अरुणाच्या मुसाफिरितून … तिसरा दिवस “UNPLANNED ट्रीपचा
X
सोबत्यांनी मला वाड्याच्या दारात आणून सोडलं आणि तो तिथून निघून गेला.मी दाराची भली मोठी कडी वाजविली आणि "आहे का वाड्यात कुणी" म्हणून आवाज दिला.
काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे मी परत एकदा जोरात कडी वाजवली तोच आतून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मी स्तब्ध उभी राहिले . तेवढ्यात मागून श्याम अरे शाम ओरडू नकोस ,असा आवाज आला आणि एक माणूस बाहेर आला. कोण हवय? त्याने विचारले .मी म्हटलं "मी नागपूर हुन आले .पाटलीन बाई आहेत का?" तो हो म्हणाला. त्याने दार उघडले आणि मला आत घेतले. आणि आता डोकावून तो ओरडला "काकू तुम्हाला भेटायला कुणीतरी आलं ."असं बोलताना त्याची नजर मात्र माझ्या बॅगेवर गेली. म्हणजे तो अंदाज घेत होता की बाई राहायला आली की काय. एक-दोन मिनीटातच आतून पन्नाशी ओलांडलेल्या जाडजूड, काठापदराची साडी घातलेल्या, कपाळावर मोठं कुंकू, मंगळसूत्र दोन पदरी मोहन माळ असलेल्या, खूप गोऱ्या गोऱ्या,सुंदर चेहऱ्याच्या पाटलीन बाई माझ्या समोर उभ्या ठाकल्या. मी त्यांना नमस्कार केला आणि लगोलग त्यांना सांगितलं, मी नागपूरला असते. सध्या मराठवाड्यामध्ये खेड्याची पाहणी करायला आलेली आहे. तर आजची रात्र मला तुमच्याकडे मुक्काम करता येईल का? त्यांनी मला आपादमस्तक न्याहाळत मला नाव विचारलं .सबाने म्हणजे मूळ कुठले ?मी म्हटलं वर्धा जिल्हा ."बर ,यांना विचारून सांगते ." आधी आलेल्या मुलाला त्यांनी विचारलं "अरे तुझे काका कुठे आहेत?" तो म्हणाला ,"ते चौकीत गेलेत." त्या म्हणाल्या "या" आतून त्यांनी आणखी कुणाला तरी आवाज दिला. माझ्यासाठी पाणी मागवलं. त्या पाठोपाठ चहासुद्धा आला .तोवर बाई माझ्यासोबत बोलत होत्या .माझी विचारपूस करत होत्या. मराठवाड्यातल्या खेड्यांची माहिती का जाणून घ्यायची? तुम्ही सरकारी नोकरीत आहात का? मी म्हणाले नाही. मी नोकरी अजिबातच करत नाही .मला गावोगाव फिरण्याची आवड आहे ."
"तुम्हाला काम काहीच नाही आणि तुम्ही गावोगाव फिरता? पण असं कसं ?आणि घरच्या लोकांनी बरं तुम्हाला येऊ दिलं?" मी हसले . "घरी कोणी आहे की नाही ?गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही . म्हणजे आमच्याकडे बाया अशा फिरत नाहीत .कामाशिवाय तर नाहीच नाही. बरं तुम्ही नोकरीत पण नाही आहे म्हणता. मग उगाच अशा कशा फिरता? म्हणजे आमच्या मराठवाड्यात बाया असं कारणाशिवाय गावाला जात नाही .मग तुम्ही कशा काय फिरता हो? तुमच्या घरचे काय करतात ?मी म्हटलं "ते नाही आहेत."
" अरे सॉरी .आणि मुलं ?
"मुल आहेत ना ."
"मग त्यांनी मनाई नाही केली?" "नाही. कारण माझ्या कामाने मी नेहमीच दौऱ्यावर असते ."
"कोणती काम करता तुम्ही?" आता माझी पंचाईत झाली .या बाईंना माझ्या कामाची ....कोणत्या कोणत्या कामाची माहिती द्यावी, हा मोठाच प्रश्न माझ्यासमोर पडला. पण तेवढ्यात दारातून आवाज आला आणि मी सुटले .पाटलीन बाई उठून उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या ,"हे आलेत". मी उठून उभी राहिले .तोवर आलेले गृहस्थ पायर्या चढून वर आलेले होते. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी पण मला नमस्कार करून पाटलीन बाई कडे बघितलं. त्या म्हणाल्या ,"या नागपूर हुन आल्या आहेत .यांना आज रात्री च आपल्या घरी थांबायचं आहे." "तुम्ही ओळखता यांना ?"
"नाही "
"मग कसं ?"
"तुम्ही यांच्याशी बोला ."माझ्याकडे बघून बाई म्हणाल्या आणि त्या आत गेल्या.
