'आशा' वर्करना हॉर्वर्ड विद्यापाठीच्या माध्यमातून प्रशिक्षण - राजेश टोपे
X
ग्रामीण भागात आरोग्यसेवेसाठी 'आशा' कार्यकर्ती मोठा दुवा ठरत आहेत. आशा वर्करच्या माध्यमातून लसीकरण, गर्भवती महिलांची काळजी, बालकांचे आरोग्य या क्षेत्रात प्राथमिक स्तरावरचे काम करण्यात येते. आता या आशा कार्यकर्तींच्या कामाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना कौशल्यपूर्ण विशेष प्रशिक्षण देण्यात यावं. यासाठी हॉर्वर्ड विद्यापाठीच्या माध्यमातून 'आशा' वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली.
दुर्गम भागात तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास शहरातील नामांकित डॉक्टरांचा सल्ला त्याद्वारे रुग्णांना देता येईल का? याबाबत हॉर्वर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल? याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.
सामान्यांना गुणवत्तापूर्ण व जलद अशी आरोग्य सेवा देण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिल्या बैठकीत प्राथमिक आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रुपांतर करून सामान्यांना आरोग्य सुविधा देण्याचे नियोजन केले आहे.
आरोग्य विभागाच्या रुग्णालयांचे जाळे ग्रामीण भागात जास्त आहे. तेथे तंत्रज्ञानाचा वापर करीत अत्याधुनिक उपचार सुविधा देता याव्यात यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीस हॉर्वर्ड विद्यापीठाचे प्रा. राजीव गुप्ता, वुई स्कुलचे समुह संचालक उदय साळुंके, वुई स्कुलचे आरोग्यनिगा विभागाचे सहायक अधिष्ठाता डॉ. भगवती प्रसाद आदी उपस्थित होते.