Home > रिपोर्ट > “ द वाईफ”

“ द वाईफ”

“ द वाईफ”
X

"द वाईफ" हा सिनेमा मेग व्हॉलित्झरच्या 2003 मध्ये प्रकाशित कादंबरीचे नाट्यमय रूपांतरण आहे. २०१९च्या ऑस्कर नॉमिनेशनसह डझनभर विविध प्रतिष्ठित जागतिक पुरस्कार मिळवलेला हा सिनेमा आहे.

कथा ४० वर्षांपासून विवाहित असलेल्या ज्योअन आणि जोसेफ कासलमन या लेखक जोडप्याभोवती फिरते. चित्रपटाची सुरवात जोसेफला वाङ्ममयासाठी नोबेल परितोषिक जाहीर झाले आहे अश्या फोन कॉल पासून होते. वैवाहिक आयुष्यातील प्रदिर्घ सहवासामुळे एकमेकांविषयी कम्फर्ट झोनमध्ये असलेले आणि एकमेकांशी एकरूप झालेल्या त्यांच्या नात्याचे पदर लहानसहान प्रसंगातून उलगडायला लागतात.

नोबेल पुरस्कार घ्यायला स्टोकहोमला ती दोघे डेव्हिड या त्यांच्या तरुण मुलासह प्रयाण करतात.

कथा हळूहळू फ्लॅशबॅक मध्ये जाते १९५८,१९६०,१९६५ दरम्यान घडलेल्या अनेक प्रसंगांच्या तुकड्यांमधून जोअन आणि जोसेफचे तरुणपण ,जोसेफचे पहिले असफल वैवाहिक जीवन, जोचे विद्यार्थिनी म्हणून त्याच्या जीवनात प्रवेश , त्यांचे प्रेम, लग्न, दोन मुले, जोसेफचे लेखक म्हणून करियर घडत जाणे , त्याच वेळेला प्रतिभावंत लेखिका म्हणून उदयास येत असताना देखील जोअनचा स्वतःचे करिअर थांबविण्याचा निर्णय आणि जोसेफच्या करियरला सपोर्ट करणे इत्यादी घटना थोडक्यात प्रेक्षकाला त्यांच्या जीवन प्रवासाची झलक दाखवतात.

जोची जोसेफच्या प्रेमापोटी अगतिकता, 1960 च्या दशकात जागतिक लेखन क्षेत्रात महिला लेखकांना मिळणारी दुय्यम वागणूक , त्यांना कमी लेखण्याचा दृष्टिकोन , त्यातून ज्योची लेखिका म्हणून पुढे येण्याची उदासीनता पण त्याचवेळेला नवरा सुमार लेखक असून त्याच्या लिखाणाला प्रोत्साहन देणे , त्याकरिता स्वतःच्या करियरचा त्याग करणे , जोसेफचा रंगेलपणा, त्याची अनेक महिलांबरोबरची लफडी, जोअनने त्याकडे संयमीपणे केलेले दुर्लक्ष इत्यादी घटना लहान मोठ्या प्रसंगातून हळू हळू उलगडत जातात.

अनेक दृष्यांमध्ये कॅमेरा जोच्या (ग्लेन क्लोजच्या)चेहर्यावर स्थिर असतो आणि केवळ तीच्या चेहऱ्यावरील अभिव्यक्तीने तो प्रसंग प्रेक्षकाला उलगडतो. तिचा चेहरा विविध भाव छटा रंगवलेल्या कॅनव्हास प्रमाणे भासतो आणि तिचे डोळे प्रत्येक प्रसंगात तिचे अंतरंगातील भाव चेहऱ्यावर जिवंत करतात.

नथनेल (ख्रिस्तीन स्लेटर) हा एक प्रस्थापित लेखक असून त्याला जोसेफ कासलमनच्या जीवनावर पुस्तक लिहायचे असते. त्याकरिता परवानगी घेण्याकरिता तो स्कॉकहोमला जोअनला भेटून तिच्या वैवाहिक जीवनातील भूतकालीन घटना सांगण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या जीवनातील काही गुप्त आणि मसालेवाईक घटनांबद्दल जाणून घेऊन पुस्तकात लिहिण्याचा त्याचा हेतू असतो. त्याकरिता तो त्यांच्या डेव्हिड या उदयोन्मुख लेखक मुलाला देखील डीवचण्याचा प्रयत्न करतो.

नथनेल जोअनच्या लेखनाचा प्रशंसक असतो आणि त्याला अपेक्षित असलेली गुप्त माहिती तिने उघड करावी म्हणून तिच्या मनाचा ठाव घेत राहतो.

जोसेफला नोबेल मिळाल्या नंतर, त्यारात्री अचानक पणे ज्योच्या चेहऱ्यावरील चित्रपटाच्या सुरवातीपासून धारण केलेल्या थिजलेल्या थंड रहस्यमयी स्मिहास्याचा अर्थ उमगायला लागतो. कथेला नाट्यमय वळण मिळते.ज्योच्या भावनांचा उद्रेक होतो. सनीसनीखेज तथ्य बाहेर येते. मुखवटे गळून पडतात.

