Home > Max Woman Blog > एक होता कार्व्हर

एक होता कार्व्हर

एक होता कार्व्हर
X

बारा पुस्तकांच्या लेखक असल्या तरीदेखील 'एक होता कार्व्हर'च्या लेखक हीच वीणाताईंची ओळख महाराष्ट्रातल्या वाचकजणांना जवळची वाटते. परवा त्या अकोल्यातल्या दुर्गम भागातल्या खिरविरे आणि शेणीत गावांतल्या शाळांमध्ये आल्या होत्या. न थकता, न कंटाळता त्यांनी संपूर्ण दिवस मुलांमध्ये घालवला.

Image may contain: 3 people, people sitting

खिरविरे सर्वोदय माध्यमिक शाळेत वाचनाची आवड असणाऱ्या मुलांशी त्यांनी तासभर छान गप्पागोष्टी केल्या. बाळबोध उत्सुकतेतून आलेल्या मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हसरा चेहरा, प्रसिद्ध लेखक असल्याचा बढेजाव नाही की अहंगंडाचा लवलेश नाही. अनेक मोठ्या लेखकांच्या ठायी मुलांसोबत बोलायला आवश्यक संवाद शैली नसते. वीणाताई आजीबाई होऊन सहजसुंदर गप्पा करत संवाद खुलवतात. याचा प्रत्यय परवा आला.

Image may contain: 4 people, people smiling, people standing, sky and outdoor

वीणाताईंसोबतच्या गप्पांच्या तासात मुलं दंग होऊन गेली होती. त्यांच्यासोबतचा मुलांचा संवाद शालेय जीवनातल्या चिरस्मरणीय आठवणींपैकी एक बनून राहील. लेखक म्हणून असलेलं मोठेपण कोठेही आड येऊ न देता त्या मुलांमध्ये रमल्या. शेणीत येथील आश्रमशाळेतल्या आदिवासी मुलांना त्यांनी स्विझर्लंडमधल्या मत्स्यतज्ज्ञाची छान गोष्ट सांगितली.

वृद्धत्वाकडे झुकलेलं वय त्यांना त्रास, वैताग देत नव्हतं. हसरं, निरागस मूल होऊन मुलांमध्ये काही क्षण का होईना कसं जगायचं, याचं कसब ताईंना पुरेपूर साधलंय. कुठेही त्यांनी घाई केली नाही. प्रवासाचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही.

Image may contain: 4 people, people standing

पट्टाकिल्ल्याच्या दक्षिण दिशेला पसरलेल्या खिरविरेच्या विस्तीर्ण पठारावरची तजेलदार हवा अनुभवताना तिकडे फोटो घेतले, कडूवालाची आमटी आणि नागलीच्या गरम भाकरीची लज्जत चाखली, भंडारदऱ्याच्या भिंतीवरुन सूर्यास्त बघत काही क्षण तिथे तसेच रेंगाळत राहिलो. त्यांच्या सहवासात दिवस छान गेला. अहंभावाचा लवलेशदेखील त्यांच्या व्यक्तीमत्त्वात जाणवला नाही. वीणाताई म्हणजे... नातवंडांत आजीबाई रमतात, तसं अद्भुत रसायन आहे! माणसं मोठी असतात, ती उगीच नाही. काही वर्षांपूर्वी बहिरवाडीच्या शाळेत Veena Gavankar ताई आल्या होत्या तेव्हाही हे सगळं असंच होतं... सन्मित्र Abhijeet Kale यांनी हे सारं जुळवून आणलं. Prakash Takalkar Meenal Chaskar Deepak Pachpute यांनी हा दिवस यादगार केला.

काही व्यक्ती त्यांच्या अस्तित्व, सहवासाने आपल्यात ऊर्जा भरतात. तर काही व्यक्ती आपल्यातली ऊर्जा खेचून घेतात. वीणाताईंच्या सहवासात दिवस छान गेला. शिवाय ताईंनी जगायला, शिकवायला भरपूर बळ दिलंत... महान व्यक्तींच्या सहवासातल्या अनेक आठवणी मी जपून ठेवल्या आहेत, शुक्रवारचा दिवस त्यातली एक 'मर्मबंधातली आठवण' बनून राहिला आहे!Thanks Veenatai.

Updated : 23 Dec 2019 1:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top