Home > रिपोर्ट > रविवार तसा आवडता आणि नावडताही!

रविवार तसा आवडता आणि नावडताही!

रविवार तसा आवडता आणि नावडताही!
X

घरी सगळे असले, की घराला घरपण येतं. नाहीतर रोज असतेच, 'में और मेरी तनहाई!' रोज डबे करा, पाणी भरा, रांधा-वाढा-उष्टी काढा, हे करण्यात दिवस संपतो. त्या जवाबदारींमुळे जाग येत असली तरी उठायची अजिबात इच्छा नसते. रविवारची स्थिती मात्र नेमकी उलट! यापैकी काही एक काम करायचं नसतानाही सकाळी ६ वाजताच डोळे टक्क उघडतात. बहुतेक तो कालावधी आपल्याला आपल्यासाठी क्वालिटी टाईम स्पेन्ड करता यावा, म्हणून न वाजताच झोपमोड करणारा अलार्म असेल.

सकाळी सगळे सुस्त झोपलेले असताना आपल्याला जाग यावी आणि आपल्याला गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी निसर्गाने साद द्यावी, याहून बेस्ट काहीच असू शकत नाही. माणसांनी भरलेलं घर झोपलेलं असताना, आपली पावलं निसर्गाकडे झेपावतात. मॉर्निंग वॉकची प्रेरणा देतात. बूट अडकवून अस्मादिक यथेच्छ फिरूनही येतात. आपला मूड फ्रेश झालेला असला, तरी घराला अजून जाग आलेली नसते. त्याच एकांताचा फायदा घेत आपणच आपल्यासाठी एकदम कॅsssडक चहा करावा आणि वृत्तपत्र वाचण्याचा पहिला मान घेत चहाचा एक एक घोट गळ्याखाली लोटावा...निव्वळ सुख!

निसर्गाचा समाचार घेतला, जगाचा समाचार घेतला, स्वतःचा समाचार घेतला, तरी अजून घरची मंडळी घोरत असलेली पाहून सुर्याबरोबर आपलाही पारा स्वाभाविकच चढू लागतो. आपसूक आवडता रविवार नावडता होऊ लागतो. त्यांच्या उठण्याने आपला रविवार संपणार असतो, तरी तो त्रास हवाहवासा वाटतो. एकच दिवस सगळे घरी असतात, मग लवकर उठायला नको का? या विचाराने दर पाच मिनिटांनी आपला अलार्म सुरू होतो. सर्वांना एकदाचं उठवून समोर बसवलं आणि त्यांच्यासोबत दुसऱ्या चहाचा घोट घेतला, की तिथून पुढे सुरू होतो खराखुरा रविवार!

- भैरवी

Updated : 7 April 2019 7:54 AM GMT
Next Story
Share it
Top