महिलांना कामावरुन काढून टाकलं तसेच त्यांना आम्ही कंत्राटीमध्ये काम करा असं देखील म्हटलो आहे. असं निर्मला सावंत यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अनेकदा आम्ही त्यांच्याशी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोनही उचलला नाही.
दरम्यान या महिला आपल्याला रोजगार पुन्हा मिळावा यासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे देखील गेल्या होत्या त्यांनी देखील आश्वासनचं दिलं.
एकंदरित महिना होत आला आहे या महिलांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. आता पर्यंत त्यांना कुठेही रोजगार मिळाला नाही. त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला आमचा रोजगार पुन्हा मिळावा. मात्र संस्थेच्या नव्या व्यवस्थापनेनुसार सफाई कामगारांसाठी कंत्राटी पद्धत सुरु केली आहे.
सीएमआयई अहवालानुसार
आज पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिलाही नोकरी, व्यवसाय करु लागलेल्या आहे. यात आणखी भर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मोदी सरकारच्या काळात देशातील नागरिकांच्या हाताला काम मिळण्यापेक्षा कोट्यावधी लोकांच्या हातचे काम गेले आहे. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालात बेरोजगारीचे भयानक वास्तव समोर आले आहे. देशात 2018 मध्ये एक कोटी नऊ लाख कामगारांनी नोकरी गमावली असून यात सर्वात जास्त महिला बेरोजगार झाल्याचा अहवाल 'सीएमआयई' ने दिला आहे.
सर्वात जास्त महिला बेरोजगार
या अहवालानुसार सर्वात जास्त फटका ग्रामीण भागाला बसला असून तब्बल 88 लाख महिला 2018 मध्ये बेरोजगार झाल्या आहेत. त्यात शहरातील 23 लाख महिला बेरोजगार झाल्या असून यात सर्वाधिक 65 लाख महिला ग्रामीण भागातील आहेत.
मोदी सरकारच्या काळात बेरोजगारांची संख्या वाढली.
भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यात राहते. या अहवालानुसार शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करणाऱ्या कामगारांमध्ये बेरोजगारी प्रचंड आहे. हाताला काम नसल्याने शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरीभागातही 23 लाख महिला बेरोजगार झाल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. सरकारने रोजगार उपलब्ध करु असे आश्वासन देऊन स्त्रियांच्या हातातील रोजगार हिसकावून घेतला आहे अशी ओरड अनेक महिला करत आहे.
https://youtu.be/pHfqlzdC4ig
Updated : 23 July 2019 6:36 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire







