Home > रिपोर्ट > तिच्याबद्दल ची अविवेकी मानसिकता

तिच्याबद्दल ची अविवेकी मानसिकता

तिच्याबद्दल ची अविवेकी मानसिकता
X

यंदाच्या लोकसभा निवडणुकांतील अनेक असे किस्से आहेत ज्यामुळे अनेकांची मन दुखावली गेली आहेत तर अनेकांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळाली आहे. नेहमीप्रमाणे निवडणुका जरी होत असल्या तरी त्यात एका गोष्टीचा गैरवापर झपाट्याने वाढत चाललेला आहे. ते म्हणजे महिलांवर होणाऱ्या टीका... मग ती समाजातली कुठलीही गोष्ट असू द्या, टार्गेट फक्त महिलांचं केलं जात. आता नुकतंच अभिनेता विवेक ओबेरॉय याने ट्वीटरच्या माध्यमातून एक मिम शेअर केलं ज्यात... अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या जीवनासंबंधीत असलेल्या गोष्टींना निवडणुकांच्या एक्झिट पोलशी तुलना करण्यात आली आहे...

वरील हे मिम बघून सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता विवेक ओबेरॉयवर नेटिझन्सने टीकेची झोड उठवली. एकंदरित त्याच्या या कृत्याची दखल राज्य महिला आयोगासह राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली. त्याच्यावर टिप्पणी करत त्याला नोटिस बजावण्यात आली.

दरम्यान, 'माझ्यामुळे एक जरी महिला दुखावली गेली असेल तर ती चूक सुधारलीच पाहिजे. मी ते ट्वीट डिलीट केलं असून, सर्वांची माफी मागतो' असं लिहून विवेकनं ट्विट डिलीट केलंय. 'कधीकधी आपल्याला ज्या गोष्टी अगदी हलक्या-फुलक्या आणि विनोदी वाटतात त्या इतरांना वाटतीलच असं नाही. मी गेली १० वर्ष २ हजारांहून अधिक वंचित मुलींच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहे. कोणत्याही महिलेचा अपमान होईल असं काही वागण्याचा मी विचारही करू शकत नाही.' असंही विवेक म्हणाला.

एकंदरित हा सर्व मेलोड्रामा बघण्यासाठी ऐकण्यासाठी खूप चांगला वाटत असावा आपल्या समाजाला... हे आजचं चित्र नाही तर पिढ्यानपिढी हे चित्र बनवण्यात किंवा मुक गिळून बघण्यात आपण सर्व सहभागी आहोत. समाजात कुठलीही घटना घडली की टिका-टिप्पणी मजाक-मस्ती करण्यासाठी महिलांचाच वापर केला जातो... कधी स्वतःच्या मनाला विचारुन बघा का म्हणून आपण तिचा वापर अशा गोष्टींसाठी करतो.. मला तर वाटतं आपल्या नजरेत आणि मानसिकतेत महिलांविषयी कायम न मिटणारा सॉफ्टवेअरसारखा किडा आपण रुजून घेतला आहे जो कधी महिलांचा आदर न करणार असावा. खरंतर ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्या समाजाची जिला आपण आई, बहीण, पत्नी, देवी यांसारखे मातृत्वाची, ममत्वाची उपमा देतो तिलाच दुसरीकडे अपमानित करुन आपला मर्दांगीपणा दाखवतो...

असो, अनेकदा या गोष्टी बोलण्याइतक्याच मर्यादित असतात... प्रत्यक्षात बदल घडवण्यासाठी आपली मानसिकता अजून परिपक्व नसावी कदाचित... याला घरातली शिकवण आणि समाजातील वातावरण कारणीभूत असावं.

विवेक ऑबेरॉयने हे मिम शेअर करुन ऐश्वर्या राय बच्चनच्या चारित्र्यावर टीका केली आहे. तर याआधी महिलांच्या चारित्र्यावर घाला घालणाऱ्या अनेक घटना, प्रकार घडले आहेत. (मग ते निवडणुकांच्या प्रचारांदरम्यान असो किंवा राजकारणात एखादी महिला सक्रीय होताना असो) त्यावर राज्य महिला आयोग असो किंवा राष्ट्रीय महिला आयोग असो... फक्त असे कृत्य करणाऱ्यांना नोटिसा पाठवायच्या आणि मीडियाला या गोष्टीचा निषेध करणारा बाईट द्यायचा ऐवढचं काम आहे का महिला आयोगाचे?... आजही महिला आयोगाने तेच केलं आहे. जेव्हा की विवेकवर गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र आपलं महिला आयोग कडक आणि ठाम भूमिका घेताना दिसतच नाही. नोटीसा बजावण्यापलीकडेही महिला आयोगाने कडक कारवाई करावी जेणे करुन महिलांविषयी अपशब्द काढणाऱ्या चाप बसेल. आणि महिलांविषयी येणारी ही अविवेकी मानसिकताही नाहीशी होईल...

https://youtu.be/x4ziqIZsSFE?t=16

(प्रियंका आव्हाड)

Updated : 21 May 2019 10:37 AM GMT
Next Story
Share it
Top