३७ रूपये दररोज कमवणाऱ्या अन्नपूर्णा उपोषणावर...
X
बिहार - सगळयांना पोषक आहार मिळायला पाहिजे अशी सरकारची योजना आहे, धोरण आहे. हे पोषण आहार मिळण्याची अंतिमतः जबाबदारी कुणाची असेल तर ती महिलांची असते. शाळांमधून मध्यान्ह भोजनाच्या योजनेचा कणा असलेल्या महिलांच्या समस्यांकडे वर्षानुवर्षे कोणीच पाहिलेलं नाहीय, शेवटी आज या सर्व अन्नपूर्णा एक महिन्यापेक्षा जास्त काळ साखळी उपोषण करतायत. मध्यान्ह भोजनाशी संबंधित बिहारमधले जवळपास अडीच लाख लोक गेले महिना भर आंदोलन करतायत. सरकारी आकडेवारी नुसार बिहारमध्ये ७१ हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत, ज्यामध्ये जवळपास २ लाख ४८ हजार स्वयंपाकी सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करतात. तीनशे मुलांचं जेवण केल्यावर या स्वयंपाकी महिलांना दिवसाला ३७ रूपये मिळतात. म्हणजेच महिन्याचे १२५० रूपये. सध्या देशात जवळपास ३० लाख स्वयंपाकी-मदतनीस काम करतायत, ज्यातल्या ९० टक्के महिला आहेत. सरकारी आकडेवारीनुसार देशात २५ लाख स्वयंपाकींपैकी ४० टक्के हे अनुसुचित जाती-जमातींचे आहेत. एकल महिला, दलित, आदिवासी किंवा कमजोर घटकांतील महिलांचा या मध्यान्ह भोजन योजनेत मोलाचा सहभाग आहे. देश सशक्त करण्यासाठी झटणाऱ्या या महिलांना मात्र सरकारने कमी मानधन देऊन अशक्त करून ठेवलंय.