Home > Max Woman Blog > "सोलापूर टू पंढरपूर" अरुणाच्या भटकंतीतून... भाग-10

"सोलापूर टू पंढरपूर" अरुणाच्या भटकंतीतून... भाग-10

सोलापूर टू पंढरपूर अरुणाच्या भटकंतीतून... भाग-10
X

पोलीस स्टेशन मधून बाहेर पडून बस मध्ये बसलो.सगळे पांगलेले प्रवासी कंडक्टर चढताच पळत गाडीत बसले. अर्थात मला शिव्या घालत. राष्ट्रवादीने चक्क मला टाटा करून माझा निरोप घेतल्यावर गाडी सुटली.आता सावित्रीच्या चेहऱ्यावर हसु होतं. तिचे डोळे चमकत होते आणि विजयराजे खजील झाले होते. मी सावित्रीची चौकशी केली.आईवडील काय करतात, बहिणभावंड वगैरे.भाऊ मुंबईला लॉ करीत होता म्हणताच,अग तरी तू इतकी घाबरतेस, म्हणताच म्हणाली," आम्हा बौद्ध लोकांना हे लोक असेच टाकून बोलतात"

"अजिबात ऐकायचं नाही असं कुणी टाकून बोललं तर.

"मॅडम, तुम्ही ब्राम्हण आहात काय? काय तुफान बोलत होत्या तुम्ही. एकदम हेमा मालिनीच"

सगळ्या हसायला लागल्या.मी विचारात पडले.काही गोष्टींचे माणसाच्या मनावर किती घट्ट पगडे बसलेले असतात.चांगलं ते सारं उच्च वर्णीयांच.

"तू छान शिक, मग तू ही अशीच बोलशील.आणि मी ब्राम्हण नाही, मी बाई आहे, आणि तू बौद्ध नाहीस, तू मुलगी आहेस, उद्याची बाई" कंडकटरला मी आधी माझे दंड आणि तिकिटाचे पैसे दिलेत आणि सोलापूरचं तिकीट मागितलं.तो तिकीट कापायलाच तयार नव्हता."नाही, मला शिंदे साहेबांनी सांगितलं, तिकीट नाही घ्यायचं. ते तुम्ही विझिटिंग कार्ड दाखवलं ना, तेव्हा.मॅडम तुम्ही कोणत्या पोस्ट वर आहात? मंत्रालयात आहात काय?"

"आधी तिकीट दे.हवं तर दंड नको घेउ, पण तिकीट दे. आणि ते शिंदे st महामंडळाचे जावई आहेत काय? हे राजकारणी लोक समजतात काय स्वतः ला?घ्या हे पैसे आणि तिकीट द्या."

त्या मुलिंच्या ग्रुप मध्ये सर्वात लहान एक काळी कुळकुळीत, स्मार्ट मुलगी होती.ती आपल्या सीट वरून उठून मुलींना बाजूला ढकलून माझ्याजवळ आली आणि मला तिनं तिच्याजवळचं एक स्वस्तिकाचं फुल दिलं. मुलींनी टाळ्या वाजवल्या.

मी तिचा गालगुच्चा घेतला.तिचं नाव होतं कलिया. मी तिला चॉकलेट दिलं.

मी विजयराजे कडे बघितलं तर तो अजूनही शांत होता.रागाने धुमसत होता.आता मी त्याच्याशी बोलणं सुरू केलं.वडील सरपंच, भाऊ गॅरेज चालवतो आणि आई प्रायमरी शाळेची शिक्षिका.घरी शेतीवाडी.

"तुला नेमका राग कशाचा आला आहे?"

तो बोलेचना.मग मी त्याला दुसऱ्यांच्या भरवशावर आपण मोठे होऊ नये, त्या मुलीच्या जागेवर तुझी बहीण असेल आणि तिला असं कुणी त्रास दिलेला चालेल काय वगैरे त्याच्याशी बोलत राहिले.तू लहान आहेस, चूका होतात, पण परत असं करू नकोस, असं काही बाही त्याच्याशी बोलत राहिले. म त्यालाही चॉकलेट दिलं. आता तो एकदम खुश झाला. त्यांनी पण मला विचारलं, तुम्ही कोण आहात?"

" का रे?"

"माझे मामा तुमच्या पाया पडले म्हणजे तुम्ही लैच मोठ्या असाल न?"

