झरा आहे मुळचाच खरा – प्रा.हरी नरके
X
सुमारे ४० वर्षांपुर्वीची गोष्ट. विद्याताई तेव्हा अतिशय प्रतिष्ठीत अशा स्त्री मासिकाच्या संपादिका होत्या. मी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होतो. एका वक्तृत्व स्पर्धेतलं माझं भाषण ऎकुन त्या जवळ आल्या. मायेनं विचारपूस केली. आमच्या स्त्री मासिकासाठी लेख लिही म्हणाल्या. आजची तरूणाई काय वाचते, काय विचार करते? त्यावर मनातलं खरंखरं लिही म्हणाल्या. माझ्या आयुष्यतला तो पहिला लेख. विद्याताईंनी त्याला "घुसमट" असं शीर्षक दिलं. आपला लेख स्त्री मासिकासारख्या आघाडीच्या मासिकात छापून आल्यानं माझे पाय जमिनीवर टेकतच नव्हते.
तिथपासून अगदी अलिकडे त्यांनी माझ्याकडून मिळून सार्याजणीत विकासपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचा लेख लिहून घेतला. हा ४० वर्षांचा प्रवास आज आठवतो. लेखणासाठी त्यांनी मला आईच्या मायेनं केलेलं मार्गदर्शन आणि मी काय वाचावं? याबद्दल त्या सदैव देत असायच्या त्या टिप्स यांचा खजिना फार मोठा आहे.
तीस वर्षांपुर्वी मी साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो. तेव्हा विद्याताईंनी मतदारांनी मला मतं द्यावीत यासाठी चक्क पत्रक काढलं होतं. खरं तर विद्याताई आणि माझ्यात खूप अंतर होतं.
त्या अत्यंत प्रतिष्ठीत आणि संपन्न शहरी घरातून आलेल्या होत्या. खूप मोठा ऐतिहासिक वारसा त्यांच्या पाठीशी होता. मी ग्रामीण भागातून आलेला एक फाटका कार्यकर्ता होतो. पण त्या इतक्या कळकळीनं बोलायच्या, वागायच्या की त्या घरातल्याच वाटायच्या. त्यांचं बोलणं अतिशय जिव्हाळ्याचं, तळमळीचं, मृदू तरीही कणखर आणि साधं, सोपं, प्रवाही असायचं. त्या आपल्याशी गप्पाच मारीत आहेत असं सतत वाटायचं. त्यांच्या तोडीच्या दुसर्या स्त्रीवक्त्या मी पाहिलेल्या नाहीत. अतिशय प्रगल्भ, मुद्देसूद आणि अभ्यासपुर्ण बोलण्यात त्यांची सर इतर कुणालाही येऊ शकत नसे. महाराष्ट्रातल्या सर्वश्रेष्ठ स्त्रीपुरूष वक्त्यांची यादी केली तर त्यांचं नाव पहिल्या दहांमध्ये नक्कीच घ्यावं लागेल.
एक साक्षेपी संपादक म्हणून त्यांची कामगिरी अतुलनीय होय. स्त्री सखी, नारी समता मंच आणि स्त्रीमुक्ती संपर्क समिती यासारख्या संस्था उभारण्यात, मोठ्या करण्यात त्यांनी हयात घालवली. अक्षरस्पर्श ग्रंथालयाच्या उभारणीत त्यांचाच पुढाकार होता. सावित्रीजोतिबा उत्सवाच्या माध्यमातून महात्मा फुलेवाड्यावर दरवर्षी त्या व्याख्यानमाला व जागरणाचे कार्यक्रम घ्यायच्या. २ वर्षांपुर्वी सत्यशोधक केशवराव विचारे यांच्यावर बोलण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं होतं. त्यावेळी बाबा आढाव, सदा डुंबरे, आनंद करंदीकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. कमलताई विचारे यांच्याशी आमचा दोघांचा घरोबा होता. त्यातनं अनेक उपक्रम एकत्र केले. एकत्र प्रवास केले. गप्पांच्या मैफिली झडल्या. मोर्चे, निदर्शनं, सभा, संमेलनं, फिचर्स प्रदर्शनं झाली.
अनेक सभांमध्ये विद्याताईंसोबत बोललो. त्यांना ऎकणं ही तर केवळ मेजवानीच असायची. मध्यंतरी एका महिला अत्याचार प्रकरणात त्यांच्यासोबत येण्यासाठी त्यांनी मला फोन केला. आम्ही मिळून गेलो होतो. त्यावेळी पिडीत महिलांची विचारपूस विद्याताईंनी ज्या आपुलकीनं केली. त्यानं त्या महिल्या गहिवरल्या. त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्याताई खूप झगडल्या, झुंजल्या. धनदांडग्या आणि सत्तेचा पाठींबा असलेले आरोपी जिंकले, तेव्हा विद्याताई खूप उदास झाल्या. माझ्या आणि त्यांच्या वयात २ पिढ्यांचे अंतर, तर माझ्या मुलीच्या आणि त्यांच्यात ३ पिढ्यांचे अंतर. पण त्या सर्वांशी कनेक्ट व्हायच्या. प्रमितीशी आणि संगिताशी त्यांचं एकदम गूळपिठ होतं. अनेक कौटुंबिक अडीअडचणीच्या प्रसंगी विद्याताई धावून यायच्या. भुमिका घ्यायच्या. त्याची किंमतही मोजायच्या.
स्त्रीमुक्ती आंदोलनात उभी हयात जाऊनही विद्याताई पुरूषद्वेष्ट्या झालेल्या नव्हत्या. स्त्रीही माणूस असते, तीही प्रसंगी पुरूषा इतकंच खोटं बोलू शकते, हितसंबंध तिलाही वापरून घेतात, दरवेळी पुरूषाचीच चूक असते असे मानायची गरज नसते, प्रत्येक केसच्या गुणवत्तेवरून, सखोल तपासाअंतीच मत ठरवलं पाहिजे, सब घोडे बारा टक्के असं करणं बरोबर नाही अशी भुमिका त्या जेव्हा घ्यायच्या तेव्हा व्यावसायिक मुक्तीवाल्या बायका पिसाळायच्या. रागवायच्या.
पुरूष तेव्हढे सगळेच वाईट अशी ताठर भुमिका असलेल्या आजच्या एनजीओकरण झालेल्या काही संघटनांच्या काळात विद्याताई वेगळ्या होत्या. सरधोपट नव्हत्या. कळवळ्याच्या होत्या. ‘ऎशी कळवळ्याची जाती, करी लाभाविना प्रिती’ हा त्यांचा बाणा होता. कितीतरी अन्याय अत्त्याचाराच्या प्रकरणात त्यांनी न्याय दिला. खर्याची बाजू आणि न्यायाची भुमिका घेतली.
विद्याताईंचं जाणं खूप काही ओढून घेऊन गेलं. घरातलं वडीलधारं माणूस गेल्याची ठसठस आणि अपार दु:ख यांनी मन बधीर झालं. विद्याताई, आजच्या विपरीत काळात तुम्ही आम्हाला मार्गदर्शनासाठी हव्या होतात.