Home > रिपोर्ट > अरुणाच्या मुसफिरितून ... माझ्या "Unpland Trip" ची गोष्ट

अरुणाच्या मुसफिरितून ... माझ्या "Unpland Trip" ची गोष्ट

अरुणाच्या मुसफिरितून ... माझ्या Unpland Trip ची गोष्ट
X

ऑक्टोबर 2005 चा तो काळ होता .माझ्या भरभराटीचा.सामाजिक, आर्थिक,मानसिक सरवाच दृष्टींनी मी आयुष्यात सेटल झाले होते. सुखाची साय माझ्या तनमनावर पसरलेली होती. अनेक चढउतार आयुष्यात पाहिले होते. आता संपन्न दिवस जगत होते.एक दिवस बसल्याबसल्या माझ्या मनात असा विचार आला की नेहमी आपण कुठेही जातो ते कार नेच.किंवा फ्लाईट. आणि ट्रेन ने गेलो तरी a c .म्हणजे थोडक्यात काय तर आपण आता अगदी एकझिक्युटिव्ह लाइफ जगतो आहोत.आपण आपल्यातलं सामन्यपण विसरतो आहोत की काय? आता आपले पाय जमिनीवर राहिले नाहीत की काय?मी मलाच पडताळायचं ठरविलं. लेखक ,सामाजिक कार्यकर्ता, प्रकाशक,संपादक अशी कोणतीच झूल न पांघरता आपण आठ दिवसांचा प्रवास तोही अनप्लांट करायचा, हा विचार माझ्या डोक्यात आला.अा णि मी लगेच दुसर्‍याच दिवशी एक छोटी बॅग भरली .त्यात अतिशय कमी कपडे .सोबत एटीएम न घेता थोडेफार पैसे आणि मोबाईल एवढे घेऊन मी चक्क एसटी स्टँडवर गेले .मुलांनाही सांगून ठेवलं होतं की आठ दिवसात मी तुमच्यासोबत संपर्क करणार नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही दिवसातला एखादा फोन करा. फोन जर लागला नाही तर काळजी करण्याचे कारण नाही. माझ्या अशा वागण्याची एव्हना मुलांना सवय झालेली होती. यावेळी फरक एवढाच होता की मी गाडी न काढता s t ने जात होते. एसटी स्टॅण्डवर उभी राहिले .भरपूर बसेस लागल्या होत्या .मी ठरवलंच होतं की मनात काहीही ठरवायचं नाही. ज्या बसमध्ये बसावसं वाटेल त्या बसमध्ये चढायच.खूप बसेस होत्या .एक नांदेडची होती. एक बीडची होती. औरंगाबाद, पुणे बऱ्याच बसेस होत्या.अगदी वर्धा,अमरावती सुध्दा. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी होती .आठ साडेआठ चा तो सुमार होता आणि ऑक्टोबर महिना होता. बसेसच्या पाट्या वाचल्या . गर्दीकडे बघितलं. पाच दहा मिनिट इकडे तिकडे थोडीशी फेरफार झाले आणि बीडच्या बस मध्ये चढले.कारण मी ठरवलं होतं की मनात ज्या बसमध्ये बसावं वाटतं त्याच बस मध्ये बसायचं. तिसऱ्या ओळीत खिडकीजवळची जागा मिळाली. बसायला जागा मिळेल तरच बस मध्ये चढायचं हे मात्र माझं ठरलेलं होतं .पाच दहा मिनिटांमध्ये बस कंडक्टर आला .बरेच प्रवासी त्यात बसले होते .कंडक्टरनी घंटा वाजवली आणि बस सुरू झाली .काही लोकांनी आधीच तिकीट घेतलेलं होतं .काहींचं घ्यायचं राहिलं होतं .त्यात मी एक होते .त्यामुळे बस सुरू झाल्यानंतर आणि ती शहराच्या बाहेर मार्गाला लागली आणि कंडक्टर बस मधल्या प्रत्येकाला विचारू लागला ,कुठे? कुठे ?कुठे ? माझ्याजवळ आला .मी त्याला म्हणाले की "ही बस संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत कुठे पोचेल? "तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागला. शेजारचा माणूसही माझ्याकडे तसाच पाहायला लागला .याची मला अपेक्षा होतीच .तो म्हणाला ,"तुम्हाला कुठे जायचंय"? मी म्हटलं "माहिती नाही." तो परत माझ्याकडे विचित्र नजरेने पहायला लागला."अहो, तुम्हाला कुठे जायचं आहे ?"मी त्याला म्हणाले," हे बघा मला नेमकं कुठे जायचं नाही. ही बस बीडला जाणार आहे ना?"

