Home > रिपोर्ट > तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं!

तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं!

तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं!
X

आपल्या स्मित हास्याने जगभरातल्या तरुणींना आपल्या प्रेमात पडणारा अमेरिकाचा सुपरस्टार विल स्मिथ काल भारतात आला होता म्हणे! एवढंच नाही, तर मन:शांती मिळावी म्हणून त्याने हरिद्वारच्या महादेवाचं दर्शनही घेतलं. का, तर त्याची आजी सांगायची, 'शांत चित्ताने भगवंताला शरण गेलात की तो तुम्हाला अनुभूती देतो.' त्याच मन:शांतीच्या शोधात स्मिथ भारतात येऊन पोहोचला आणि त्याने प्रार्थना करत असल्याचा फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करून भारताला आणि महादेवाला रातोरात पब्लिसिटी देऊ केली. आपल्या देशात अंतर्गत वाद सुरु असले, तरी मन:शांती मिळवण्याची गंगोत्री भारतातच आहे, हा संदेश स्मिथ द्वारे संपूर्ण जगाला गेला.

कृती महत्त्वाची नसते, ती कोण करतेय ह्याला महत्त्व असते. दर सोमवारी आम्ही पण महादेवाला जातो, एवढंच काय लग्नात, पूजेत 'महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून' हा उखाणाही घेतो, पण ह्याचं कोणाला फारसं अप्रूप वाटत नाही. पण स्मिथ सारखा परदेशातला माणूस, तोही सर्वसामान्य नाही, तर आजमितीलाही सर्वश्रेष्ठ असलेला अभिनेता महादेवाचं दर्शन घ्यायला येतो, तेव्हा साहजिकच महादेवालाही त्याच अप्रूप वाटत असणार.

वयाच्या ५० व्या वर्षी स्वतःला एवढा तुकतुकीत ठेवणारा अभिनेता कृष्णवर्णीय असूनही अमेरिकेत सुपरस्टार होतो काय, रॅपर म्हणून आपलं करिअर घडवतो काय आणि जगातल्या श्रीमंतांच्या यादीत स्वतःचं स्थान पटकावतो काय! एवढं यश संपादन करूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, याचंच जास्त कौतुक वाटतं. तर त्याला आपल्या भारतीय विविधतेतील एकतेचं, रंगीबेरंगी संस्कृतीचं, धर्माचं कौतुक वाटतं, हे ऐकून आणखी कौतुक वाटतं. तो स्वतःला कोणत्याही एका धर्माचा अनुयायी न मानता सर्व धर्मांचा अनुयायी मानतो. त्याचे संस्कार आणि सुसंस्कृतपणा त्याच्या फॅन फॉलोविंग मध्ये भर टाकतात. मग आपसूक मनातून शब्द उमटतात, 'तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं!' काsssश, त्याक्षणी आपणही हरिद्वारला असतो तर? स्मिथचं आणि महादेवाचं एकत्रच दर्शन घडलं असतं, नाही का?

-भैरवी

Updated : 11 April 2019 10:13 AM GMT
Next Story
Share it
Top