Home > रिपोर्ट > मराठी मालिकांमध्ये सर्व अभिनेत्री ब्राम्हणच का?– दिग्दर्शक सुजय डहाके

मराठी मालिकांमध्ये सर्व अभिनेत्री ब्राम्हणच का?– दिग्दर्शक सुजय डहाके

मराठी मालिकांमध्ये सर्व अभिनेत्री ब्राम्हणच का?– दिग्दर्शक सुजय डहाके
X

केसरी सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाके यांनी उपस्थित केलेल्या ‘मराठी मालिकांमध्ये सगळ्या ब्राम्हण अभिनेत्रीच का?’ या प्रश्नामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलय. लोकसत्ताने घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सुजय डहाके आपल्या शाळा, आजोबा, फुंतरु या चित्रपटांसाठी परिचित आहेत. महेश मांजरेकर यांच्यासह विराट मडके हा नवोदित कलाकार या चित्रपटात मुख्य भुमिकेत असणार आहे.

सुजय डहाके यांनी मराठी मालिकांमध्ये ब्राम्हण अभिनेत्रीच का असतात असा प्रश्न उपस्थित करत झी आणि कलर्स या वाहिन्यांवरील मालिकांच्या अभिनेत्रींची नावही मोजून दाखवली. “मालिकांमध्ये मुख्य भुमिकेत ब्राम्हण अभिनेत्री सोडून एकही अभिनेत्री मिळत नाहीत का? यांना जाधव, सोनावणे, टेंभुर्णे किंवा मडके सापडत नाहीत का? महाराष्ट्रात पाचशे पाचशे एकांकीका होतात तरीही कोणीचं हिरोईन सापडत नाही.” असं मत त्यांनी मांडलं.

एका मालिकेत सावळ्या रंगाच्या अभिनेत्रीच्या पात्रासाठी गौरवर्णी मुलीलाच घेतल्यावरुनही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. एकही सावळ्या रंगाची मुलगी मिळाली नाही असा सवालही त्यानी यावेळी केला. सोबतच “आपण महाराष्ट्रीयनच अधिक वर्णद्वेषी आहोत, कारण आपल्याकडे लग्न जुळवतानाही आपण रंग कोणता पाहिजे, गव्हाळ रंगाची मुलगी पाहिजे असं लिहतो.” अशी खंत सुजय यांनी व्यक्त केली.

यावर सुजय डहाके यांचे सहकलाकार अभिनेते जयवंत वाडकर यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली असून व्यक्तीश: याबाबतीत आमची मतांतरे असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सुजय डहाके यांच्या या वक्तव्यावर परशुराम सेवा संघांचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी आपली तीव्र भावना व्यक्त करताना नाचता येईना अंगण वाकडे असा टोला लगावला आहे.

Updated : 5 March 2020 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top