" हो ".

"मग बीडच्या आधी सहा-सात वाजेपर्यंत जो स्टॉप येईल,तिथे मला उतरायचं आहे. तिथे मला तुम्ही उतरवा." तो म्हणाला गावाचं नाव ?"

"मला माहिती नाही "

"मग कशा काय चालल्या?"

"मला गावांमध्ये ,खेड्यामध्ये काम आहेत ."कारण त्याला फार सांगण्यात अर्थ नाही आणि मी जे सांगेल बोलेल ते त्याला कितपत कळेल मला माहित नव्हतं .त्याला कदाचित कळले असतं पण मला काही सांगण्याची इच्छा नव्हती .तो म्हणाला ठीक आहे त्यांनी साधारण 90 रुपयांचं तिकीट कापून माझ्या हातात दिलं.म्हणाला 6-7 यादरम्यान खरंगड या नावाचं गाव येईल.अर्थात ही गाडी छोट्या छोट्या स्टॉप वर थांबणार नाही आहे .पण तुमचं काही तरी वेगळच प्रकरण दिसत आहे ,हे लक्षात घेऊन मी तुम्हाला त्या स्टॉपवर उतरून देईल ."मी त्याला थँक्स म्हटलं .सोबत हेही सांगितलं की हे खरंगड आलं की तुम्हीच मला सांगा .त्यांनी ठीक आहे म्हटलं. मी त्याला पुन्हा थँक्स म्हटले. आणि माझा प्रवास तिथून सुरू झाला .शेजारी बसलेल्या माणसाने एव्हाना मला मी पूर्ण कामातून गेलेली बाई आहे असं समजून तो जवळ जवळ एक तास माझ्याकडे अधून-मधून बघत होता आणि अधून मधून काहीतरी हातात घेऊन वाचत होता. या सगळ्या गोष्टींची रात्री मी कल्पना करून ठेवली होती. काही अपेक्षित गोष्टी माझ्या समोर येतील याची मला कल्पना होती आणि अनेक अनपेक्षित घटनांना सामोरं जावं लागेल याचीही मला अपेक्षा होती. पण त्या सर्वांची तयारी ठेवूनच मी हा प्रवास सुरू केला होता .

पण मला आतून खूप छान फिल येत होतं .प्लॅनिंग न करता आपण भटकायला निघालो आहोत. मुख्य म्हणजे एसटीने जात आहोत .अनेक वर्षांनंतर मी एसटीचा प्रवास करत होते. साधा नागपूर ते वर्धासुद्धा एसटीने जायला काळ लोटून गेला होता. 1999 मध्ये मी गाडी घेतली आणि तेव्हापासून मी सतत कारनेच प्रवास केला होता किंवा विमानाने किंवा àc ट्रेन.या सगळ्यावर मात करू शकते का? एक सामान्य स्त्री म्हणून मी अजूनही जगू शकते का? अजूनही आपले पाय मातीत आहेत की नाही हे मला पाहायचं होतं .माझंच मला स्वतःला अजमावून बघायचं होतं.म्हणूनच st ने तर जायचच, पण खेड्यातच जायचं, सरपंच किंवा पटलाकडे उतरायचं.,कुठल्याही हॉटेल किंवा रेस्ट हाऊसला नाही, हे माझं ठरलेलं होतं.