हे ही वाचा
अरुणाच्या मुसफिरितून … दुसरा दिवस “UNPLANED ट्रीपचा
अरुणाच्या मुसफिरितून … माझ्या “UNPLANED TRIP” ची गोष्ट
"मी अरुणा सबाने .नागपूर हुन आले .मला मराठवाड्यातल्या खेड्यांची परिस्थिती जाणुन घ्यायची आहे. खरं म्हणजे मी गावोगाव आठ दिवस फिरायचं ठरवलं आहे .कुठल्या शहरात न राहता ,हॉटेलमध्ये न राहता. गावात जाऊन सरपंच किंवा पाटलांकडे राहायचं .अर्थात त्यांनी परवानगी दिली तर. मला फक्त आजची रात्र राहायच आहे. तुम्ही द्याल ती भाजी पोळी जेवायची .इथल्या महिलांशी रात्री गप्पा मारायच्या आणि सकाळी उठून पुढल्या प्रवासाला जायचं. पुढे कुठे जाणार ते माहिती नाही .म्हणजे माझं कुठे जायचं हे अजिबात ठरलेलं नाही. नागपूरहून मी बीडची बस दिसली म्हणून बीडच्या बस मध्ये बसले .त्या खेड्यात उतरले. आता औरंगाबाद कडे येणाऱ्या गाडीत बसले आणि तुमच्या गावात उतरले .मला एक रात्र तुमच्याकडे रहाणे खूपच अशक्य असेल तर काहीच हरकत नाही. मी पुढल्या स्टॉपवर जाईल."
" एवढ्या रात्री ?"
"हो त्यात काय एवढं ?"
"अहो पण तुम्हाला बस मिळेल?"
" मला जी बस मिळेल त्या बस मध्ये चढायचं आहे .त्यामुळे मला फार अवघड वाटत नाही."
" पण एवढ्या रात्री?"
"एवढी रात्र कुठे? साडेसात पावणेआठ तर झालेत ."
"अहो बाई. हे नागपुर नाही. खेडेगाव आहे .तेही मराठवाडा आहे."
" म्हणून काय झालं ?गावातली माणसं फार सज्जन असतात, यावर माझा विश्वास आहे." "तुम्हाला काय माहिती गाव?" "मला फार छान माहिती आहे. कारण मी गावातूनच आलेली आहे ."
"कुठलं गाव तुमचं ?"मी मूळची वर्धेची आहे."
" काय नाव म्हणाला त?"
मी वर्धेच्या सबानेची मुलगी आहे."
" ते कबड्डी प्लेयर सबाने होते, ते कोण ?
"तो माझा भाऊ."
" म्हणजे तुम्ही बाबासाहेब
सबानेची बहिण? अहो बाई तुम्ही चांगल्या तरण्याताठ्या. एवढ्या रात्रीच्या कामधंदा सोडून अशा गावोगाव का फिरत आहात?"
" हेच माझं काम आहे."
" तुम्ही तर भावापेक्षाही पटाईत निघाल्यात ."
"तुम्ही आमच्या बाबाभाऊला ओळखता?"
"म्हणजे काय? आम्ही खूप लहान होतो. पण त्यांची कबड्डी बघायला आम्ही खास इथून तिथे यायचो.ते कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धा भरवायचे. मराठवाड्यातून दरवर्षी मी कबड्डी खेळायला यायचो.ते खूपच मोठे होते माझ्यापेक्षा. काय स्मार्ट, गोरेपान .त्यांची कबड्डी खूपच जोरदार असायची. एकावेळी ते चार चार पाच पाच जणांना आउट करत. ते कबड्डी खेळायला उतरले की आम्ही सर्व खेळाडू श्वास रोखून त्यांचा खेळ पाहत असू. आता काय करतात ते ?कुठे आहेत? थकले असतील ना ?"
"तो १५ वर्षांपूर्वीच गेला."
"काय? म्हणजे वारले?अरेरे.काय व्यक्तिमत्व होतं त्यांचं. यशवंराव चाव्हणांच्या हस्ते जेव्हा त्यांना गोल्ड मेडल मिळालं,तेव्हा त्यांच्यावर खूप लिहून आले होते.आम्हीही होतो त्या कार्यक्रमाला. राजकारणातही त्यांचे खूप नाव होते.पेपर मधून मी नेहमी वाचायचो .एक चांगला माणूस एवढ्या लवकर गेला.सॉरी.
बरं पण मला सांगा तुम्ही आता अशा रात्रीच्या आलात. हे बरं की तुम्ही नेमक्या माझ्या घरी
आलात. पण असं रात्रीचं बाईच्या जातीनं फिरणं बरोबर आहे का आणि तुमच्या मिस्टरांनी कशी काय अनुमती दिली ?"
"मला मिस्टर नाहीत ."
"अरे !म्हणजे तुम्ही लग्न केले नाही ?"
"लग्न केलं ,पण आता ते नाहीत. म्हणजे माझा डिव्होर्स झाला."
" बरं ठीक आहे .एक काम करा आज रात्री थांबा येथे .पण उद्या सकाळी औरंगाबाद वरून नागपूरचे तिकीट घ्या आणि परत जा बरं. मला हे योग्य नाही वाटत आहे .तुम्ही बाबासाहेबांच्या भगिनी आहात. म्हणजे आता तुम्ही जवळजवळ माझ्या परिवारातल्या आहात.आणि आमच्या परिवारातल्या पोरीबाळी अशा गावोगाव कारण नसताना फिरणं हे बरं नाही दिसत ."
