Home > रिपोर्ट > तुमचा काय प्लॅन आहे?

तुमचा काय प्लॅन आहे?

तुमचा काय प्लॅन आहे?
X

सकाळी वर्तमान पत्र हातात घेतलं, तर जाहिरातींचे ४-५ कागद घडीतून बाहेर पडले. लोक एवढ्या कसल्या जाहिराती करतात, हे कुतूहल म्हणून पाहिलं, तर पाचापैकी तीन जाहिराती तर उन्हाळी शिबिरांच्या होत्या.

सुटीत मुलांना व्यस्त कसे ठेवावे, हा पालकांसमोर यक्ष प्रश्न असतो. त्यावर पर्याय म्हणून हे उन्हाळी शिबिरांचे पेव फुटले आहेत. जेणेकरून मुलांनी व्हिडीओ आणि मोबाईल गेम मध्ये न अडकता नवे काहीतरी शिकावे. शिबिरात पाठवणे वाईट नाही, पण त्यात मुलांची आवड लक्षात घेतली जात नाही आणि त्यांना बळजबरीचा राम राम केल्यासारखा होतो.

सुटी ही विश्रांतीसाठी नसून नवे काही शिकण्याची संधी असते, हे अगदी कबूल आहे. पण मुलांनी तरी पोटभर खेळायचं कधी? मातीत लोळायचं कधी? मामा, मामी, काका, काकू, मावशी, आत्या ह्या नात्यांना अनुभवयाचं कधी? आजी-आजोबांच्या सान्निध्यात राहून संस्कार, गोष्टी शिकायच्या कधी? मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांच्या मनावर संस्कार होणं गरजेचं आहे. हे संस्कार केवळ उन्हाळी शिबिरात पाठवून होणारे नाहीत, तर त्यासाठी त्यांना मित्र-नातेवाईक, समाज ह्यांच्यात मिसळण्याची सवय लावायला हवी. कारण या लहानग्यांमध्येच उद्याचा समाज पुरुष दडलेला आहे. म्हणून मी तरी माझ्या मुलांना १०-१५ दिवस त्यांच्या आवडीच्या कला-कुसर वर्गात किंवा अन्य शिबिरात घालून सुटीतले किमान पंधरा दिवस तरी नातेवाईकांकडे आणि मुलांच्या आजी-आजोबांकडे नेणार आहे. जेणेकरून त्यांची सुटी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरेल. तुमचा काय प्लॅन आहे?

भैरवी

Updated : 15 April 2019 6:20 AM GMT
Next Story
Share it
Top