मी फक्त हसले.

"सांगा न".त्यानी रटंच लावली.म्हातारबाबा म्हणाले," त्या पोलीसच्या हाती हातकड्या घालतील ,एवढ्या मोठ्या हायत त्या."

गाडीला जोरात ब्रेक बसला , गाडी थांबली आणि सगळी मुलं उतरली.मी सवित्रीजवळून तिच्या मोठ्या बहिणीचा मो न घेतला,ताटा, बाय बाय तर झालंच, पण सावित्रीने ताई जिंदाबाद पण म्हटलं.

सगळी मुलं उतरली, बाजाराला जाणारे बरेच प्रवासी खूप सामान घेऊन चढले, खूप कलकलाट झाला.पण नंतर बस शांत शांत च वाटली.मी पाणी प्यायले आणि मागे टेकून डोळे मिटून जरा वेळ पडले, तोच घरून फोन.स्वप्नीलला थोडक्यात हा किस्सा सांगितला तर तो म्हणाला" "माते, तुस्सी ग्रेट हो" सांभाळून चा सल्ला द्यायला आणि परत येणार आहेस न?की आता महाराष्ट्रातून आपण पुढे कुठल्या स्वारी वर कूच करणार आहात?"हे ही विचारायला तो विसरला नाही.(मी एकदा घराबाहेर पडले की घरी कधी परतणार याची गॅरंटी नसते पोरांना)

बस थांबत होती, प्रवासी उतरत होते, चढत होतें. आता ऊन चांगलंच चढलं होतं. गरमी व्हायला लागली.आणि मागे काहीतरी चुळबूळ व्हायला लागली. हळूहळू गोंगाट वाढला.बस मध्ये आधी एकट दुकट गांडूळ दिसले म्हणे, पण थोड्याच वेळात गांडुळांचं प्रमाण वाढलं.आता सगळी कडे गांडूळ च गांडूळ. ,आमच्याही समोर गांडूळ वळवळताहेत.ई ई ई. सगळेच ओरडायला लागले.हे आलेत कुठून? सगळ्यांनी गाडी थांबवायला सांगितली.5 मिनिटांनी ड्रायव्हर ने गाडी थांबवली. तोवर बस अगदी गांडुळमय झालेली.मी लगेच माझी वरची बॅग काढली.त्यात गेले तर..अशी उगाच मला शंका. खरं तर बॅगेवर बाहेरून सुद्धा गांडूळ नको होतं मला.पण 2/4 गांडूळ बॅगेवर रेंगाळत होतेच.मी पर्स मधून बड काढला,आणि गांडूळ उडवून बड फेकला.खाली आल्यावर आम्ही बस कडे बघतो तर काय,बसच्या चारी भोवताल गांडूळच गांडूळ.हे कसं काय? साऱ्यांनाच प्रश्न.कुणीतरी वर गांडूळ ठेवलेच असतील,यावर एकमत. कारण एकाने झाडावर चढून बघितलं तर तीन मोठे हारे ठेवलेले आणि त्या हाऱ्यांच्या भोवती असंख्य गांडूळ आहेत म्हणे.म्हणजे नक्कीच हे लगेज कुणाचं तरी असणारच. पण माझं आहे, असं कुणीच सांगेना.सगळे एकमेकांत शिव्या देत होते.मी बावळट सारखी नुसती इकडे तिकडे पहात होते.प्रवासात असंही काही होऊ शकतं, याची तर मी कल्पनाच करू शकत नव्हते.आता हे पार्सल कुणाचं यावर वितंडवाद सुरू झाला.सगळे भांडत होते.पण दोन पुरुष जे माझे समवयस्क होते, ते मात्र शांतपणे जवळच असलेल्या एका झाडाखाली बसलेले मला दिसले. आता या कलकलाटात उभे राहून काय करायचे, या विचाराने,मी पण त्यांच्याजवळ जाऊन बसले. तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात वगैरे आमची चर्चा झाली.कोण हा मूर्ख माणूस असेल,ज्यांनी एवढी गांडुळं वर ठेवलीत आणि ती कशासाठी?मी त्या मिस्टर नो बडी ला भरपूर शिव्या घालत होते.माझ्यासोबत त्या दोन मित्रांपैकी एकजण आणखीच शिव्या घालत होता.प्रवाशांचा कलकलाट इथेही ऐकू येत होता. मी परत विचारलं, "हा गांडुळांचा हारा कशासाठी नेत असेल हो तो मूर्ख माणूस?"

