Home > रिपोर्ट > महिला लोकप्रतिनिधी आणि आपण

महिला लोकप्रतिनिधी आणि आपण

महिला लोकप्रतिनिधी आणि आपण
X

संसदीय राजकारणात महिलांना निवडून देणं असो की त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्याचा विषय असो आपल्या देशातील राजकीय पक्षांमध्ये कायम उदासीनता असल्याचं आजवरच्या अनुभवावरून सिद्ध होतं. याऊलट अप्रगत देशांमध्ये महिलांना संसदीय राजकारणात अधिकाधिक संधी देण्यात आली आहे. मात्र, भारतासारख्या सर्वार्थानं मोठ्या असलेल्या देशात गेल्या दहावर्षांपेक्षा अधिक काळापासून महिलांना संसद, विधिमंडळातही आरक्षण मिळवून देण्यासाठीचं विधेयक मंजूर करण्याबाबत सर्वच राजकीय पक्ष उदासीन असल्याचं दिसतं.

रवांडा सारख्या छोट्याशा देशात महिला प्रतिनिधींची संख्या देशातील इतर कुठल्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे...या देशात महिला लोकप्रतिनिधींचं प्रमाण हे सर्वात जास्त म्हणजे ६१ टक्के आहे. नंतर बोलेव्हिया (53 टक्‍के) व क्‍युबाचा (49 टक्‍के), फ्रान्स (39 टक्‍के), जर्मनी (37 टक्‍के), ब्रिटन (32 टक्‍के), चीन (24 टक्‍के) व अमेरिका (19 टक्‍के) या देशांचा क्रमांक नंतर लागतो. उत्तर युरोपातील स्कँडेनेव्हियन देशात ४० टक्क्यांपेक्षा अधिक महिला खासदार आहेत. बोलिव्हिया व दक्षिण आफ्रिकी देशात महिला खासदारांचे प्रमाण ४० टक्क्यांच्या पुढे आहे. नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशात महिला खासदारांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

या देशांच्या तुलनेत भारत हा सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश समजला जातो. तरीही महिला लोकप्रतिनिधींची संख्या तशी नगण्यच आहे. म्हणजे भारताच्या संसदेतील महिला प्रतिनिधींची संख्या फक्त १२ टक्के आहे. सुमारे १३३ कोटी लोकसंख्येच्या भारतामध्ये फक्त ६३ महिला खासदार असणं हे चांगलं लक्षण नाही. पण आजवरच्या संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच ६३ महिला खासदार निवडून आलेल्या आहेत, हे ही लक्षात घेण्यासारखं आहे.

लोकसभेतील महिला खासदारांची संख्या वर्षनिहाय

वर्ष संख्या

१९५२ २०

१९५७ २२

१९६२ ३१

१९६७ २०

१९७१ २१

१९७७ १९

१९८० २८

१९८४ ४२

१९८९ २९

१९९१ ३७

१९९६ ३७

१९९८ ४३

१९९९ ४९

२००४ ४५

२००९ ५८

२०१४ ६३

महिला खासदार...

भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत गेल्या ६६ वर्षात ८१८ महिला खासदार निवडून आल्या आहेत, यामध्ये लोकसभेच्या ६३२ तर राज्यसभेच्या १८६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत गेल्या ६६ वर्षात २१ महिला खासदारांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे. सन १९५२ पासून आजतागायत देशात १० हजार ९७० खासदार निवडले गेले आहेत, यामध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांची संख्या ही ८८५५ इतकी आहे तर २११५ खासदार राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

राजकीय पक्षांमध्येच महिलांबाबत उदासीनता

काँग्रेससारख्या सर्वात जुन्या पक्षाची सूत्रे इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्याकडे होती. मात्र, त्यांच्याही सत्ताकाळात महिला लोकप्रतिनिधी निवडून देण्याबाबत त्यांनीही फारशी उत्सुकता दाखवली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनीही आपापल्या राज्यात, पक्षामध्ये सत्तास्थानं उपभोगली आहेत मात्र, त्यांनाही आपल्या सत्ताकाळात महिला लोकप्रतिनिधींची संख्या वाढवता आलेली नाही, हे दुर्देव म्हणावं लागेल.

