Home > रिपोर्ट > जिंकली मने...

जिंकली मने...

जिंकली मने...
X

‘पिपाणी वाजवणाऱ्या चारुलता पटेल आजी आणि त्यांचा आशीर्वाद घेणारे विराट कोहली आणि रोहित शर्मा, माही भाई आणि विराटची मैत्री, झिवा धोनीची बाबांचा उत्साह वाढवणारी व्हायरल होणारी छायाचित्रे आणि व्हिडियोज, ‘दस रुपयेकी पेप्सी, रोहित शर्मा सेक्सी’ असं चाहत्यांचं रोहितला प्रोत्साहन देणं, भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी ‘शेवटी वडीलच जिंकतात’ अशी उमटलेली हास्यटिप्पणी या आणि अशा अनेक विनोदी तितक्याच मनाला भिडणाऱ्या विश्वचषक सामन्यातील भावनिक प्रसंगांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. हे वातावरण अजून आठवडाभर तसेच असणार आहे. पुढच्या रविवारी विश्वविजेता संघ कोणता आहे, ते कळणार आहे. ही उत्सुकताच इतकी मोठी आहे की तिने मालिकांमध्ये पुढे काय घडणार, या उत्सुकतेला सध्यातरी मागे टाकलं आहे..

खेळाच्या वाहिन्या, संगीत वाहिन्या, हिंदी आणि मराठी (एकूणच भारतीय प्रादेशिक वाहिन्या) मनोरंजन वाहिन्या, चित्रपट वाहिन्या अशी टीआरपीची चुरस होती. परंतु त्यामध्ये १६ जूनपासून खेळाच्या वाहिन्यांनी जबरदस्त आघाडी घेतली, ती अजूनही टिकून आहे. ही आघाडी अजून आठवडाभर टिकून राहणार आहे. ३० मेपासून विश्वचषक सामन्यांना सुरुवात झाली, परंतु भारत आणि पाकिस्तानमध्ये १६ जूनला पहिला सामना झाला, त्याला दूरचित्रवाणीवर सर्वात जास्त प्रेक्षकसंख्या मिळाली. दूरचित्रवाणीसाठी त्या आठवडय़ातील तो सर्वात मोठा सोहळा झाला होता. त्याच दरम्यान रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ चित्रपटाच्या झी सिनेमावरील वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला उत्तम प्रतिसाद मिळाला नाही. विद्युत जामवालच्या ‘जंगली’ चित्रपटाला मात्र स्टार गोल्डवर त्याच्याहून अधिक प्रेक्षकसंख्या मिळाली. आता झी सिनेमावर शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व, कोण होणार करोडपती, एक टप्पा आऊट, चला हवा येऊ द्या, कानाला खडा, झिंग झिंग झिंगाट, होम मिनिस्टर या कथाबाह्य़ कार्यक्रमांमध्ये ‘चला हवा येऊ द्या’चीच चर्चा अधिक होते आहे. रविवारी ‘चला हवा येऊ द्या’चा हास्यधमाका विशेष भाग पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘एक टप्पा आऊ ट’ हा कार्यक्रमही पुढील दोन आठवडय़ांत प्रेक्षकमनाची पकड घेईल, असे दिसते आहे. पौराणिक, ऐतिहासिक मालिकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी, श्री गुरुदेव दत्त, विठुमाऊली, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, श्री लक्ष्मी नारायण या मालिका प्रेक्षकांच्या दिमतीला आहेत. या मालिकांनी आपापला वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. त्यामुळे हा प्रेक्षक क्रिकेट सामने पाहतानाच या मालिकांसाठी वेगळा वेळ काढेल, अशी अपेक्षा आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत ईशा आई होणार आहे, त्यामुळे राजनंदिनी की ईशा या दोन ओळखींचं तिच्या मनामध्ये द्वंद्व सुरू झालं आहे. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अखेर गुरुनाथला राधिकाने धडा शिकवला आहे. आता राधिकाचं आयुष्य नव्याने सुरू होणार असल्याची आशा पल्लवित झाली आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या नव्या मालिकेत मिसेस मुख्यमंत्र्यांच्या शोधाला सुरुवात झाली आहे.