"अहो मला कारण आहे ना .मला हा सर्वे करायचा आहे ."
"पण तुम्ही म्हणाल्या ना नोकरी करत नाही ."
"बरोबर.मला हे काम कुणासाठी करायचंच नाहीये. मी माझ्या समाधानासाठी हे काम करते आहे .मला खेड्यामध्ये राहता येतं काय , अभावांमध्ये राहता येतं काय ,एसटीने प्रवास करता येतो काय, हे मला बघायच आहे. माझा उत्तम व्यवसाय आहे,माझ्याजवळ मोठी गाडी आहे, राहण्यासाठी एक छान घर आहे .माझ्याजवळ सर्व सुखसोयी आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे मी बाबासाहेबांची भगिनी म्हटल्यावर मी किती ऐश्वर्यात राहिली असेल. पण मला आत्ता स्वतःला अजमावून बघायचं आहे की मी अजूनही अभावामध्ये राहू शकते काय?" "आज पर्यंत मला कित्येक लोक भेटले असतील; पण तुमच्यासारखे पहिल्यांदाच ऐकतो आहे .असू द्या .तुम्ही बाबाची बहिण म्हणजे काहीतरी वेगळ्या असाल, हे मी मान्य करायलाच पाहिजे . ठीक आहे." "अहो ऐकलत का ?"त्यांच्या अहो बाहेर आल्यावर,' या माझ्या खूप जुन्या मित्राची बहिण आहेत. बोलता-बोलता परिचय निघाला . यांचा चांगला पाहुणचार करा. आणि ताई तुम्ही निश्चिंत मनानी रहा.एक काय चार दिवस रहा.विश्वास,यांना जेवण झाल्यावर ग्रामपंचायतीत घेऊन जाशील.तिथेच महिलांसोबत यांची मीटिंग लावतो."
मी निश्वास सोडला .आमचा किशोर मला नेहमी म्हणतो ,"नाम ही काफी है "खरंच आहे. माझ्या आडनावाने अनेकदा मला अनेक गोष्टींमधून मार्ग काढून दिले आहेत. परत एकदा सिद्ध झालं .अर्थात आज मी काही संकटात नव्हते .पण सरपंच बाई गावात नाही आणि पाटलांनी जर का खरोखरच मला घरात घेण्यास मज्जाव केला असता तर एवढ्या रात्रीचा मला एक तर पुढे प्रवास करावा लागला असता किंवा तिसरे घर शोधावे लागले असते.असो. पाटलांनी मला पाटलीन बाईंच्या सुपूर्द केले आणि ते घरातून बाहेर गेलेत.ते घरातून बाहेर गेल्यागेल्या पाटलीन बाई नी त्यांच्या नावाने पुतन्याजवळ खडे फोडले .रात्रीचे कसे म्हणून हे घरात टिकत नाहीत .काय एवढी महत्त्वाची कामं असतात बाहेर ,देव जाणे .मग त्यांनी त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवला. मला बाथरूम दाखवून फ्रेश व्हायला सांगितलं. मी बाथरूम मध्ये जाऊन हात पाय तोंड धुतले. मला खरं तर मस्त वॉश घेण्याची इच्छा होती, पण पाटलिण बाईला पटेल की नाही, याचा विचार करून, अर्धी आंघोळ केलीच.
बाईंनी, आता मी त्यांना वहिनी म्हणायला लागले,मस्त पहुंचारचाचाच घाट घातला होता. अगदी मसालेभात,बासुंदी, भजी, कुरडया पापड सारे साग्रसंगीत.जेवणानंतर मला विश्वासला सोबत देऊन त्यांनी ग्रामपंचायतीत पाठविले.त्या स्वतः आल्या नाहीत. तिथे 15-20 महिला होत्या.आमच्या बऱ्याच गप्पा झाल्यात.या गावातील महिलांनी फारशा अडचणी न सांगता, माझीच फार चौकशी सुरु केली.काहींनी व्यक्तिगत अडचणी सांगितल्या. पण रस्ते आणि पाणी हा कॉमन प्रॉब्लेम इथेही पुढे आलाच.या गावात अनेकांकडे संडास आहेत, हे ऐकुन बरे वाटले.
मीटिंग संपवून आम्ही घरी आलो. वहिनींनी माझी ज्या खोलीत झोपायची व्यवस्था केली होती, ती मला दाखविली आणि सांभाळून झोपा, म्हणाल्या.म्हटल म्हणजे?
" नाही, सहज आपलं.बाईच्या जातीने कायम सावध असावं जी. झोपा."
मी त्यांच्या सूचनेचा विचार करत राहिले.त्या असं का म्हणाल्या असतील? यात काही गर्भित सूचना तर नाही? माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेत.झोप तर पार उडालीच.आजच्या रात्रीच्या गर्भात काय दडलं होतं?का आली ती सूचना मला? सहज की काही प्रत्यय त्याच रात्री यायचा होता?
बघूच उद्या