"अहो कशाला काय, गांडूळ शेती करायला?"हे सांगताना तो माणूस चोरून हसतोय,हे लक्ष्यात आले माझ्या.

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

"अरे हो,पण आता आपण या बस मध्ये बसायचं कसं?कारण ते गांडूळ काढणार कोण आणि काढले तरी काही तर राहणारच ना?मी तर आता या बस मध्ये नाही बुवा बसू शकत.तुम्ही?"

"आम्हाला तर याच बसने जावे लागेल"

"का?

"का...कारण आमचं खूप सामान वर आहे."आता दुसराही हसला.हे काय गौडबंगाल आहे?

"ओ, आय सी"

" बर, तुम्ही आलात कुठून मॅडम आणि नाव काय म्हणालात?"

" मी अरुणा सबाने .नागपूरला असते. आणि अशीच भटकत भटकत इकडे आले"

"अरुणा सबाने....म्हणजे संपादक मासिकाच्या...आकांक्षा मासिक..."

" अहो तुम्ही आमच्या गणेश भाईचा विशेषांक केलाय?"

" हो...कवी गणेश चौधरी, जळगाव. ते तुमचे भाऊ?ते तर दिवाकरदादा आहेत"

तो चट दिशी उठून उभा राहिला, त्याने माझ्यासमोर हात दिल्याने मी पण उभी राहिले. मला कळेचना आता मी काय प्रमाद केला, म्हणून हा मला उभं करण्याची शिक्षा फर्मावतो आहे.पण मी उभी राहताच त्याने मला एकदम घट्ट मिठीत घेतले.अगदी मला कवटाळून बसला.काही क्षण माझ्या डोक्यावर स्वतः चे गाल घासत राहिला.शांत...शांत.मला त्याचा भावनावेग कळत होता.कारण माहिती नसले तरी.त्याची भावना सच्ची होती.मी स्तब्ध त्याच्या मिठीत उभी. त्याचं जणू काय काहीतरी हरवल्याची गोष्टच आज त्याला सापडलीय.जरा वेळाने मीच त्याच्या पाठीवर थोपटले आणि म्हणाले," अहो, शांत व्हा.एवढं भावूक व्हायला काय झालं?"

मी त्यांना सावरलं, ते बाजूला झाले,तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते."कोण आपण?आणि मला एवढे कसे काय ओळखता?आपण तर कधीच भेटलेलो नाही.

त्याने खिशातून रुमाल काढला.तो डोळे पुसत होता, तोच शेजारचा मित्र म्हणाला, " अरुणाताई, हा जळगावचा भैया उपासनी"

" का....य" आता आनंदाने चित्कारण्याची पाळी माझी होती.

" खरंच, भैया, तुम्ही, जळगाव?"

"होय, मीच.आपली भेट इथे व्हायची होती.'

मी त्यांना शेक हॅन्ड केला.तो तसाच हातात हात धरून आम्ही किती वेळ बोलत होतो.

मी 2 वर्षांपूर्वी गणेश चौधरी विशेषांक काढला होता.या ग्रेट कवीबद्दल आपणास माहिती असेलच. गणेश चौधरी जळगावचे.फार मोठे कवी. त्यांच्या तृषारत(trushartr)

