Home > Max Woman Blog > निरक्षर नानुबाईची कहाणी...

निरक्षर नानुबाईची कहाणी...

निरक्षर नानुबाईची कहाणी...
X

सांगली जिल्हात भाळवणी नावाचं गाव आहे.काही वर्षापूर्वी या गावातील एकास गरुडाचे पिलू सापडले होते त्याकाळात या गरूडला बघायला दुरून लोक यायचे. गावात गर्दी व्हायची.तेव्हा भाळवणी या गावावरून जाणाऱ्या एसटी बसचे कंडक्टर या गावाला गमतीन गरुड भाळवणी असे म्हणायचे.अलीकडच्या दहा वर्षाच्या काळात डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांच्या कुस्तीतील कामगिरीमुळे भाळवणी गाव चर्चेत आलं आहे. याच गावात नानूबाई खेराडे राहत होती.

नानुबाई शेतकरी कुटुंबातील स्त्री.रानात राबणारी,स्वतःचा संसार प्रामाणिकपणे करणारी. ती कधीही शाळेत गेली नव्हती.निरक्षर होती . पण तिचं शब्दावर भारी प्रभुत्व होत. तीच बोलणं म्हणजे मराठी विषयाच्या तज्ञ माणसालाही विचार करायला लावणार होत. नानुबाई औपचारिक दृष्टया भले निरक्षर होती पण ती ज्ञानी होती . तिच्याकडं लोकसाहित्याचा अफाट साठा होता.तिच्या बोलण्याची सुरुवात म्हणीने नाहीतर छोट्या लोककथेन व्हायची. स्वतःचा मुद्दा पटवून द्यायला ती लोकसाहित्याचा गुहेत शिरून पटेल अश्या म्हणी सांगायची.म्हणी तिला तोंडपाठ होत्याच पण जात्यावरची शेकडो गाणी तिला ज्ञात होती.

या गाण्याचं निरुपण मी तिच्याच ग्रामीण शब्दात ऐकल आहे . गोष्टीवेल्हाळ होती ती. एका बैठकीत ५-६ गोष्टी सांगितल्या तिने . गोष्टीतील प्रसंग समोर उभा केले . जणू माझ्या समोरच ती गोष्ट घडत होती असं वाटलं. प्रभावी कथनशैली तिच्याकडं होती.तिच्यासारखी कथनशैली मला पुन्हा कधीही ऐकायला मिळाली नाही.नानुबाई माझ्या आजीची मावशी.ज्या काळात मी तिला भेटायचो त्याकाळात माझ्या साहित्याचा काहीही संबंध नव्हता.

पण जेव्हा मी मराठी साहित्य विषयाचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मात्र मला नानुबाई आणि तिचं लोकसाहित्यावरच प्रेम आठवत होत. वाटायचं नानुबाई आता असती तर तिला साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासमोर बोलायला लावलं असत तिच्या खास शैलीत. पण तोपर्यन्त नानुमावशी आपल्यात नव्हती.

लोकसाहित्य ,शब्दावरची हुकमत ही नानुमावशीची एक बाजू. दुसरं म्हणजे नानुबाईच्या काळात संत गाडगेबाबा गावोगावी जाऊन कीर्तनातून लोकांचे प्रबोधन करायचे. त्यातील एक कीर्तन तिनं ऐकलं होतं. ती आठवण ती आयुष्यभर सांगायची.गाडगेबाबा यांना पाहिल्याचा आणि ऐकल्याचा आनंद तिच्या बोलण्यातून व्यक्त व्हायचा.

इंग्रजी राजवट असताना सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार उभारलं होत. गावोगावच्या लढणाऱ्या लोकांच्या बळावर प्रतिसरकारचे लोक इंग्रजी राजवटीला नाकारत होते, इंग्रजांची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी क्रांतिवीर लढत होते. सातारा जिल्ह्यात इंग्रजनां सळो की पळो करून सोडले होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भूमिगत राहून लढणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत होते. पण गावोगावच्या लोकांनी,आया बहिणींनी पत्रीसरकारच्या चळवळीतील अनेक भूमिगत सैनिकांना आईबहिणीच प्रेम दिलं.त्यांचा पोटच्या पोराप्रमाण आणि सख्या भावाप्रमाण सांभाळ केल्या.या भूमिगत क्रांतिकारकासाठी जे जेवण जायचं त्यातील काही भाकरी नानुबाई यांनीही दिल्या होत्या.

याची इतिहासात नोंद नाही. पण या सगळ्या गोष्टी नानुमावशीन मला सांगितल्या होत्या. सातासमुद्राच्या पलीकडून आपल्या देशात येऊन इथल्या जनतेवर जुलूम करणाऱ्या इंग्रजाच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिवीर भावांना मायेची शिदोरी देणारी नानुबाई आज आपल्यात नाही,तिचा लोकसाहित्याचा अनमोल ठेवाही आज नाही.आहेत तिच्या आठवणी. त्या मी कधीही विसरू शकणार नाही.

-संपत मोरे यांच्या फेसबुकवॉल वरून साभार

Updated : 14 Dec 2019 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top