साडेबारा एकला कधीतरी ती गाडी कुठेतरी थांबली .ती तशी मध्ये मध्ये थांबत होती पण साडेबारा एकला त्यांनी पंधरा मिनिटांचा स्टॉप आहे म्हणून पुकारा केला आणि बरेच प्रवासी खाली उतरले .त्यात मीही उतरले . मी आलुबोंडा वड्या वगैरे काहीतरी खाल् ल्याचं आठवत.नंतर वाचता वाचता एक डुलकी घेतली. जवळ वाचायला होतच . माझी स्वतःची काही पुस्तक होती.प्रेरक ललकारीचे ,आणि आकांक्षाचे अंक ही होते. त्यामुळे कंटाळा येण्याचा प्रश्नच नव्हता .मोबाईल मध्ये डोकं टाकून बसण्याचा तो काळ नव्हता . मोबाईल होता ,पण त्यावर मेसेजेस आम्ही फार तर करत असायचो.शेजारचा माणूस माझ्यासोबत बोलायला फार उत्सुक दिसत होता, पण त्याला सुरुवात कशी करावी कळत नव्हत.त्याच्या देहबोलीतून मला ते छान कळत होत.शेवटी त्याची उत्सुकता फार न तानता मीच संवाद सुरू केला."तुम्ही कुठे निघालात सर?"

"मी बिडला. माझ घरच आहे बिडला.पण मॅडम तुम्ही .तुम्हाला गावाचं नाव माहीत नसलेल्या गावी का जात आहात?"

"असच.मला आवडत अस फिरायला."

"अहो पण 7 वाजता त्या फाट्यावर किती अंधार असेल.तुम्ही त्या गावात नव्या.भीती नाही वाटणार?"

"नाही.मला भीती वाटत नाही.मजा असते अशा भटकंतीत."

"आणि घरचे.ते रागवत नाहीत?"

मी हसले आणि हातातलं मासिक चाळायला लागले.चार वाजता परत कुठेतरी चहा प्यायला थांबलो .मग मी कंडक्टरला विचारलं की ते खरं गण आता किती लांब आहे .तो म्हणाला अजून दोन अडीच तास आहेत .साडेपाच पावणेसहा लाच मला बाहेर अंधारल्या सारखं वाटायला लागलं. बाहेर अंधार पडायला लागला होता. ऑक्टोबरचा महिना म्हणजे थंडी सुरू झालेली होती .हवेत गारवा होता .मी त्याला म्हणाले की खरंगणा येईपर्यंत जर का जास्त रात्र होणार असेल तर तुम्ही मला त्याच्या आधीच्या फाट्यावर उतरवलं तरी चालेल. तो मला म्हणाला ,"मॅडम एक विचारू? मी म्हटलं विचारांना.

" तुम्ही काही प्रोजेक्ट हातात घेतला आहे का ?काय करता तुम्ही ?मी हसले

"तुम्हाला हरकत नसेल तरच सांगा .काही सिक्रेट असेल तर असू द्या, पण तुमचं काम थोडं काहीतरी वेगळे दिसत आहे म्हणून मी विचारतो." मी म्हणाले प्रोजेक्ट वगैरे काही नाही हो सहज माझ्या मनात काल आलं की आपण असच काहीही न ठरवता फिरू या, खेडी बघू, तिथल्या स्त्रियांना भेटू, बस.निघू या आणि मी निघाले .

"बापरे .असं कुणी एकट्याने सहज फिरायला जात असतं .मी तरी पहिल्यांदाच ऐकतो आहे. आणि तुमच्या घरच्यांनी तुम्हाला परवानगी दिली ?"

मी म्हणाले मला नवरा नाही. त्यामुळे मला विचारणार कोणी नाही .माझी मुलं फार समजूतदार आहेत. त्यांना मी काय करते ,कुठल्या पद्धतीचे काम करते याची संपूर्ण समज आहे .मी घराबाहेर पडले म्हणजे कुठल्यातरी महत्त्वाच्या कामासाठी पडले हे ते जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी मला फारसे प्रश्न केलेच नाहीत ."

