Home > रिपोर्ट > सोंगाड्या इंदुरीकर आणि विखारी उत्पात 

सोंगाड्या इंदुरीकर आणि विखारी उत्पात 

सोंगाड्या इंदुरीकर आणि विखारी उत्पात 
X

आमच्या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक, पण ज्यांना मी कधीही गुरू वगैरे म्हणणार नाही, त्या भागवताचार्य वा. ना. उत्पात महोदयांनी निवृत्तीमहाराज देशमुख (Indurikar) इंदुरीकरांना तमाशातील सोंगाडया म्हणलेले आहे. इंदुरीकरांनी सम तारखेला संभोग केला तर पोरगा जन्मतो आणि विषम तारखेला संभोग केला तर पोरगी जन्मते असा क्रांतिकारी शोध लावलेला आहे. त्या अनुषंगाने चर्चा करताना उत्पात महोदयांनी हे विधान केले आहे. उत्पातांच्या विधानाशी मी थोडा सहमत आहे, कारण (Indurikar) इंदुरीकर हे कीर्तनकार कमी एंटरटेनर जास्त आहेत. बऱ्याच लोकांनी इंदुरीकरना अलीकडे ऐकलं असेल, पण मी जवळपास 17-18 वर्षांपूर्वी त्यांच्या कॅसेट ऐकल्या आहेत. आणि उत्पातांनी कंटाळा येईपर्यंत शाळेत छळलंय त्यामुळे या दोन्ही महान आत्म्यांना मी जवळून पाहिलंय आणि ऐकलंय.

मंचर-आळेफाटा भागातली मराठी, त्यात उत्तम निरीक्षणशक्ती, नाटकीपणा आणि विनोदाची फोडणी हे इंदुरीकरांच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य आहे. खेड्यातल्या लोकांना कुणाल कामरा किंवा झाकीर खानपेक्षा (Indurikar) इंदुरीकर हे जास्त जवळचे त्यामुळे वाटतात. अजिबात आश्चर्य नाही की इंदुरीकरांच्या प्रत्येक व्हिडीओला लाखांमध्ये प्रेक्षकवर्ग असतो आणि त्याचे असंख्य मीम किंवा टिकटॉक व्हिडीओ बनतात. एका बातमीत वाचलं होतं की इंदुरीकरांच्या पुढच्या 2-3 वर्षाच्या कीर्तनाच्या तारखा पूर्ण बुक आहेत म्हणून. थोडक्यात इंदुरीकर हे मराठीतले एक सुपरहिट इंटरटेनर आणि सेलेब्रिटी आहेत. त्यांच्या कीर्तनातला उपदेश आणि जुने विचार बाजूला करून पाहिले तर माणूस खूप बेरकी आणि हसून पुरेवाट करणारा आहे. आणि मला इंदुरीकर तेवढ्यापुरतेच आवडतात.

हे ही वाचा

‘या’ मुलींचा विनयभंग करण्याची कुणाची हिंमत नाही

आता आपण भागवताचार्य उत्पात महोदयांकडे वळू. पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेत शिकत असताना हे महानुभाव आमचे मुख्याध्यापक होते. स्वच्छ पांढरा झब्बा आणि धोतर, कपाळी गंध आणि लुना अशा वेशात हे मंडळ शाळेत यायचं. वर्गात म्हणाल तर संस्कृतचे एक-दोन लेक्चर सोडले तर यांनी काहीच शिकवलं नाही. यांची वेगळीच भाषणे आम्हाला ऐकावी लागायची. गीता जयंती, सावरकर जयंती, वासुदेव फडके जयंती, विवेकानंद जयंती, चाफेकरांनी रँडला गोळ्या मारल्याचा दिवस, गणेशोत्सव इत्यादी निवडक दिवशी हे महोदय सगळ्या शाळेला खाली मैदानात बोलावून संस्कृती, सनातन धर्म आणि रूढीपरंपरांचे गोडवे गाणारे भाषण जबरदस्ती ऐकवत असत. पाश्चात्य संस्कृती कशी वाईट आहे, इतकेच काय सही करतानाही इंग्रजी वापरू नका हे ज्ञान हे गुरुजी आम्हाला द्यायचे.

शिवजयंती, गांधी जयंती, बालदिन, आंबेडकर जयंती वगैरे अब्राम्हणी आणि अहिंदू गोष्टी आमच्या शाळेत कधीच साजऱ्या केल्या जात नसत. त्यादिवशी सरकारी सुट्टी देऊन मोकळे होत, पण चुकूनही गांधी, नेहरू, शिवाजी, आंबेडकर आदी लोकांविषयी एकही चांगलं वाक्य सांगायची तसदी उत्पात महोदय कधीच घेत नसत. 1980-90 च्या काळात त्यांनी आंबेडकर आणि बुद्धाच्या बाबतीतही जातीय अहंगंडाने भरलेले बरेच बेछूट लिखाण केले होते. आजच YouTube वर त्यांचं "गर्वसे कहो हम ब्राम्हण है" हे भाषण ऐकत बसलो होतो, ज्यात ब्राह्मण जातीत जन्म घ्यायला पुण्य लागतं, ब्राम्हण सर्वात श्रेष्ठ असतात, सगळे महापुरुष ब्राम्हण होते, सगळी शास्त्रे ब्राह्मणांनी निर्माण केली, शिवाजी-संभाजी-आंबेडकर आदी सर्वांचे गुरू ब्राह्मणच होते, मक्का-मदीनेत आधी मंदिर होतं आणि तिथल्या शिलालेखात ब्राह्मणांनी आम्हाला धर्म शिकवला असे वर्णन होते... इत्यादी असंख्य अकलेचे तारे तोडलेले आहेत.

(Indurikar) इंदुरीकर जितके वाईट किंवा विखारी बोलत नाहीत, त्याच्या हजारो पटीने जातीय विखार वा. ना. उत्पात या तथाकथित भागवताचार्याच्या मनात भरलेला आहे आणि जो त्यांनी गेली 40 हून जास्त वर्षे जाहीरपणे वेगेवेगळ्या प्रकारे ओकलेला आहे. इंदुरीकरला सोंगाड्या म्हणणारे उत्पात मनोहर भिडेच्या आंब्यावाल्या विधानावर मिठाची गुळणी धरून बसतील, कारण भिडे त्यांच्यासाठी ब्राम्हण जातभाई आहे. उत्पात महोदयांच्या शाळेत शिकूनही, आम्ही त्यांचे विचार घेतले नाहीत याबद्दल मला स्वतःचा अभिमान वाटतो. मराठी पत्रकार लोकांना विनंती आहे की वा. ना. उत्पातच्या "गर्वसे कहो हम ब्राम्हण है" या भाषणावर एक चर्चा घडवून आणावी, त्यात इंदुरीकरना बोलवावे आणि स्वतःची निस्पृह पत्रकारिता दाखवून द्यावी!

- डॉ. विनय काटे

Updated : 15 Feb 2020 4:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top