कलर्स वाहिनीवरील ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेत शिवाच्या वागण्यामध्ये अचानक झालेला बदल बघून सिद्धी आणि घरातील सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांच्यामध्ये प्रेम फुलताना पाहायला मिळेल की काही वेगळेच वळण येईल, हे रविवारच्या एक तासाच्या विशेष भागामध्ये पाहायला मिळणार आहे. झी मराठीवर ‘अग्गंबाई सासूबाई’ ही नवी मालिका २२ जुलैपासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रसारित झाला. या मालिकेत तेजश्री प्रधान, रवि पटवर्धन, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

विविध मनोरंजन वाहिन्यांमधील चुरस कमी होऊन या आठवडय़ात मनोरंजन वाहिन्यांविरुद्ध खेळाच्या वाहिन्या असे चित्र पाहायला मिळाले. हे चित्र विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापासून रंगू लागले होते. पण भारत-पाकिस्तान सामन्यापासून या चित्रातला रंग अधिक गहिरा झाला. मनोरंजन वाहिन्यांविरुद्ध खेळाच्या वाहिन्या असा उल्लेख करण्याचे कारण असे की विश्वचषक सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवरून करण्याचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आल्यावर वाहिनीने यावर्षी जबरदस्त भाषिक खेळी केली.

एकीकडे क्रिकेट हा नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकणारा खेळ, तर दुसरीकडे या वाहिनीची भाषिक खेळी याने जबरदस्त प्रभाव पडला. इतका की टीआरपीच्या आकडेवारीत खेळाच्या वाहिन्यांमध्ये पहिल्या पाच स्थानावर स्टार स्पोर्ट्सच्याच विविध भाषिक वाहिन्या एकापाठोपाठ एक आल्या. त्याचं झालं असं की, तळागाळातला प्रेक्षक सामन्यांकडे खेचून आणण्यासाठी सोनी आणि स्टार या दोन्ही समूहांनी प्रादेशिक भाषांतील वाहिन्या गेल्या वर्षांपासून सुरू केल्या. यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये स्टार समूहाने माहिती प्रसारण मंत्रालयाकडून सात भाषांची खेळाच्या वाहिन्यांसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश होता. पण अद्याप मराठीमध्ये खेळाची वाहिनी सुरूच झाली नाही. ‘मराठी बोला चळवळ’ या ट्विटरवरील उपक्रमाअंतर्गत विवेक तेरवणकर या तरुणाने ८३ कोटी मराठी प्रेक्षकांना मराठी खेळाची वाहिनी हवी असताना मराठी वाहिनी सुरू करणार असे आश्वासन देऊ न का सुरू केली नाही, हा मुद्दा ट्विटरवर उपस्थित केला. त्याला पाठिंबा देत अनेकांनी स्टार स्पोर्ट्सला धारेवर धरले. एकीकडे सामने रंगात आले असताना ट्विटरवर भाषिक युद्ध सुरू होते.

हिंदी आणि इंग्रजीबरोबर कन्नड, बांगला, तेलुगु आणि तमिळ भाषेत वाहिन्या सुरू झाल्या. पण मराठी वाहिनी मात्र सुरूच झाली नाही. तरीपण या भाषिक आधारावर वाहिनीने विश्वचषकाच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना भावनिकरीत्याही जिंकलं. मराठी प्रेक्षकांना पुन्हा हिंदी वाहिनीवरच समाधान मानावं लागलं. विक्रांत सरंजामे, गुरुनाथ सुभेदार, अण्णा नाईक, राणादा, शिवा लष्करे, विश्वास आणि निखिल या दूरचित्रवाणीवरील आवडत्या व्यक्तिरेखांची जागा धोनी, विराट, रोहित, बुमराह, हार्दिक पंडय़ा यांनी घेतली.

भक्ती परब

bhaktiparab12@gmail.com

Updated : 7 July 2019 11:21 AM GMT
Next Story
Share it
Top