"वा खूपच छान. हे तर मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. एखादी स्त्री असं काही करू शकते .एवढे धाडस करू शकते हे मी ऐकलं असतं तर मी विश्वासच ठेवला नसता. पण काळजी घ्या बर मॅडम. जग फार वाईट आहे."मी फक्त त्यांच्याकडे बघून हसले आणि मी माझ्या जागेवर येऊन बसले .प्रत्येकाला घरचे काय म्हणाले, याचीच काळजी.परत एकदा पटल,नवरा नसल्याचे किती फायदे होतात ते.मी मनोमन त्या क्षणाना thanks म्हटल. सव्वासहा वाजता त्यांनी मला सांगितलं खरंगल आलं म्हणून. आणि मी त्या स्टॉपवर उतरले.आता खरी परीक्षा माझी इथेच होती. प्रत्येक गावाच्या आजूबाजूला म्हणजे जिथे कुठे स्टॉप असतो तिथे चहाची आणि भज्यांची टपरी असतेच. एखादं झाड असतं तिथे एखादा लाकडी टेबल असतो .हे माझ्या डोक्यात पक्कं बसलेलं होतं .तेच दृश्य मला स्टॉप वर उतरल्या उतरल्या दिसलं चहाच्या टपरीवर गेले .त्याला छान कडक चहा करायला सांगितला .त्याने मला विचारलं कु"कुणाकडचे पाहूने?"मी म्हणाले "या गावात सरपंच महिला आहे की पुरुष ?"तो म्हणाला "बाई आहे जी ".काय नाव त्यांचं ?

"मसराम बाई .तुम्ही कोणाकडे आल्या ?"

"त्यांच्याचकडे ."

म"मग तुम्हाला नाव कस नाही माहित जी?"

"मी विसरले होते नाव. "चहा प्यायलावर त्याला पैसे दिले आणि त्याला म्हटलं गावाचा रस्ता कुठून?त्यांनी मला गावाचा रस्ता खु नेनी सांगितला. मी गावात गेले. सरपंच बाईंचे घर विचारलं .एका मुलाने मला ते दाखवलं .तो मुलगा माझ्या सोबतच त्यांच्या घरापर्यंत आला. त्यांना आवाज दिला "परमिला काकू परमिला काकू तुझ्याकडं पाहुणे आलेत" .एक बाई लगबगीने ओले हात साडीला पुसत बाहेर आल्या. "कोण आला रे ?"माझ्यासारखी अनोळखी बाई बघून एकदम दचकल्या आणि थांबल्या .मी त्यांना नमस्कार केला. त्यांनीही नमस्कार केला .मी त्यांना सांगितलं मी नागपूरवरून आले आहे .मी गावागावांमध्ये फिरून इथल्या स्त्रियांचा अभ्यास करते आहे .त्यांच्या सोबत चर्चा करणं बोलणं त्यांचे प्रश्न जाणून घेणे. महाराष्ट्रातल्या स्त्रियांचे प्रश्न तरी काय आहेत ?विशेषतः ग्रामीण स्त्रियांचे यासाठी फिरते आहे. मला तुमच्याकडे रात्रभर झोपायला आणि रात्रीच जेवायला मिळेल काय? मी सकाळी उठून इथून निघून जाईल ."ती बाई सरपंच असल्यामुळे तिला या पद्धतीच्या पाहुण्यांची सवय असावी .

