Home > Max Woman Blog > विद्या बाळ नावाचं विद्यापीठ !

विद्या बाळ नावाचं विद्यापीठ !

विद्या बाळ नावाचं विद्यापीठ !
X

साधारण एक महिन्यापूर्वीच विद्याताई जाणार याची चाहूल लागणारा फोन आला, तेव्हाच एकदम खचल्या सारखं झालं होतं. जणू काय सगळी चळवळच थांबली की काय? ही भावना मनात निर्माण झाली. स्त्री मासिक वाचायचे. त्यातच कधीतरी तारुण्यात विद्या बाळ यांचं नाव असलेले लेख वाचण्यात यायला लागले. कोण विद्या बाळ माहीत नव्हते. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे शब्दही फारच नवीन होते .पण या बाई मला एकदम आवडल्याच. त्याचं कारण त्यांच्या फोटोतल त्यांचं निर्मळ हसू आणि दुसरं कारण त्यांचं बाळ हे आडनाव.

एकदा मी आईला म्हणाले की ‘या एवढं भारी भारी लिहितात आणि यांचं आडनाव मात्र बाळ’. त्यावर आई ही हसली होती. त्यावेळी कधीकाळी या बाईंना आपण भेटू असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण कालांतराने वर्धेहून मी नागपुरात आले. मध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आणि साधारण 98 /99 मध्ये पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेला मी उपस्थित असताना मला तिथे अचानक विद्याताई भेटल्या. तेव्हा आमची फक्त भेट झाली. मी लिहिते, स्त्रीवादी आहे. असा माझा कोणीतरी त्यांच्यासोबत परिचय करून दिला. तेवढ्या ओळखीवर त्या माझ्याशी भरभरून बोलल्या.

त्यानंतर 2001 मध्ये त्या नागपुरात एका चर्चासत्रासाठी आल्या होत्या. मी फक्त ऐकायला गेले होते. मला शांतपणे फक्त ऐकत असलेलं बघून त्या म्हणाल्या ,"अरुणा तू बोल". म्हणजे मी बोलू शकते, माझे काही स्वतंत्र विचार आहेत, याची त्यांना जाण होती किंवा ही माहिती त्यांनी करून घेतली होती. यातच विद्याताईचं मोठेपण आहे. त्यावेळी तर नागपूर-पुणे हे फार मोठं अंतर होतं. सांस्कृतिकदृष्ट्या, साहित्य दृष्ट्याही. पण माझं ‘आकांक्षा’ मासिक त्यांच्याकडे जात होतं. त्या भरोशावर माझ्याबद्दलचा विश्वास कदाचित त्यांना वाटला आणि त्या चर्चासत्रात त्यांनी मला बोलत केलं.

पुढे आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो. नागपुरात आल्यात की, हमखास भेट व्हायची. अगदी सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा विद्याताई माझी मैत्रीण आहे. हा विश्वास देणं ही त्यांची खासियत होती. चळवळीच्या माध्यमातून त्या स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी आयुष्यभर झगडल्या. खरंतर विद्या बाळ ही एक व्यक्ती नसून ते एक फार मोठं विद्यापीठ होतं. एक फार मोठी चळवळ होती. त्यांनी सामान्य गृहिणीला बोलतं केलं, हे त्यांचं खरं काम आहे. महिलांचा प्रश्न, तिचा संघर्ष, तिची व्यथा असे विषय विद्याताई सहजतेने हाताळायच्या आणि प्रत्येकाकडे मानवीय दृष्टीने पाहायच्या.

साधारणतः मध्यमवर्गीय स्त्री ही स्वतःकडे दुर्लक्ष करणारी तरी असते किंवा स्वतःतच मश्गुल तरी असते. पण केवळ स्वतः न रमता किंवा स्वतःकडे संपूर्ण दुर्लक्षही न करता प्रत्येकानं समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, हा विचार त्यांनी स्त्रीमध्ये पेरला. त्यांच्याकडे बघितलं की शांत हसऱ्या व्यक्तिमत्वाची ही माझी मैत्रीण आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायची.

प्रत्येक स्त्री स्वतःच्या अडचणी त्यांच्याजवळ मोकळेपणाने व्यक्त करायची. त्या सतत पायाला भिंगरी बांधून सारीकडे फिरायच्या. स्त्री-पुरुष समानतेसाठी स्त्रीवादाची मांडणी करतच त्यांनी आपलं आयुष्य घालवलं.

महिलांच्या विविध प्रश्नांना त्यांनी गेल्या पन्नास-साठ वर्षात न्याय मिळवून दिला. सतत भाषण आणि आपल्या संपादकीयातून, लेखनातून या स्त्रीचाच विचार करताना दिसतात. महिलांना व्यक्त करण्यासाठी त्या सतत गावोगाव फिरायच्या. त्यांच्या एकंदरीतच कामाचा आदर असताना मला त्यांच्या एका कामाचा आदर विशेष वाटतो, तो म्हणजे अन्याय अत्याचाराचे जे प्रचंड वाढलेले प्रमाण आहे. ते लक्षात घेऊन त्या रात्रीच्या अंधारात हातात टॉर्च घेऊन प्रभात फेरी काढायच्या.

एकट्या स्त्रीला फिरताना पाहून त्यांच्या मागोमाग आपोआपच त्या त्या गावातील पुरुष मंडळीही त्यांच्यासोबत बाहेर पडायची. म्हणजे काहीही न बोलता कृतीतून त्यांनी अनेकदा सामान्य माणसावर सुद्धा सामाजिक जाणिवेचे संस्कार केलेत असे म्हणायला हरकत नाही. फक्त भाषण देऊन भागणार नाही, फक्त लेखन करून भागणार नाही तर भाषण आणि लेखनाला कृतीची जोड हवी हा विचार त्यांनी आधी स्वतःच्या आयुष्यात उतरवला आणि इतरांनी आपोआप त्याचे अवलोकन केले.

ॲसिड हल्ला विरोधातही त्यांनी बरीच जनजागृती केली. एकल स्त्री परिषद, विवाह परिषद, कुटुंबनियोजन परिषद, आत्मसन्मान परिषद, अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून त्या या समाजाशी जोडल्या गेल्या. तारुण्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा आधार होता. अनेकदा मला माझ्याकडे एखादी कॉम्प्लिकेटेड केस आली आणि सुचेनासे झाले की मी त्यांना फोन करायची आणि मार्गदर्शन मागायची तर त्या म्हणायच्या ,"अग त्यात काय एवढं. तू सहज केस हँडल करशील खात्री आहे मला." त्यांचे हे शब्दच मला धीर द्यायचे आणि मी कामाला लागायचे.

सहा महिन्यापूर्वी त्यांनी त्यांचे पुस्तक स्वाक्षरीसह "प्रिय अरुणा तुझ्या कार्याला सलाम ," असे म्हणून प्रेमाने माझ्या हातात ठेवले तेव्हा मी उगाचच हळवी झाले. त्यांनी पाठीवर थोपटलं. आता फोन करून कुणाशी बोलणे नाही आणि कुणी पाठीवरून थोपटणारी नाही, ही खंत मला कायम राहील. फक्त एक दिवस मला उशीर झाला विद्याताई, आज मी पुण्यात पोहोचले आणि काल तुम्ही कायमचा या जगाचा निरोप घेतला. विद्याताईंना आदरपूर्वक श्रद्धांजली.

अरुणा सबाने

Updated : 31 Jan 2020 3:09 PM GMT
Next Story
Share it
Top