या पहिल्याच कवितासंग्रहाला महाराष्ट्रातले सर्व मानाचे पुरस्कार मिळालेत. आणि या कविता त्यांनी लिहिल्यात, वेड्याच्या इस्पितळात. होय.नागपूरच्या वेडयाच्या इस्पितळात, . त्यांनी रागाच्या भरात आपल्या पत्नी आणि 3 मुलांचा खून केला म्हणून त्यांना शिक्षा झाली.14 वर्षांची. ते नागपूर जेल मध्ये असताना त्यांचा माझा पत्रव्यवहार होता.त्या वेळी माझं वय होतं केवळ 17 वर्षांचं.जेलच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं, हा खुनी काहीतरी वेगळा वाटतो, त्यांनी चौधरींची ट्रीटमेंट केली, खूप छान तपासण्या केल्यात आणि त्यांना कळलं, हा माणूस स्किझोफ्रेनिक आहे.त्याच अटॅक मध्ये त्यांनी परिवाराचा संशयापायी खून केला. त्यांचा मोठा भाउ दिवाकरदादा जीव तोडून सर्वांना हेच सांगत होता.पण शिक्षा झालीच . मात्र डॉक्टरांनीच सांगितल्यामुळे आता त्यांना जेल मधून वेड्यांच्या इस्पितळात पाठविण्यात आलं,तिथे त्यांच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट झाली. त्याच काळात त्यांनी कविता, नाटकं लिहिलीत.ती भावानी प्रकाशित केलीत, पुढे त्यांची शिक्षाही कमी झाली. त्यांचा माझा पत्रव्यवहार खूप दिवस सुरू होता.पुढे तो कधीतरी बंद झाला.दरम्यान ते गेल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं.खूप वर्षांनी एकदा दिवाकर चौधरी यांचं पत्र आलं. माझ्या गणेश चौधरींबद्दलच्या सर्व आठवणी जाग्या झाल्यात. मग मी एकदा त्यांच्या गावी टेम्भुर्णी ला जाऊन आले आणि एक अंक गणेश चौधरींवर काढायचा ठरवलं.मस्त प्रतिसाद मिळाला.हातोहात अंक खपले.महाराष्ट्रभर त्यांचे फॅन होते.ललितला एक जाहिरात देताच भरपूर प्रतिसाद मिळाला. जळगाव ला त्याचे प्रकाशन झाले.त्यांच्या ग्रुप मधला त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा हा भैया उपासनी.प्रकाशनाच्या वेळी नेमका तो मुंबईला शूटिंग मध्ये व्यस्त होता.

(मराठी सिनेमाचा नट) पण त्याला अंक खूप आवडला आणि गणेश चौधरींवर मी अंक काढला म्हणून त्याला माझ्याबद्दल अपार प्रेम, माया, आदर वाटत होता. दिवाकर चौधरींच्या माध्यमातून आम्ही दोघेही एकमेकांना खूप छान ओळखत होतो.जळगावला 2 दा जाऊनही त्यांची भेट झाली नव्हती.त्यांच्या घरी पण मी जाऊन आले होते.त्यावेळी ते मद्रास ला शूटिंगला गेलेले.पण प्रयत्न करूनही आमची भेट आतापर्यंत झालीच नव्हती.ती आज अशी भर उन्हाची या जंगलात व्हायची होती.मग काय आम्हाला आता त्या बसचाच काय पण गांडुळांचाही विसर पडला.धूम गप्पा मारल्या.खूप वेळानी आम्हाला भांडणाचा आवाज आला म्हणून तिकडे बघतो तो काय सगळे प्रवासी कंडक्टर, ड्रायव्हर वर तुटून पडताहेत.एकाने तर कंडकटर ची कॉलर पकडलेली.बापरे, हे तर आता भलतंच झालेलं. लोकांचा राग अनावर झाला होता. गप्पामुळे आणि समविचारी लोक भेटल्यामुळे आम्हाला वेळेचा पत्ताच नाही लागला.पण इतर प्रवाशांचा राग स्वाभाविक होता. भैया धावत जाऊन त्या भांडणात पडला.त्यांनी लोकांना थोडं शांत केलं.आपला मोबाईल खिशातून काढून कंडकटर ला दिला आणि त्याला डेपो मध्ये फोन करायला लावला.अर्ध्या तासाने दुसरी गाडी येईल, ही घोषणा होताच सारे पांगले.पण तो गांडुळांचा हारा कुणाचा?हे काही कुणी सांगेना.