आजकाल अनेक एनजीओ सर्वे ची काम करतात.ती हो म्हणाली ."या बसा.आमच्या गावात मीटिंग घेता का ?"ती लगेच आत गेली. तिने बकेटमध्ये पाणी भरून आणलं. त्यात लोटा, नवा कोरा साबण व नवाकोरा पेटी मधून टॉवेल काढला. समोर ठेवला .तिथेच बकेट आणि लोटा ठेवला आणि हातामध्ये टॉवेल घेऊन उभी राहिली .मला या सगळ्या पद्धती चांगल्या अंगवळणी पडलेल्या होत्या.लहानपणापासून हे वातावरण गावातलं मी पाहिलेलं होतं .त्यामुळे त्यात मला काही वे गळं वाटलं नाही .मग मी पायावर पाणी घेतलं तोंडावर पाणी घेतलं .तोंडावर पाणी घेतल्या घेतल्या मला खूप छान वाटलं .कारण सकाळपासूनच प्रवास सुरू होता आणि पहिल्याच दिवशी आपण ज्या कुण्या गावात जाणार आहोत त्या गावची सरपंच बाई आपलं स्वागत कसं करेल याबद्दल मी अगदीच अनभिज्ञ होते. मी मनाशी एक गोष्ट ठरवून ठेवली होती, गावात जाऊन त्या गावात आधी सरपंच बाईंना विचारू. सरपंच महिला असेल तर तिच्याच घरी थांबू .दुसरा प्रश्न विचारू पाटलाचे घर .या गावात आहे ?सरपंच बाईंकडे जर व्यवस्था झाली नाही तर पाटलाच्या वाड्यावर जाऊ. त्यांना आपली ओळख देऊ. आणि पाटलाच्या वाड्यावर थांबु. पण पहिल्याच दिवशी पहिल्याच रात्री सरपंच बाई मला भेटल्या आणि त्यांच्या घरी त्यांनी माझी उत्तम व्यवस्था केली .

त्यांना मी सांगितलं भाजी वगैरे मुळीच करू नका. मस्त बेसन भाकरी ठेचा असच काहीतरी बनवा.मला खूप सपाटून भूक लागली आहे. आपण आधी जेवण करू. तुम्ही तुमची सगळी कामं आवरा. आणि मग आपण गावातल्या बायांना घेऊन तुम्ही म्हणत असाल तर इथे नाहीतर मंदिरात बसू.बाईंनी लगेच होकार दिला आणि त्या कामाला लागल्या. छान पैकी बेसन भाकरी ठेचा मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वयंपाक केला..तोपर्यंत शहरात गेलेले त्यांचे पतीही आले .त्यांना एक मुलगा होता. तो शहरांमध्ये शिकत होता. त्यामुळे घरामध्ये हे दोघच होते. आणि एक म्हातारी सासू होती पण मुलीकडे गेलेली होती. आम्ही दोघीनी छान गप्पा मारल्या .त्यांचं काम होईपर्यंत मी त्यांच्या जवळ बसले .गॅस वर त्या काम करत होत्या आणि माझ्याबद्दल त्या विचारत होत्या. मी पण त्यांना जमेल तशी माहिती देत होते .पण मी माझ्याबद्दल फार बोलायचं नाही असं ठरवलं होतं .महिलांचा अभ्यास का करता तुम्ही? कुठल्या प्रोजेक्टवर आहात का? सरकारी प्रोजेक्ट आहे का? सरकारचा पैसा मिळतो का ?वगैरे प्रश्न त्या मला विचारत होत्या.मी तिला जमेल तशी उत्तरे देत होते .कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरे खरी देण्याची गरज मला काही वाटत नव्हती .माझी ओळख लपवून ठेवण्यामागे माझा वेगळा काहीच हेतू नव्हता. पण मला त्यांनी खूप स्पेशल ट्रीटमेंट द्यावी अशी माझी अपेक्षा नव्हती .एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी गावांमध्ये फिरते आहे एवढं त्यांनी लक्षात घेऊन माझ्याशी वागावं असं मला वाटत होतं .मी त्या आणि त्यांचे मिस्टर आम्ही एकत्र जेवण केलं .मागची आवरासावर त्यांनी केली आणि बाहेर येऊन त्यांनी हळी दिली. लक्ष्मी ,संध्या,बेबी काय काय चार-पाच नाव त्यांनी घेतली.लगेच बाहेर महिला आल्या.यांनी त्यांना सांगितलं नागपूरवरून पाहुण्या आल्या आहेत आणि त्यांना आपल्या बायांसोबत काहीतरी बोलायचं आहे .अनेक सामाजिक संस्था अलीकडे गावांमध्ये भेटी देतात, महिलांशी बोलतात .त्यामुळे हा प्रकार काही त्यांना खूप वेगळा वाटला नाही .त्या म्हणाल्या आम्ही पंधरा वीस मिनिटात येतो. बाईंनी त्यांना आणखी इतर महिलांना निरोप द्यायला सांगितला आणि जोरात आवाज दिला, ए बंड्या इकडे ये .अर्धा एक मिनिटात तेरा चौदा वर्षांचा बंड्या नावाचा मुलगा आमच्यासमोर उपस्थित झाला. "काय व मामी "

