Home > रिपोर्ट > हिमा आपल्याला माफ करेल का?

हिमा आपल्याला माफ करेल का?

हिमा आपल्याला माफ करेल का?
X

नुकत्याच आलेल्या ‘आर्टिकल १५’ नामक सिनेमामुळे माहित झालेल्या ‘कहब तो लग जाय धक से’ या गाण्यात विशद केली आहे तशी उपेक्षा जातीआधारित अनुभवावी लागतेच. पण ती लिंगाधारित, प्रांताधारित, वर्गाधारितही असते. आणि हिमा दासच्या बाबतीत तर ते प्रकर्षाने जाणवते. हिमा दास हिंदीभाषी पट्ट्यातली नसणे, मुंबई-दिल्ली किंवा गेलाबाजार एखाद्या मध्यम शहरातली नसणे, शेती कऱणाऱ्या परिवारातली असणे. मागास जमातीची, त्यातही मुलगी असणे आणि तिने निवडलेला खेळ क्रिकेट नसणे यामुळे तिच्या यशाला साजेसे कौतुक तिच्या वाट्याला आले नाही का? तर हो असेच म्हणावे लागेल. पण हे चित्र आपण बदलले नाही तर “आता काळ बदललाय” हे म्हणणे वरवरचे असेल.

आपल्यासारख्या देशात जिथे क्रीडासंस्कृती नाही, असे आपण म्हणतो तिथे क्रिकेट, बिलियर्डस, नेमबाजी यासारख्या खर्चिक खेळांमधले विश्वविजेते तयार होतात. पण मूलभूत समजल्या जाणाऱ्या ‘ट्रॅक अँड फिल्ड’ खेळांत जागतिक पातळीवर नाव घेण्यासारखे खेळाडू मोजावे म्हटले तर एका हाताची बोटे पुरी पडावीत हे कशाचे लक्षण? दांभिकतेचे की अनास्थेचे? हा दंभ राजकीय इच्छाशक्तीचा आहे. प्रशासनिक अनास्थाही आहे, पण समाज म्हणून आपल्याला हे दूर कऱण्यासाठी आपला वाटाही उचलावा लागणार आहे. आपल्या मुला-मुलींना अनेक अवलयांकित खेळही खेळावे वाटतील. खेळ हे कारकीर्द घडवण्यासाठी नाही तर क्रीडासंस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून खेळले जातील हे पहायला हवे.

ऐंशीच्या दशकात पी. टी. उषाने आशियाई स्पर्धांमधून यश मिळवून आपल्या देशात मुलींनी खेळावे असे वातावरण तरी तयार केले. पण त्या रोपट्याचा वेलू होत असताना त्याला आपल्याकडून कौतुकाचे सिंचनही मिळू नये हे किती खेदजनक आहे. इंटरनेटवर बघितले तर हिमाबद्दल इतकी मोजकी माहिती आहे की पुन्हा ते गाण्यातले ‘धकसे आणि अलगसे’ आठवत राहिले.

भारताच्या पूर्वोत्तर राज्यांपैकी आसाममधली हिमा. तिथल्या ढिंग या तिच्या गावावरून तिला ढिंग एक्सप्रेस हेही नाव दिले गेले आहे म्हणे. शेतकरी कुटुंबातल्या रणजीत आणि जोनाली दास यांच्या पाच मुलांमधली धाकटी हिमा. अतिशय गरिबीत जगणाऱ्या या कुटुंबातल्या प्रत्येक मुलाने काही ना काही स्वप्ने पाहिली असतीलच. आपल्यासोबत कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी धडपड करण्याचा निश्चय केला असेल. शिकावे, एखादी सरकारी किंवा मिळेल ती नोकरी करावी किंवा शेतीतच आणखी काही करावे यापेक्षा वेगळे काही सुचले असेल का त्यांपैकी कोणाला? छोटी हिमा खेळायला लागली तेव्हा या क्षेत्रातसुद्धा चमकदार कामगिरी करून नाव मिळवता येईल असे वाटले असेल का त्यांना?

आधी ती मुलांसोबत फुटबॉल खेळायची. आधीच मुलगी. शेंडेफळ झालं म्हणून का फुटबॉलसारखा खेळ आणि तोही मुलांसोबत खेळण्याचे औद्धत्य करावे? तिला नंतर धावण्याकडे वळवले गेले ते फुटबॉल खेळातानाचे तिचे धावणे पाहूनच. मात्र, तिने केलेल्या त्या औद्धत्याचे आता मिळालेले फळ हे काही तिचे एकटीचे नाही. ती पदक घ्यायला प्रत्येकवेळी उभी राहिली तेव्हा भारत भाग्यविधाता वाजले, लोकांच्या तोंडी भारत, भारतीय असे येत राहिले आणि तिच्याकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या बहुसंख्य भारतीयांकडे दुर्लक्ष करून ती आपली धावत राहिली, पदके मिळवत राहिली, कामगिरी सुधारत राहिली.

आज जेव्हा तिने अतिशय चमकदार कामगिरी करून गेले काही दिवस सुवर्णमय केलेत, तेव्हा तिचे कुटुंबिय, आप्त परिवार, शेजारी-गावकरी तिचे यश साजरे तरी करू शकले का याची शंका आहे. कारण आत्ता यावेळी तिच्या प्रांतात, आसामात नागरिक पावसाशी, पुराशी झुंजत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांच्या डोक्यावर भारतीय नागरिकत्व सिद्ध कऱण्याची टांगती तलवार आहे. म्हणजे ‘अस्मानी आणि सुलतानी’ म्हणतात ना त्यातली गत. असे असताना त्यांच्याकडून हिमाचे कौतुक होण्यासारखी अपेक्षा करणे कठीण आहे. तिनेही ते समजून घेतले असेलच. ती तर इतकी थोर की, पठ्ठीने आपल्या कमाईतली अर्धी आसामच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाहीरही केली. त्यामुळे आपण तिचे कौतुक करतोय की नाही याची तिला फिकिरही नसेल.

- अलका पावनगडकर

Updated : 22 July 2019 11:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top