माझ्या फोनवर अधूनमधून नाव नसलेले नंबरवरून फोन येत होते. त्याकडे मी दुर्लक्ष केले. पण एक नंबर सारखा दिसत होता, म्हटलं, ही नक्कीच एखादी संकटात सापडलेली स्त्री असावी. तिला सांगायला हवं, मी ऑफिसला नाही म्हणून.म्हणून उचलला तर तो सोलापूरच्या शाहू शिक्षण संस्थेतील होता. खंदारे बोलत होते.मी या बस मध्ये आहे हे त्यांना शिंदे कडून कळलं होतं आणि ते मला घ्यायला गाडी घेऊन निघाले होते.मी जनरल बस ने यावं, हे शाहू शिक्षण संस्थेला मान्यच नव्हतं. मी त्यांना बरच सांगितलं, आता मी पोचण्यातच आहे वगैरे. पण ते काही ऐकेना.मला फक्त तुम्ही कुठवर पोचलाय ते सांगा ची रट त्यांनी लावली.मग मी फोनच कट केला.10 मिनिटांनी ढोबळे साहेबांच्या p A चा काझीचा फोन वाजायला लागला.तो कशासाठी आहे, हे वेगळ्यांन सांगण्याची गरजच नव्हती.मी तो ही नाही उचलला.5मिनिटांनी खुद्द ढोबळे साहेबांचाच फोन होता.2 दा तो ही नाही उचलला, पण तिसऱ्यांदा मात्र उचलला. कारण फोन न उचलून आपण त्यांचा अपमान करतोय,असं वाटायला नको म्हणून.त्यांनी कुठे, कसं विचारल्यावर त्याना थोडक्यात सांगितलं.त्यांना माझा स्वभाव चांगलाच माहिती होता.त्यामुळे ते फार काही आश्चर्यचकित झाले नाहीत.उलट माझ्या या ट्रिप बद्दल त्यांनी माझं अभिनंदनच केलं.पण पुढे म्हणाले,

" एवढ्या दिवसांपासून तुम्ही बाहेर आहात, त्यामुळे तुम्हाला शाहू शिक्षण संस्थेची मिटिंग उद्याच आहे, हे कळलेलं दिसत नाही.आता खंदारे तुम्हाला घ्यायला येतील, त्यांना तुम्ही कुठे आहात तेवढं सांगा, म्हणजे ते तुम्हाला सोलापूरला सोडतील.तिथे तुम्हाला कुठे रहायचं तिथे राव्हा. हो, म्हणजे मी म्हणायचो, रेस्ट हौस ला रहा, तर तुमच्या नियमाचा भंग व्हायचा ना? उद्या मिटींगला या.भेटू उद्या."

" बघते "म्हणून मी फोन ठेवला.

हे सारं भैया ऐकत होता.साक्षात उच्च शिक्षणमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा फोन आणि ही वेडी बाई गाडी पाठवू नका,बघते, म्हणत होती.

"वेडी का काय तू? अग येऊ दे गाडी. आम्हाला पण सोलापूर पर्यंत लिफ्ट दे.बस नेच फिरण्याचा तुझा काय नवस आहे काय?"

" नवस नाही रे, पण एकदा ठरवलं ना आपण तर करायचं पूर्ण आपलं ठरलं तेच; बस एवढाच उद्देश.आणि ही सारी झूल उतरवूनच तर घराबाहेर पडले ना मी.नाहीतर एरवी काय, आहेच या साऱ्या सुखसोयी.पण ठीक आहे, तू म्हणतो तेही खरं आहे.आणि ढोबळे साहेबांची माणसं आता मी त्यांच्याच एरिया त असल्यामुळे कुठूनही शोधून काढतील मला.त्यापेक्षा जाऊ या आता आपण.पण आता खूप भूक लागली यार.माझ्याजवळची चकली, चिवडा सार संपलं. फक्त चॉकलेट असेल"

"किती दिवस झालेत ग तू घराबाहेर आहेस.'

"आज सहावा दिवस"

"अशीच फिरते आहे? म्हणूनच काळी झालीस"

थोड्याच वेळात पांढरी आंब्यासेडर लाल S T जवळ येऊन थांबली.त्यातून खंडारे उतरले. मी माझ्या या दोन मित्रांचा त्यांना परिचय करून दिला आणि यांनाही आपल्यासोबत घ्यायचं आहे, म्हणून सांगितलं.

"आपण म्हणाल तसं मॅडम " म्हणून त्यांनी कार चे दार उघडले.

गाडी आम्हा तिघांना घेऊन सुसाट निघाली.आमच्या गप्पा, गणेश चौधरींच्या आठवणी सुरू असताना मध्येच मी त्याला म्हणाले," पण भैया , तो गांडुळांचा हारा कुणाचा आहे, हे तो कंडकटर कसा शोधेल रे?"

तो गडगडाट करून हसला.त्या दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्यात आणि भैया म्हणाला अग आता ते शोधुचं शकणार नाही"

"का"

"कारण ते पाळलेत आता तिथून"

"का.....य....तुम्ही?"

पुढे आम्ही कितीतरी वेळ खो खो हसायला लागलो.

Updated : 30 Dec 2019 12:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top