महिला खासदार निवडून देण्यात उत्तरप्रदेश आघाडीवर

पहिल्या लोकसभेपासून ते आजपर्यंत उत्तर प्रदेश या राज्याने १३९४ खासदार लोकसभेवर निवडून दिले ,यामध्ये १२१ महिला खासदारांचा समावेश आहे. पश्चिम बंगालने ६५, मध्यप्रदेश- ६२, बिहार- ५९, महाराष्ट्र- ४६, आंध्रप्रदेश- ४५, राजस्थान- ३०, गुजरात -२७, पंजाब- २४ ,तामिळनाडू- २३,ओडिशा- १६, कर्नाटक १५, आसाम - १५ तर दिल्लीतून १३ महिला खासदार आजपर्यंत लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

राज्यसभेवर राजकरणाऱ्या महिला खासदार

राज्यसभेवर सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदारांमध्ये श्रीमती नजमा हेपतुल्ला या ६ वेळा राज्यसभेवर निवडून आल्या आहेत, यापैकी त्या चार वेळा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. याबरोबरच श्रीमती अंबिका सोनी (५ वेळ), श्रीमती जया बच्चन (३ वेळ), श्रीमती रेणुका चौधरी (३ वेळ), श्रीमती झरणा दास, श्रीमती कनीमोझी, श्रीमती निर्मला सीतारामन, श्रीमती वानसुक, श्रीमती विप्लव्वा ठाकूर (२ वेळ) यांचा यात समावेश आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ आणि महिला

१६ व्या लोकसभेनंतर स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ९ महिलांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यात ६ जणींना कॅबिनेट तर ३ जणींना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. याआधी इंदिरा गांधींच्या रूपात देशाला पहिली महिला पंतप्रधान मिळाली होती.

महिला मुख्यमंत्री

शीला दीक्षित (नवी दिल्ली), मायावती (उत्तरप्रदेश), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), जयललिता (तामिळनाडू), वसंधुरराजे सिंधिया (राजस्थान) राबडीदेवी (बिहार) राजिंदर कौर भट्टल (पंजाब), जम्मू-काश्मीर (महबूबा मुफ्ती सईद) सुचेता कृपलानी (उत्तरप्रदेश), नंदिनी सत्पथी (ओदिशा), उमाभारती (मध्यप्रदेश), शशीकला काकोदकर (गोवा), सुषमा स्वराज (दिल्ली), आनंदीबेन पटेल (गुजरात), जानकी रामचंद्रन (तामिळनाडू)

महाराष्ट्रातील महिला लोकप्रतिनिधी

गेल्या ६६ वर्षांत महाराष्ट्रातून फक्त ४६ महिला खासदार लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. या ६६ वर्षात महाराष्ट्रातून ६८७ खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत, यामध्ये ४६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेवर आजतागायत निवडल्या गेलेल्या २११५ खासदारांपैकी महाराष्ट्रातून १५१ खासदार निवडले गेले, यामध्ये महाराष्ट्रातील १४ महिला खासदारांचा समावेश आहे. राष्ट्रपतींनी आजपर्यंत देशातील १३३ खासदारांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले ,यामध्ये २१ महिला खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून आजपर्यंत ७ महिलांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला लोकप्रतिनिधी

१४ एप्रिल २०११ रोजी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ती ५० टक्क्यांपर्यंत करण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. या निर्णयानंतर सध्या राज्यातील ३३ जि.प.मध्ये ९८१ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. तर राज्यातील २७ हजार ९०६ ग्रामपंचायतीमध्ये १ लाख १४ हजार महिला सदस्य निवडून आल्या आहेत. त्याचप्रमाणे ३५१ पं.समिती, २६ महापालिका, २२० नगरपरिषदांमध्येही ५० टक्के महिला सदस्य निवडून आल्या आहेत.

राज्य मंत्रिमंडळातील महिला मंत्री

राज्य मंत्रिमंडळात पंकजा मुंडे या एकमेव कॅबिनेट तर वर्षा ठाकूर या एकमेव महिला राज्यमंत्री आहेत.

लोकसभा –

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ६ महिला खासदार लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामध्ये चार भाजप आणि ऱाष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

राज्यसभा –

महाराष्ट्रातून सध्या राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण या एकमेव खासदार आहेत. महाराष्ट्रातून १९ खासदार राज्यसभेवर निवडून दिले जातात. त्यापैकी फक्त एकट्या वंदना चव्हाण यांनाच राज्यसभेवर संधी मिळाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा – एकूण जागा - २८८

विधानसभा एकूण महिला आमदार = 22

भाजप = 12

काँग्रेस – 05

राष्ट्रवादी काँग्रेस – 0

शिवसेना – ०१

महाराष्ट्र विधानपरिषद – एकूण जागा – ७८

विधानपरिषद एकूण महिला आमदार – ५

शिवसेना – २

भाजप – १

काँग्रेस – १

राष्ट्रवादी काँग्रेस – १

राज्यनिहाय महिला खासदारांची संख्या

लोकसभेतील महिला खासदार

आंध्रप्रदेश

दोन महिला खासदार – दोन्ही वायएसआर काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.

