Home > Max Woman Blog > ‘त्यांना’ कसला आलाय महिला दिन...

‘त्यांना’ कसला आलाय महिला दिन...

‘त्यांना’ कसला आलाय महिला दिन...
X

काल महिला दिन आणि बायकोचा वाढदिवस असा दुहेरी योग, यानिमित्ताने मरीन ड्राईव्ह इथल्या ट्रायडंट हॉटेलात जेवायला गेलो... समोर मुंबई पोलिसांच्या महिला पोलिसांची बॅन्ड सह महिला दिनानिमित्त, आरएसपीच्या विद्यार्थीसह परेड सुरू होती. खूपच छान वाटलं. मुंबईतल्या ८० पोलिस ठाण्यातून महिला अधिकारी, कर्मचारी याला उपस्थित होत्या.

वॉशरूम ला जाण्यासाठी त्यापैकी काहीजणी आत हॉटेलात आल्यावर त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, वेगळंच चित्र लक्षात आलं. या परेडसाठी दुपारी तीन पासून तिथं होत्या. घरून कितीला निघावं लागलं असेल विचार करा ? संपेपर्यंत सहा घरी पोचेपर्यंत नऊ, कशाचा महिला दिन ? याऐवजी सुट्टी दिली असती. तर जरा बरं वाटल असत !... अशी प्रतिक्रीया होती. मध्यंतरी खा.शरद पवार यांच्या पत्रानंतर पोलिसांना बंदोबस्त वेळी बसायला द्यायला हवं. हा मुद्दा लोकांसमोर आला.

पोलिस खात्यातील वरिष्ठांनी याबाबत नक्कीच विचार करायला हवा. कुठल्याही व्यक्तीला सर्वाधिक आनंद हा कुटुंबियांसमवेत कुठलेही क्षण साजरा करतांना होतो. महिला दिन साजरा करताना सुट्टीच दिली असती. सकाळी लवकर हा कार्यक्रम ठेवता आला असता, तीन तासांच्या कार्यक्रमासाठी सबंध दिवस महिला भगिनींना ताटकळत ठेवून दिलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छा. त्यांना खरंच नको होत्या. कुठल्याही क्षेत्रातील वरिष्ठांनी हा विचार जरूर करावा. कर्मचा-यांना त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या मिळाल्या. तर ते अधिक जोमानं काम करतील पोलिसांना सणवार तर नाहीच पण सध्या साज-या होणा-या विविध डे निमित्तही ताटकळत ठेवून राबवून घेतलं जातंय....

ता.क.- ही पोस्ट वाचून अप्पर पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकारी मित्रवर्यांनी आवर्जुन फोन केला. त्यांच्या जिल्ह्यात असाच कार्यक्रम होता. मात्र उशीर होणा-या वरिष्ठांची वाट न पाहता दोन तासात कार्यक्रम आवरून महिला कर्मचा-यांना जाण्याची परवानगी दिली. शिवाय त्या दिवशी तरी असे कार्यक्रम ठेवू नयेत. आदल्या किंवा दुस-या दिवशी करावेत तो दिवस महिलांना आवडेल तसा सेलिब्रेट करू द्यावा. हे मनातलं सांगितलं, शिवाय अशा कार्यक्रमांना बजेट नसतं. मार्च एंड आहे.

कमीत कमी खर्चात आवरा अशा सूचना असतात. त्यामुळं फार काही करता येत नाही. असा अनुभवही सांगितला. अर्थात अत्यंत तणाव असलेल्या अशा खात्यात आधी सुट्ट्यांची मारामार, त्यात पुन्हा या परिपत्रकानुसांर साज-या होणा-या डे ऐवजी मनमोकळे पणे तो दिवस साजरा करता यावा अशा भावना त्यांनी मांडल्या. अर्थात भावना चांगल्या असल्या तरी त्यांनाही रूक्ष शासनादेश पाळण्याशिवाय गत्यंतर नसतं.

पत्रकार अजित चव्हाण यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार

Updated : 10 March 2020 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top