"अरे जा . धनगरपुर्यात जा,तिथून तुझ्या वस्तीत जा .त्यांना सांग नागपुर वरून एक पाहुण्या आल्या आहेत.त्यांना आपल्या सोबत बोलायचं आहे दहा मिनिटात या म्हणा ."तो हो म्हणून पळाला. पंधरा ते वीस मिनिटात जवळजवळ वीस पंचवीस महिला पाच सहा मुलं दोन तीन पुरुष तिथे जमा झालेत. मी त्यांना विचारलं "या गावात देऊळ आहे काय ?"

"आहे ."

"विहार आहे काय ?"

"आहे."

" काय मोठ आहे? देऊळ की विहार ?आपण एवढे सगळे जण मंदिरात बसू शकतो की विहारात ?"त्या म्हणाल्या "कुठेही बसू शकतो आमच्या गावातील मंदिर मोठं आहे. विहार ही मोठं आहे." मी म्हटलं "विहारात बसायला सगळ्यांना चालेल काय ?"त्या म्हणाल्या" हो चालेल ."आम्ही विहारात जाऊन बसलो .दोन मिनिटात कुणीतरी बाहेर जाऊन कुठून तरी सतरंजी आणली .तिथे पटकन टाकली. मग सरपंच बाईंनी सर्व स्त्रियांना शांत राहायला सांगितलं. मग त्यांनी सर्व स्त्रियांना माझी ओळख करून दिली .या नागपुर वरून आल्या आहेत. यांचं नाव अरुणाताई सबाने आहे .या महाराष्ट्रभर खेड्या खेड्यामध्ये फिरतात आणि आपल्या महिलांची माहिती गोळा करतात. आपण कोणत्या परिस्थितीत जगतो हे पाहतात. त्यांना आपला अभ्यास करून तो सरकारला द्यायचा आहे. त्यामुळे त्या आपल्याशी बोलायला नागपूरवरून आल्या आहेत .इथून त्या आता पुढे अजून कुठे कुठे जाणार आहेत. पूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे त्यामुळे आता त्या विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या". मी सर्वप्रथम त्या स्त्रियांना नमस्कार केला आणि त्यांना म्हटलं की "मी सरकारची पाहुणी नाही .हा अहवाल मी सरकारला देणार नाही .सरकार साठी मी काम करीत नाही.मला महाराष्ट्रातल्या माझ्या भगिनी कोणत्या परिस्थितीत राहतात ,गावातल्या भगिनी काय करतात?शहरांमध्ये सगळ्या सुखसोयी आहे .सर्व स्त्रियांना सन्मान मिळतो .त्या नोकरी करतात .त्यांना पाहिजे तसे त्या शिक्षण घेतात .आम्ही शहरातल्या स्त्रिया भाषण देताना सारखं सांगत असतो की आपल्या देशात समानता आलेली आहे .सरकार सांगते आपलं गाव हागणदारीमुक्त झालेलं आहे .आपल्या गावात आता गरिबी नाही .आपल्या मुली खूप शिकायला लागल्या आहेत .खेड्यातले रस्ते चांगले झालेले आहेत .यामध्ये चांगलं वातावरण आहे .खेड्यात दवाखाने पोचले आहेत तर हे सगळं खरं झालं आहे का? आपण पेपर मध्ये वाचतो. टेलिव्हिजनवर पाहतो तशी परिस्थिती गावांमध्ये खरंच बदलली आहे का हे मला पाहायच आहे आणि त्याप्रमाणे माझ्यासाठी मी एक पुस्तक तयार करणार आहे किंवा माहिती गोळा करणार आहे. सरकारला वगैरे अजिबात मी देणार नाही. मला स्वतःला वाटलं की मी खेड्यांमध्ये जाऊन अशा पद्धतीचा अभ्यास करावा ,तुम्हाला भेटावं, तुमच्याशी बोलावं ,म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे. शहरातल्या स्त्रिया नेहमीच एकमेकिंशी बोलतात ;पण गावामधली परिस्थिती आम्ही शहरात बसून कल्पना करू शकत नाही .