आसाम

दोन महिला खासदार – काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर दोन्ही निवडून आल्या आहेत.

बिहार

बिहारमधून तीन महिला खासदार लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यात लोकजनशक्ती पार्टी, भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक महिला खासदार निवडून आल्या आहेत.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये एकमेव महिला खासदार भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.

गुजरात

गुजरातमध्ये पाचही महिला खासदार भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत.

कर्नाटक

कर्नाटकमध्ये एकमेव महिला खासदार आहेत, त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत.

केरळ

केरळमधूनही एकमेव महिला खासदार सीपीआय (एम) च्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.

मध्यप्रदेश

पाच लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या महिला खासदार या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत.

महाराष्ट्र

महाराष्ट्रातून ६ महिला खासदार लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामध्ये चार भाजप आणि ऱाष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

ओदिशा

ओदिशामधून तीन महिला खासदार बिजू जनता दलाच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत.

पंजाब

पंजाबमधून शिरोमणी अकाली दलाच्या हरसीम्रत कौर-बादल या एकमेव खासदार निवडून आल्या. त्या सध्या केंद्रात अन्न व प्रक्रिया उद्योग खात्याचं कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

राजस्थान

भाजपच्या संतोष अहलावत या एकमेव खासदार लोकसभेवर निवडून आल्या.

तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये चार महिला खासदार आहेत. त्या चारही एआयएडीएमकेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.

तेलंगण

तेलंगणमध्ये एकमेव महिला खासदार या तेलंगण राष्ट्र समितीच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.

उत्तरप्रदेश

सर्वात जास्त १४ महिला खासदार या उत्तरप्रदेशातून निवडून आलेल्या आहेत. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १० तर अपना दल, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलाच्या एका महिला खासदाराचा समावेश आहे. यात उमाभारत या केंद्रात कॅबिनेट मंत्री, मनेका गांधी कॅबिनेट मंत्री, अनुप्रिया पटेल (अपना दल) या केंद्रात राज्यमंत्री, कृष्णाराज केंद्रीय राज्यमंत्री, साध्वी निरंजन ज्योती केंद्रीय राज्यमंत्री...

भाजपच्या १० पैकी ६ महिला खासदारांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामध्ये दोघीजणींना कॅबिनेट तर ४ जणींना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

उत्तराखंड

एकमेव महिला खासदार भाजपच्या आहेत.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधूनही १४ महिला खासदार निवडून आल्या आहेत. त्यात आँल इंडिया तृणमुल काँग्रेसच्या १३ आणि काँग्रेसच्या १ अशा एकूण १४ खासदार लोकसभेत आहेत.

चंडीगड

किरण खेर या भाजपच्या तिकिटाव खासदार आहेत.

नवी दिल्ली (एनसीटी)

मिनाक्षी लेखी, भाजच्या खासदार आहेत.

पक्षनिहाय महिला खासदार (लोकसभा)

भाजप – ३१

तृणमुल काँग्रेस – १२

एआयएडीएमके – ४

काँग्रेस – ४

बिजू जनता दल – ३

वायएसआर काँग्रेस – २

अपना दल – १

सीपीआय (एम) – १

लोकजनशक्ती पार्टी – १

राष्ट्रवादी काँग्रेस – १

राष्ट्रीय लोकदल – १

समाजवादी पार्टी – १

शिरोमणी अकाली दल – १

शिवसेना – १

तेलंगण राष्ट्र समिती – १

राज्यसभा

राज्यसभेतल्या एकूण २४५ जागांपैकी २८ जागांवर महिला खासदार आहेत.

भाजप – ७, काँग्रेस ७, तृणमुल काँग्रेस - २, एआयएडीएमके - २, समाजवादी पार्टी – २ राष्ट्रीय जनता दल – १, जनता दल (सेक्यूलर) - १, राष्ट्रवादी काँग्रेस – १, बिजू जनता दल – १, सीपीआय (एम) – १, डीएमके – १

Updated : 7 March 2019 1:34 AM GMT
Next Story
Share it
Top