तुम्ही कोणत्यावेळी बोलता ?
X
कुटुंबाव्यतिरिक्त काही ठराविक माणसांशी मी जवळजवळ रोज बोलते. प्रत्यक्ष बोलते, दोनेक चार मेसेज डोकावतात. त्यांचा , भोवतालचा वा कुठल्याही अंतरावरचा वावर मला आश्वस्त करतो. ती बहुदा माझी अन् त्यांचीही भावनिक गरज असावी. या माणसांचं माझ्या आयुष्यात असणारं अबाधित नातं माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला माझ्या बडबड्या स्वभावामुळे ठाऊक आहे. माझा बोलायचा वेग ठाऊक असल्याने, कितीवेळ, काय बोलतो, यात कुणी स्वतःहून नाक खुपसत नाही, विशेष काही असल्याशिवाय ते सांगण्याचीही मलाही कधी गरज वाटत नाही. तर झालं असं..
गेल्या आठवड्यात नाईट होती. घरी पोहचायला सव्वा वाजला असावा. घरी आले तर बिपवर दोन मेसेज आले. ज्याने मेसेज केला त्याचं कुणी जिवाभावाचं आजारी होतं. तातडीने बोलायचं होतं. अंतर दोन देशातलं होतं. प्रत्यक्ष मदत करणंही शक्य नव्हतं.. त्याक्षणी मी केवळ दोन शब्द बोलू शकले असते. घर शांत झोपलं होतं. फोन केला निवांत पंधरा मिनिटं बोलले. हे काही पहिल्यांदा नव्हतं..
शनिवार असावा, नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत खाली बाकडयावर बसलेल्या एका मित्राने सासुला सकाळी सूचक कळवलं, मॅडम काल रात्री बराच वेळ कुणाशी तरी बोलत होत्या ! आई हसल्या आणि म्हणाल्या, असेल तितकंच काही महत्त्वाचं..त्यांच्यासाठी विषय संपला होता. त्यांनी मला सकाळी पहिला चहा देताना हसत हसत हा किस्सा सांगत होत्या. आईंच्या मुली, माझ्या मैत्रीणी, नात्यातल्या अनेकजणी नाईट शिफ्ट करणाऱ्या आहेत. त्यामुळे ही असली 'पेरणी' आमच्या घरात 'फोडणी' ठरत नाही....
रिपोर्टिंगमुळे व्हॉटस्अपवर अनेकदा कंटाळा यावा इतका वेळ राहावं लागतं. काही अपडेट चुकणार तर नाही ना, ही खरं तर अनाठायी असलेली भितीही मनात असते. दुसऱ्या दिवशीच्या बातम्यांसाठी सोर्सेशी बोलुन घ्याव लागतं. डे प्लॅन ठरवावा लागतो. या सगळ्या थकवट्यात गप्पा, हल्के भांडण अशाही जागा असतात, जवळचं माणूस वेळेत आलं गेलं पोहचलं की नाही ही काळजी असते...हे सगळं प्रत्येकाला कसं सांगणार, अन् मुळात ते सांगण्याची गरजच नसते..
रात्री अपरात्री बोलणाऱ्या, ऑनलाईन राहणाऱ्या मुली तश्यात असतात, असा निष्कर्ष काढणारे धन्य असतात. या वेळांचे संदर्भ देत कधी काळी मनमोकळा छान संवाद असलेला कुणी मैत्री तुटल्यावर तेव्हा आपण तेवीस मिनिटं सत्तावीस सेंकंद बोललो होतोचे जुने दाखले देतात. मिनिटांचे हे हिशेब काहीवेळा वचपा काढण्याच्या हिशेबाने असतात. दोस्ता, बोललो होतो, वीस मिन्टं नाही, ४७ मिनिटं, ३५ सेकंद बोललो होतो, पुढं काय बोललो होतो, लैंगिक, फालतु, गैरलागू..? की तुझ्या थकलेल्या कर्जाच्या हप्त्याविषयी , मुलाविषयी, आशाआकांक्षाविषयी, भोवतालच्या विक्षिप्तपणाविषयी..असे अनेक प्रश्न माझ्याही भात्यात तयार असतात. पण ते वाक्बाण मी काढत नाही. फेसबुक हा मैत्रीतल्या भांडणाचे वचपे काढण्याचा चव्हाटा आहे असं मला वाटत नाही.
एकदा मध्यरात्री ड्रॉपची गाडीचुकून थेट बदलापुरला गेल्यानंतर तीन सव्वा तीन वाजेपर्यंत मी अश्विनशी,ऑफिसमधल्या सहकारी मित्रांशी गप्पा मारत एकटी व्यवस्थित परत आले. पुरुषांनी भरगच्च भरलेल्या स्मशानभूमीत जवळच कुणी गमावलेल्या मित्राला हक्काने मिठी मारून सात्वंनही केलं. २६ जुलैच्या पाण्यात एका अनोळखी माणसाने हात धरून दिलेल्या आधारामुळे स्टेशनपर्यंत पोहचले.. आझाद मैदानात उसळलेल्या दंग्यातून एका तरुण मुलाने हात धरून सुखरुप बाहेर काढलं.
जगण्यामरण्याचे सगळेच हिशेब बाईबाप्याच्या, घड्याळ्याच्या काट्यावरच्या वेळांवर जोखायचे नसतात. नैसर्गिक, प्रांजळ, निरागस अशारिर , सच्चं पारदर्शी मैत्र ही आयुष्यभराची कमाई असते. ती गमावण्याची ज्यांची तयारी आहे त्यांना ढीगभर शुभेच्छा ! मला तरी ते परवडणार नाही..
-शर्मिला कलगुटकर