Home > Max Woman Blog > डोकं फिरलंया बयेचं…

डोकं फिरलंया बयेचं…

डोकं फिरलंया बयेचं…
X

एखाद्या कलाकाराला नाव पैसा यश मिळूनही अवदसा आठवली की, त्याचं कसं हसू होतं? याचं एक नमुनेदार उदाहरण म्हणजे कंगना राणावत. एक उत्तम अभिनेत्री म्हणून विविध भूमिका करण्यात तिचा हातखंडा आहे. पण नौटंकी करण्यातही तिचा हात कुणीच धरू शकत नाही. हे गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. अभिनय हा कॅमेरा समोर करायचा असतो. पण ही बया आता चोवीस तास अभिनय करत असल्याची खात्री तिने वेळोवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पटत आहे.

अचानकपणे स्वतः ला ’मै भारत की बेटी’ म्हणून घेण्याइतका तिच्यात झालेला क्रांतिकारी बदल पाहून आश्चर्य वाटले. कारण या देशात जन्म घेऊन या क्रांतिकारी बेटीला गरिबी, बेरोजगार, नैसर्गिक संकट अशा असंख्य संकटांमुळे लोक अडचणीत होते. तेव्हा एक नागरिक म्हणून का नाही. पुढं येऊन काहीतरी देशहिताचे काम करावेसे वाटले?

ज्या फिल्म इंडस्ट्रीत ती गेली पंधरा वर्ष काम करीत आहे. तिथं तिला जे काही वाईट अनुभव आले. त्याबद्दल तिने तेव्हाही पुढं येऊन बोलायचं होतं. ते तिने का केलं नाही.

मागच्या दोन एक वर्षापासून आणि अलीकडे सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर ती जास्त आक्रमक होऊन बोलत आहे. ते तिने बोलण्याबद्दल आक्षेप नाही. पण पोटभर जेवण करून ढेकर देऊन झाल्यावर मग जेवणाला नावं ठेवायची तसं ती ज्या मुंबई शहरात तिला ओळख मिळाली. त्या कर्मभूमी बद्दल बोलत आहे. मुंबईची तुलना एकदा नाहीतर दोनदा तिने पाकिस्तान बरोबर केली आहे.

पंधरा वर्ष या शहरात राहून करोडो रुपये मिळेपर्यंत तिला मुंबई कशी चांगली वाटतं होती? आईवर कुणी रागावले तरी तिला कैकयी म्हणून अपमान करत नाही. आणि बया कधी मुंबईची तुलना पाकिस्तान बरोबर करते. तर चार तासांनी तिला जाणीव होऊन मुंबईला यशोदा म्हणते.

मग ज्या मुंबईला ही यशोदा ही म्हणते त्या मुंबईत तिला अचानक असुरक्षित वाटू लागलं? इतकी वर्ष मुंबईत राहिल्यानंतर? बरं तिनं झाशीच्या राणी वर चित्रपट करून मराठा साम्राज्याला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. असा दावा केला आहे.

या अतिशहाण्या अभिनेत्रीला हे नक्कीच माहीत नसणार की जुन्या काळात भालजी पेंढारकर यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवून मराठयांचा इतिहास जगाला दाखवून दिला आहे. आणि त्यांच्या सारख्या इतरही अनेक दिग्दर्शकांनी तो वारसा जपला आहे. दादासाहेब फाळके यांचे नाव बाबासाहेब लिहिते, तिने काय मराठ्यांचा इतिहास शिकवावा.

नकली घोड्यावर बसून, तलवार बाजी करून आणि डिझायनर साड्या नेसून झांसी की रानीची भूमिका केली म्हणजे कुणी वीरांगना होत नाही. जुन्या ऐतिहासिक मराठी चित्रपटात अनेक मराठी अभिनेत्रींनी स्वतः सगळे स्टंट केलेले आहेत. हीचं काय ते कौतुक.? तिला जर स्वतःच्या कर्तृत्वाचा इतकाच माज असेल तर तिचे नव्याने येणारे चित्रपट तिने मुंबई सोडून इतर राज्यात प्रदर्शित करावे आणि तिथे हिट करून दाखवावे.

कमी वयात नॅशनल अवॉर्ड मिळवणारी अभिनेत्री म्हणून ती स्वतःचं कौतुक करत फिरते. पण तिला हे माहीत नाही की, कमी वयात नॅशनल अवॉर्ड मिळवणारी स्मिता पाटील ही पण एक अभिनेत्री होऊन गेली. जिचे चित्रपट आजही लोकं पाहतात तिला आदर्श मानतात.

स्मिता पाटील ही कमी वयात नॅशनल अवॉर्डच नाही तर इतरही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून काम करणारी एकमेव मराठी अभिनेत्री आहे. बॉलिवुडमधील आणि समाजातील ज्या वाईट प्रवृत्ती आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण ही सगळी कारवाई चालू असताना स्वतःकडे पुरावे आणि माहिती आहे. असं सातत्याने ओरडून सांगून चर्चेत राहण्यापेक्षा एकदाची काय ती नावं सांगून टाकावीत. नाहीतर ”लांडगा आला रे आला" असं म्हणत दरवेळी फक्त घाबरवून सोडण्यात अर्थ काय.

तिच्या ऑफिसवर अचानक कारवाई झाल्यानंतर तिचे हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणं. म्हणजे एक प्रकारचा इव्हेंट वाटतं होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कुणी अपमानकारक वक्तव्य करूनही विरोध आंदोलन न करता शांत बसणारे नेते अचानक काहीतरी आठवले म्हणून कंगनाला समर्थन द्यायला लगेच पुढे का? तर ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तापलेल्या तव्यावर लगेच भाकरी भाजून घ्या. हा एकमेव उद्देश असल्याचे स्पष्ट दिसते.

पडद्या मागे राहून कंगनाचे दोर हातात ठेवून तिचा कळसूत्री बाहुली चा खेळ करणारे हात नक्की कुणाचे आहेत हे न समजण्या इतकी जनता मूर्ख नाही. माझ्या मराठी तारका कार्यक्रमाला कंगना आली होती. ती ची आणि माझी ओळख असूनही ती जे काही सध्या बोलते आहे. वागते आहे. त्याचे मी समर्थन केलेलं नाही. कारण तिने मुंबईची तुलना पाकिस्तान बरोबर करून केलेला या भूमीचा अपमान आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा एकेरी नावाने केलेला अनादर हा एक मराठी माणूस म्हणून मला माझाही अपमान वाटतो. आणि हीच भावना महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात असावी. नाहीतर उद्या कुणीही बाहेरून येऊन इथे मोठा होईल आणि नंतर आपल्याला नावं ठेवून आपल्यावरच हुकूमत गाजवेल. इंग्रजांनी तेच केलं होतं, हे मोठं उदाहरण आपल्यासमोर असताना महाराष्ट्रासाठी इथे राहणारे आपण मराठी एकत्र येणं गरजेचं आहे.

जय महाराष्ट्र

महेश टिळेकर

Updated : 19 Sep 2020 3:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top