खरंतर मी पण एका शेतकऱ्याची मुलगी आहे .माझं पण एक गाव आहे .मी जरी नागपुरात राहत असले तरी माझ्या आई-वडिलांचे एक गाव आहे .तिथे आमची खुपसारी शेतीवाडी आहे .मी माझ्या गावाला नेहमीच जात असते .माझ्या गावातली परिस्थिती लहानपणापासून मी पाहिली आहे.माझे काका आमदार असल्यामुळे ,माझा भाऊ राजकारणात असल्यामुळे त्यांनी त्यांच्या गावाचा खूप प्रोग्रेस केलेला आहे. शिवाय आमचं गाव वर्धेपासून अतिशय जवळ आहे .त्यामुळेही असेल आमच्या गावचे शिक्षणाचे प्रमाण खूप चांगले आहे .पण सगळीकडे अशी परिस्थिती असेलच असे नाही .म्हणून मी या दौऱ्यावर स्वेच्छेने निघाले आहे .शिवाय मला हेही जाणून घ्यायचे आहे की या गावांमध्ये काही मोठे प्रश्न आहेत काय, असेल तर तुम्ही माझ्याशी बिनधास्त बोलू शकता .प्रश्न राहिला सरकारचा.तर, जर खरोखरीच तुमचे काही मोठे प्रश्न असतील .तुम्ही प्रयत्न करूनही ते प्रश्न आतापर्यंत सुटल्या गेले नसतील ,तर त्यासाठी मी प्रयत्न करेन.अर्थात तुम्हाला हवे असतील तर." एवढे बोलून मी थांबले .एक दोन मिनिट त्यांची आपापसात कुजबुज सुरू झाली आणि एक हात वर गेला .मी म्हणाले बोला. त्या बाई म्हणाल्या ,"आमच्या गावात रस्ते तर नाहीतच पण आमच्याकडे पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे .खूप लांबून पाणी आणावं लागते. पार कंबर बसून गेली पाणी भरून भरून."बाईंच्या या बोलण्याने मला फार आनंद झाला .त्यांच्या गावात पाण्याचा प्रश्न आहे यानी मी आनंदित नाही झाले,पण मला काय हवं हे त्या बाईंना नेमकं कळलं होतं. बरोबर तिने प्रश्न निर्माण केला आणि तिथून आमच्या सगळ्यांमध्ये खूप चांगला संवाद सुरू झाला .मग हळूहळू अनेक स्त्रिया गावातले प्रश्न सांगू लागल्या. रस्ते ,दवाखाने ,पाणी हे प्रश्न त्यांनी सांगितले पण हगनदारी बद्दल मी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या ,"नाही बाई आम्हाला संडास नको .आम्हाला गोदरीत जाऊनच संडास येते. शिवाय रात्रीच्या आम्ही तीन-चार जणी मिळून जातो तर आपापसात आमच्या गोष्टी पण होतात ".मी म्हटलं ,"गोष्टी होतात की सासूच्या चुगल्या करता?" त्यावर सगळ्या खळखळून हसल्या .हळूहळू गावात भूत कसा येतो ,मग एकदा भुताला त्यांनी कसे हाकलून लावले .मग पाटलाच्या घरी चोर कसा आला, चोराने पाटलीनबाईंच्या अंगावरचे दागिने चोरले तरी पाटलीन ढाराढुर कशी झोपूनच राहिली वगैरे वगैरे बर्‍याच गोष्टी त्यांनी माझ्याशी शेअर केल्या. आम्ही भरपूर गप्पा मारल्या .त्यांचे प्रश्न मी समजून घेतले .माझ्याजवळ टिपून ठेवले. संडास चे महत्त्व त्यांना पटवून दिले.स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. गावांमध्ये पाणी आणण्यासाठी पाणीपुरवठा योजना कशी आहे त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आपापसात कसा पैसा गोळा करायचा आणि जिल्हा परिषदेला तो फॉर्म सबमिट करायचा वगैरे वगैरे बर्‍याच गोष्टी त्यांना सांगितल्या .

