बंदीवान महिलांची कारागृहात हरित क्रांती
X
कारागृह म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अंधाऱ्या कोठडीतील कैदी उभे राहतात. गजाआड चालणाऱ्या त्यांच्या आयुष्यापासून आपण पुर्णपणे अनभिज्ञ असतो. त्यात महिला कैदी म्हटलं की आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनचं बदलतो. मात्र आज आपण अशा महिला कैदींना भेटणार आहोत ज्यांच्याकडे बघून तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.
पुण्यायातील येरवाड्याच्या कारागृहात या बंदीवान महिला शेती करतात. होय..बरोबर ऐकलत शेतीच आणि शेतीमधून चांगलं उत्पन्नही मिळवतात. कारागृहातील शेतीमधून त्यांच्या जगण्याला एक नवा मार्ग मिळाला आहे. आनंदाने त्या या शेतात राबतात आणि आपल्या दुखांना काही काळ का होईना विसरून जातात.
पुण्यातील येरवडा कारागहात महिलांनी पिकवलेली शेती ही सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरलीय. शेती उत्पादनात थोडथोडके नव्हे तर चक्क 31 लाख 38 हजारांचे उत्पन्न मिळवून दाखवलं.
https://youtu.be/BuEfL4hpp1M
येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाचे शेतीकरीता 17 एकरचे क्षेत्र आहे. शेतीला विहीरीतून पाणी पुरवठा केला जातो. पाण्यासाठी नियोजित बैठकीत ठरल्याप्रमाणे कुठल्या वेळी कोणते पीक घ्यायचे, त्यासाठी आवश्यक ती खते, बी - बियाणे यांची खरेदी करायची याचा निर्णय प्रशासकीय विभाग घेत. त्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते अशी माहिती महिला कारागृह अधिक्षक स्वाती पवार यांनी दिली.
महिला कारागृहात एकूण 295 महिला बंदी आहेत. 22 लहान मुलांचा समावेश आहे. सध्या 40 महिला बंदी शेतकरी म्हणून काम करताहेत. राजगिरा, आंबटचूका, कडीपत्ता, अळु पाने, पालक , शेपू, मेथी, करडई याबरोबरच कांदा पात, कोथिंबीर पालेभाज्यांची शेती पिकवतात. याशिवाय वांगी, डांगर, भेंडी, टोमॅटो, घोसावळे, कारले, पावटा, मुळा, चवळी शेंग, दुधी भोपळा, रताळे कोबी अशीही पिके घेतली जातात. या महिला शेतीत राबताना आपला भुतकाळ विसरुन प्रामाणिक कष्टातून एक चांगला पायंडा घालत आहेत.
- आदित्य भवर , प्रतिनिधी