वर वर संथ भासणारी ही कलाकृती प्रत्येक प्रसंगात मानवी जीवनाचे अनेक कंगोरे दाखवते, शेवटी अनपेक्षित वळणं घेते आणि अचानक थांबते.

बेस्ट ऐक्ट्रेस म्हणून ग्लेन क्लोजचे यावर्षीचे हे सातवे ऑस्कर नॉमिनेशन होते . मात्र यावर्षीदेखील ती या कॅटेगरीत सबळ दावेदार असताना तिचे ऑस्कर हुकले.

जोअन (ग्लेन क्लोजचे) काही डायलॉग्ज अतिशय लक्षवेधक आहेत. ज्योअनची ओळख करून देताना जोसेफ दरवेळेला ती त्याची 'बेटर हाफ' आहे आणि त्याशिवाय ती इतर काही करत नाही म्हणून सर्वांना सांगतो तेव्हा जोअन अत्यंत निग्रहाने त्याला म्हणते " don't paint me as a victim, I am much more interesting than that."

दुसऱ्या एका प्रसंगात कुणीतरी जोअनला तुम्ही काय काम करता असे विचारल्यावर ती म्हणते " I am the kingmaker"

असे अनेक प्रसंग सिनेमाला रहस्यमय टच देतात.

मोजक्याच पण अतिशय परिणाम कारक आणि वेलडिफाईंड व्यक्तिरेखा या सिनेमात आहेत.

जोनाथन प्राईस या वेल्श अभिनेत्याने अतिशय सहजतेने वयोवृद्ध जोसेफ कासलमन साकारला आहे.कौटुंबिक जीवनात सर्वकाही भरभरून मिळालेला एक सफल पती,पिता आणि जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेली लेखकाची कारकीर्द आणि त्यामुळे वयोमानानुसार चेहऱ्यावर आलेले प्रेमळपण आणि समाधानाचे भाव आणि त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात आत्मप्रौढी मिरवणारा स्वमग्न लेखक प्राईझ यांनी अप्रतिमच वठवला आहे.

या जोडप्याच्या तरुण मुलाची डेविडची भूमिका मॅक्स आयर्नने लक्षणीयरित्या साकारली आहे. डेव्हिड एक प्रातिभावंत आणि उदयोन्मुख तरुण लेखक आहे.स्वतःच्या लिखाणाकरिता त्याला पित्याचे प्रोत्साहन अपेक्षित असते पण त्या छायेखाली आणि दडपणाखाली वावरणे त्याला मंजूर नाही.

ख्रिस्तीन स्लेटरने साकारलेल्या नथनेल या चिकित्सक आणि गल्लेभरू प्रॅक्टिकल अँप्रोच असलेल्या लेखकाची भूमिकाही लक्षात राहते.

एनी स्टार्क, हॅरी लॉइड या जोडगोळीने जोअन आणि जोसेफचे तरुणपण साकारले आहे . एनीने जोअनचा तरुणपणापासूनच असलेला संयमशील स्वभाव आणि प्रगल्भता,लिखाणाबद्दलचा तटस्थ दृष्टिकोण इत्यादी बारकावे परिणामकारक पणे साकारले आहे. 1960/1970 च्या दशकादरम्यान जागतिक स्तरावर पुरुषी वर्चस्व असलेल्या लेखन क्षेत्रात महिला लेखिकांकडे बघण्याचा कलुषित दृष्टिकोन त्यातून जोअनमध्ये बळावलेला न्यूनगंड आणि हतबलता. त्या अगतिकतेतून तिने घेतलेले निर्णय, आणि तडजोडी सगळं वयस्कर जोअनच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेषेत ,प्रत्येक सुरकुतीमध्ये बोलकं होत जातं.

हॅरी लॉइडने साकारलेला तरुणपणीचा देखणा, बेदरकार, रंगेल, थोडासा उथळ आणि स्वार्थीपणाची स्वभाव छटा असलेला प्रोफेसर लेखक जोसेफच्या भूमिकेला योग्य न्याय देतो.

पटकथा लेखक जेन अँडरसनने एका सरळ साध्या कथेला नाट्यमय आणि मनोवेधक नँरेटिव्ह मध्ये रूपांतरीत केले आहे.

बियोंन रुंगा या स्वीडिश दिग्दर्शकाच्या अप्रतिम दिग्दर्शनातून आणि सर्वच अभिनेत्यांच्या सशक्त अभिनयातून ही कलाकृती क्लासीक्सच्या पंक्तीत पोहोचली आहे.

-जयश्री इंगळे

Updated : 11 March 2019 9:55 PM IST
Next Story
Share it
Top