तुम्हाला भेटून आम्हाला खूप बरं वाटलं असं सर्वजणी शेवटी म्हणाल्या .आमच्या नऊ वाजता सुरू झालेल्या गप्पा रात्री बारा वाजले तरी संपत नव्हत्या. शेवटी मी त्यांना म्हणाले," "तुम्हाला सकाळी लवकर कामाला निघायचं असतं .आता बस झाले .गप्पा करायला पुन्हा मी कधीतरी येईल. उद्या सकाळी मात्र इथून मी जाणार आहे तेव्हा आता मी तुमचा निरोप घेते .तुम्ही पण आपल्या घरी जा. "मग त्यांच्यातल्या काहींनी माझा मोबाईल नंबर मागितला .तो त्यांनी त्यांच्या जवळ लिहून घेतला .काही तरुण मुली होत्या. नुकत्याच लग्न करून आलेल्या. याही माझ्या सोबत बोलत होत्या. माहेर आणि सासर मधलं अंतर कसं असतं ,यावर आमची चर्चा झाली.नवऱ्याशी कसं जुळवून घ्यायचं ,त्याच्याशी कशी मैत्री करायची यावर मी त्यांच्याशी बोलले .असं करत करत शेवटी उठल्यानंतरही अर्धा-पावून तास आम्ही बोलत होतो आणि जवळजवळ एक वाजता त्या सर्वजणी आपापल्या घरी गेल्या आणि मी आणि सरपंच बाई आम्ही घरी परत आलो .त्यावेळी सरपंच बाई मला म्हणाल्या ,"मॅडम आतापर्यंत आमच्या गावात खूप पाहुणे येऊन गेलेत ,पण इतक्या मोकळेपणाने आमच्या गावातल्या बाया कधीच कुणाशी बोलल्या नाहीत." मी फक्त हसले.

मला जे हव होत ते मिळालं.

खूप वर्षांत मी खाटेवर झोपले नव्हते. नवीन जागेत मला झोप येत नाही,त्या घरात गावाचा एक टिपिकल वास येत होता, मला वासाची फार अॅलरजी आहे.त्यातल्या त्यात चादर स्वच्छ होती. आणि पंखा होता.शिवाय दिवसभराच्या सवय नसलेल्या दगदगिने मी थकले होते.त्यामुळे असेल कदाचित पण त्या गैरसोयी तही त्या रात्री मला नव्या घरात ,नव्या जागेत त्यांच्या खाटेवर खूप गाढ झोप लागली. पहिला दिवस यशस्वी झाल्याचं समाधान असेल कदाचित.

दुसऱ्यदिवशी चा प्रवास उद्या.

- अरुणा सबाने

Updated : 29 Nov 2019 12:26 PM GMT
Next Story
Share it
Top